
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे सतरा वर्षे आंदोलने झाली. १९७८ साली राज्य विधिमंडळाने नामांतराचा ठराव संमत केला होता. तो होताच मराठवाड्यात सवर्णांनी मराठवाड्यातील आंबेडकरी समाजावर हल्ले केले. त्यामुळे ठरावाचे रूपांतर कायद्यामध्ये करायला पुन्हा शरद पवार यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसावे लागले. कारण तो ठराव त्यांच्याच काळात मांडला गेला होता. दरम्यानच्या काळात हे मराठवाडा विद्यापीठ व औरंगाबाद शहर नामांतराच्या मागणीने रोजच ढवळून निघे. उर्वरित महाराष्ट्रातही पुरोगामी पक्ष व कार्यकर्तेही नामांतराचा आग्रह धरीत सातत्याने आंदोलने करीत होते. 1994 साली नामांतर झाले, पण प्रत्यक्षात तो नामविस्तार होता. सवर्ण व बहुजन समाजामध्ये निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव विद्यापीठाला दिले गेले.
१९४९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादेत आले असता त्यांनी मराठवाड्यात उच्चशिक्षणाची असलेली दुरवस्था पाहून महाविद्यालयाची गरज असल्याचे सांगितले होते. नंतर मिलिंद महाविद्यालय देखील सुरू केले. साहजिकच त्यांना मराठवाड्यात उच्च शिक्षणाचा पाया घालण्याचे श्रेय मिळाले. म्हणून त्यांचे नाव विद्यापीठाला देणे योग्य असल्याची भूमिका पुरोगामी, डाव्या व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांचे मत होते. ज्यांचा नामांतरास विरोध होता त्यांना विद्यापीठास मराठवाडा विद्यापीठ हेच नाव राहू देणे योग्य वाटत होते. कारण त्यांनी निजामाच्या जुलमी राजवटीपासून १९४८ साली मराठवाडा मुक्त करवून घेतला होता. मराठवाडा हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे असे त्यांना वाटे. असे दोन प्रवाद या आंदोलनात होते व त्याचे थोडेफार अवशेष आजही शिल्लक आहेत.
मराठवाडा मागासलेला असल्याने जातिग्रस्त समाजाला जागे करण्यासाठी मराठवाड्याचा तरूण केंद्रस्थानी होता. तो नामांतराच्या आंदोलनात उतरला. जातीय भावना मागासलेपणाच्या पायाशी असल्याचे त्याला कळले व पटलेदेखील. सवर्णांच्या हातात तेव्हा शिक्षण, सहकार, आर्थिक व्यवहार, उद्योग, साहित्य आणि अर्थातच सत्ता होती. आंबेडकर हे सर्व वंचितांचं, शोषितांचं प्रतीक आणि बंडाचंही प्रतीक. त्यामुळे विद्यापीठापासून जातिमुक्तीचा आरंभ करायचा तर विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे सर्वथा उचित असे नामांतरवाद्यांचे म्हणणे होते. परंतु जातीसह आपल्या उच्च स्थानाचा वापर करून शोषण करणार्या सवर्णांना व त्यांच्या राजकीय पक्षांना ही क्रांती नामंजूर होती. त्यांनी मराठवाड्यात दुही पेरली. ते जातिभेदाविरोधात स्वतःही काही करत नव्हते आणि दुसर्यांनाही काही करू देत नव्हते. नामांतर यशस्वी झाल्यास आपल्या सत्तास्थानांवर आंबेडकरी समाजातील व पुरोगामी तरुण बसतील अशी भीती त्यांना वाटली.
नामांतर विरोधकांनी समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी, शेकाप आदी पुरोगामी बहुजन राजकीय विचारांचा पायाच उखडून टाकला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला मिळाल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी प्रेरित झाला आहे. शिकून ज्ञान व कौशल्ये प्राप्त करून मोक्याच्या जागा पटकावून आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी तो विद्यापीठात येतो. आज महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक भागात औरंगाबादचे विद्यार्थी आढळतात. केवळ नामांतर आंदोलनामुळे त्यांना शिकून मोठे होण्याची प्रेरणा मिळाली आणि समाजातील शैक्षणिक व राजकीय मक्तेदारी संपवण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली, हेच या आंदोलनाचे यश आहे. नामांतराचे आंदोलन यशस्वी झाले नसते तर आज महाराष्ट्र ज्या प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचलेला दिसतो तो तसा दिसलाच नसता.
Comments (1)
-
होय, खरंच नामांतर खूप आवश्यक होतं जर ते झालं नसतं तर आणखी वातावरण चिघळलं असते.