
दलित पँथरच्या फाटाफुटीनंतर प्रा. अरुण कांबळे यांनी नामांतर लढ्याच्या माध्यमातून चळवळीला नवसंजीवनी मिळवून दिली. नामांतराचे दिवस हा त्यांचा 'नवशक्ति'त प्रसिद्ध झालेला लेख. असाच एक माईलस्टोन. नव्या रक्ताला नवी प्रेरणा देणारा हा लेख...
दिनांक १० एप्रिल १९७७ रोजी औरंगाबाद येथे दलित पँथरच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ. आंबेडकर विद्यापीठ असे ठेवण्यात यावे असा ठरावही पहिल्यांदाच करण्यात आला. माझ्या पत्रकार परिषदेत हा आणि अन्य ठराव घोषितही करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न अशा रीतीने सुरू झाला. भडकल गेट येथील जाहीर सभेत त्याची वाच्यता जाहीरपणे झाली. याच अधिवेशनातील एका सत्रात प्राचार्य मनोहर भि. चिटणीस व प्रा. गंगाधर पानतावणे यांची व्याख्यानेही झाली. दलित पँथरची आवश्यकता या दोघांनीही प्रतिपादिली व मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ होणे योग्य आहे यासंबंधी समर्थ युक्तिवाद केले. नामांतर आंदोलनाच्या जन्मकाळचे हे दोन साथीदार प्राचार्य चिटणीस व प्रा. गंगाधर पानतावणे.
वस्तुत: नामांतराचा प्रस्ताव हा इतर दहा प्रस्तावांपैकी एक होता. पण महत्त्व आले या प्रस्तावाला आणि महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील, समाजकारणातील तो एक महत्त्वाचा प्रश्न बनला. दलित चळवळ गेली १६ वर्षे याच प्रश्नाला केंद्रबिंदू मानून चालू राहिली. सांगली जिल्ह्यातील करगणी नावाच्या छोटयाशा खेड्यात जन्मलेला मी दलित पँथरसारख्या महाराष्ट्रात आणि देशात आंबेडकरी आंदोलनाचे पर्व निर्माण करणार्या, दलित सेना, दलित महासभा, दलित कृती समिती, बहुजन समाज पार्टी आदी संघटनांना, पक्षांना देशभर जन्माला घालणार्या वादळाचा अधिनायक बनलो हे आश्चर्यच. त्यावेळी माझे वय होते अवघे तेवीस वर्षे.
आई-वडील, शिक्षक, आंबेडकरी विचारांचे बाळकडू लाभलेलं. शिकायला म्हणून प्रारंभी सांगलीला आणि नंतर एम.ए. साठी म्हणून मुंबईला आलो. शिक्षण आणि चळवळ एकत्रित सुरू. समजतं तेव्हापासून गाणे लिहिणं, वाचणं सुरू , माझे वडील मला तक्क्यात सर्वाना प्रबुद्ध भारत वाचून दाखवण्याचं काम कौतुकानं सांगायचे. त्यातून माझा पिंड पोसला आणि दलित साहित्याची दलित पँथरची चळवळ सुरू झाली तेव्हा माझा सूर मला सापडला. पुढे राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त करून मास मूव्हमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला हा निर्णय मान्य झाला नाही. आम्ही दलित पँथरचे काम चालू ठेवणार असे घोषित करून कामाला लागलो. त्यावेळचे माझे साथींदार होते रामदास आठवले, एस.एम.प्रधान, उमाकांत रणधीर, दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे. प्रीतमकुमार शेगावकर, विठ्ठलराव साठे आदी सगळ्यांनी मिळून अध्यक्षस्थानी माझी निवड केली. एस. एम. प्रधान उपाध्यक्ष, गाडे सरचिटणीस, आठवले नेते आणि दलित पँथर पुनश्च उभी राहिली.
