स्पेशल रिपोर्ट

पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांची अपेक्षा

ब्युरो रिपोर्ट

मुंबई – जलसाठे निर्माण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही आज राज्यात पाण्यासाठी भांडणं होतायत. भविष्यात ही परिस्थिती भयानक रूप धारण करू शकते. त्यामुळं आपलं काही चुकलं का आणि त्यात काही सुधारणा करू शकतो का, याचं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे, असं डॉ. पद्मश्री भंवरलाल जैन यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

 'भारत4इंडिया'चे संपादक मंदार फणसे यांनी पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

गांधी विचारांचे पाईक असलेल्या भंवरलाल जैन यांनी ग्रामीण उत्थानासाठी केलेलं कार्य सर्वांनाच परिचित आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून सिंचनात ठिंबक पद्धत आणून त्यांनी संपूर्ण देशात क्रांती केलीय. त्यामुळं आज राज्यात सिंचनावरून गदारोळ उठला असताना त्यांनी व्यक्त केलेल्या मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

``स्वातंत्र्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसाठे निर्माण करणं क्रमप्राप्त होत. त्यामुळं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी जलसाठे निर्माण झाले. पुणे, मुंबई वगळता इतर ठिकाणची धरणं शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनासाठी निर्माण झाली. आज काय परिस्थिती आहे? 70 टक्के धरणं शहरांना पाणी देण्यासाठी वापरतात. सबंध देशात सर्वात जास्त बंधारे आणि धरणं महाराष्ट्रात आहेत. असं असताना आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. गेली 15 वर्षं टॅंकरची संख्या सतत वाढतेय. सुरुवातीला 700 टॅंकर होते, आज ही संख्या आत्ता या दिवसात 2200 वर गेलीय. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटलेला नाही. औद्योगिक विकासासाठीही पाणी लागतंच. मग सिंचनावर पाण्यासारखा पैसा खर्च करून नेमकं काय साधलं, असा प्रश्न डॉ. जैन यांनी केलाय.

शहरांची तहान भागवण्यासाठी सर्व पाणी वापरणार का? शहरं किती वाढवणार? शहरात तरी सुविधा सर्वांना मिळतात का?  मग गावांच्या विकासाचं काय? शहरी सुविधा शेतीपर्यंत नेल्या तर गावातील माणसं कशाला मरायला शहरात येतील? गावं सुधारली तर शहरही सुधारतील आणि यामध्ये पाण्याचा प्रश्न कळीचा आहे. उशीर झालाय, पण अजून वेळ गेलेली नाही. पाण्यासाठी लोक शस्त्रं घेऊन रस्त्यावर उतरण्यापूर्वी राजकर्त्यांनी शहाणं व्हायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.