नामांतर आंदोलनाने दलित पँथरच्या पुनर्निर्मितीला संजीवनी दिली. मराठवाडयात विद्यापीठ कार्यकारिणीने नामांतराचा प्रस्ताव एक मताने संमत केला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितले की, लोकांकडून ही मागणी येऊ द्या, आम्ही तिचा आदर करू. १२ ऑगस्टला दलित पँथरचा विराट मोर्चा घोषित झाला. मुंबईतील एका वृत्तपत्राने या मोर्चाचे वर्णन केले. मुंबई नगरीने असा मोर्चा आतापर्यंत पाहिला नव्हता. (नवभारत टाइम्स) सरकारचे धाबे दणाणले. मुख्यमंत्री मुंबईत नव्हते. गृहराज्यमंत्री शरद पवार होते. मोर्चाची लोकशक्ती अफाट होती. लोकांनी ओव्हल मैदान व्यापून टाकले. पोलिसांचे डोळे फिरले आणि मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला. स्त्रियांना, मुलांना, म्हातार्याकोतार्यांना जीवघेणी मारहाण झाली. मीही मरता मरता वाचलो. अनिल गोंडाणे नावाच्या एका कार्यकर्त्यांने पोलिस अधिकार्याला पायात पाय घालून पाडले. मी लाठीचार्जच्या तडाख्यातून सुटलो. पोलिसांच्या हल्ल्याचे पहिले लक्ष्य मी होतो.
या लाठीचार्जनंतर मात्र चळवळ अधिक धारदार बनली. लोक पेटून उठले. आम्ही महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन सुरू केले. सुरुवात नांदेड येथून झाली. मी व एस.एम.प्रधान यांच्या नेतृत्वाखाली १०,००० स्त्री-पुरुष तुरुंगात गेले. हाच प्रकार लातूर, उस्मानाबाद व इतर ठिकाणीही झाला. मी स्वत: जातीने सर्व ठिकाणी नेतृत्व केले व तुरुंगात भरती झालो. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रिया फार मोठया प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाचा परिणाम म्हणून २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय नवनिर्वाचित मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला.
विधीमंडळात ठराव एकमताने संमत होण्याच्या आदल्या दिवशी कौन्सिल हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. मराठवाडयातील आमदार नामांतर पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रसंग बाका होता. आता काय होणार? मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलायला उभा राहिलो.
''डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा यांचे अतूट नाते आहे. बाबासाहेब दलितांचे नेते तर मराठवाडा हा कमालीचा दलित प्रदेश आंबेडकरांनी या भागात पहिल्यांदा शिक्षण नेले. औरंगाबाद महाराष्ट्राची राजधानी करण्याची मागणी केली. निजामाचे संस्थान खालसा करण्यात पुढाकार घेतला. मराठवाड्याची अस्मिता आणि बाबासाहेबांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे व्हावे. मराठवाडा हा शब्द काढावयाचा नाही. तो तिथे हवाच. हा दुग्धशर्करा योग आहे. माझे सहकारी गाडे यांनी माझ्या भाषणाला पाठिंबा दिला. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रा. स. गवई यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले आणि त्यानंतर मराठवाडयातील आमदारांची मने बदलली.”
मुख्यमंत्री खूश झाले. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील हा पहिलाच निर्णय होता. त्यांनी मनापासून घेतलेला. या निर्णयाची यशस्वीता ही त्यांच्या कारकिर्दीची यशस्वीता होती. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर व्हावे, असा प्रस्ताव मांडला नसता तर मराठवाड्यातील आमदारांनी नामांतर प्रस्तावाला पाठिंबा दिला नसता. ती काळ्या दगडावरची रेघ होती. आम्ही यशस्वी झालो. मराठवाड्यातील आमदार तयार झाले. प्रस्ताव संमत झाला. प्रस्ताव संमत झाला त्यावेळी आम्ही सभागृहाबाहेर होतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा करीत होतो. त्याचवेळी मराठवाड्यातून बातमी आली. नामांतर विरोधकांनी प्रतिआंदोलन सुरू केले आहे.
Comments
- No comments found