नामविस्तार दिन

नामांतराचे दिवस – भाग 3

प्रा. अरुण कांबळे

दौर्‍यावर जाण्यासाठी पैसे नसत. ऐनवेळी कसेतरी पैसे गोळा करून जावे लागे. चालत्या गाडीत चढावे लागे. आरक्षण नसल्यामुळे रात्ररात्र जागरण करावे लागे. उभे राहून प्रवास करावा लागे. लागोपाठ जागरण व प्रवास यामुळे प्रकृतीवर परिणाम होई. कार्यक्रमावरही त्याचा परिणाम होत असे. कार्यक्रमाला मात्र लोकांची तुफान गर्दी होई. लोक आमची तासन् तास वाट पाहत असत. कार्यक्रमाला हारांचे ढीग पडत असत. पण भाषणाच्यावेळी पोटात अन्न नसल्यामुळे बोलणे अवघड जाई. आवाज ही बसलेला असे.

नामांतराच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मोर्चे निघाले. मुंबईत मंत्रालयावर निघालेले काही मोर्चे फारच प्रचंड होते. सर्वत्र सत्याग्रह, जेलभरो आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, उपोषणे हे मार्ग लोक अवलंबित होते. या आंदोलनाचे नेतृत्व अर्थातच दलित पँथरकडे होते. आमची जबाबदारी वाढली होती. रात्रंदिवस सभा, संमेलने, मेळावे, परिषदा असे कार्यक्रम होत होते. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडयात कार्यक्रमाची गर्दी असे. कार्यकर्ते अतिउत्साहात कार्यक्रम ठेवीत. अनेकदा न विचारता निश्चिती न करता कार्यक्रम ठेवले जात व नंतर गळझटीला येत. काहीही करा पण कार्यक्रमाला चला. आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. लोकांसमोर जाता येणार नाही. वर्गणी गोळा केलेली आहे वगैरे. आमची ख्याती वेगळीच असे.

दौर्‍यावर जाण्यासाठी पैसे नसत. ऐनवेळी कसेतरी पैसे गोळा करून जावे लागे. चालत्या गाडीत चढावे लागे. आरक्षण नसल्यामुळे रात्ररात्र जागरण करावे लागे. उभे राहून प्रवास करावा लागे. लागोपाठ जागरण व प्रवास यामुळे प्रकृ तीवर परिणाम होई. कार्यक्रमावरही त्याचा परिणाम होत असे. कार्यक्रमाला मात्र लोकांची तुफान गर्दी होई. लोक आमची तासन्तास वाट पाहत असत. कार्यक्रमाला हारांचे ढीग पडत असत. पण भाषणाच्यावेळी पोटात अन्न नसल्यामुळे बोलणे अवघड जाई. आवाज ही बसलेला असे. कार्यकर्त्यांचाही यात काही दोष नसे. ते कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्रास घेत. नंतर आमची वाट पाहात. सगळया गाडया धुंडाळत बसत. आम्ही डब्यातून धडपडत उठत बाहेर आलो की कार्यकर्ते घोषणा देत आमची मिरवणूक काढत. आधीच कार्यक्रमाला वेळ झालेला असल्यामुळे जेवणखाण करण्याचा प्रश्नच नसे. रात्री सभा उशिरा संपे. मग दोन-तीन वाजता डुलक्या घेत घेत जेवण होई. नंतर कार्यकर्त्याशी चर्चा. झोप किं वा लगेच पुढच्या गावचा प्रवास करणे भाग पडे.

या सगळया चक्रातून जात असताना मला माझी प्राध्यापकाची नोकरी ही सांभाळावी लागत असे. कारण ती माझी हक्काची भाकरी स्वाभिमानाची चाकरी होती. इतरांची गत तर आणखीनच वाईट होती. या सगळयांचा परिणाम म्हणून मी आजारी पडलो. क्षयाची बाधा झाली काय असे वाटण्याइतपत प्रकृती बिघडली. इंजेक्शनचा कोर्स घेतला आणि पुन्हा कामाला लागलो. उसंत घ्यायला वेळ नव्हता. त्यातच मुख्यमंत्र्याच्या बैठकी, अत्याचारग्रस्तांची गार्‍हाणी, मदतीसाठी अर्ज वगैरे. नेतृत्वाचा मुकूट डोक्यावर होता. काटे बाकीच्यांना दिसत नव्हते. अनेकदा प्रश्न पडे, आपण राजा आहोत की पोतराजा? पण सभा, संमेलने गर्दी यांच्या धुमचक्रीत एवढा विचार करायला वेळ कुठला? लोकांचे प्रेम तर अपरंपार. ओवाळण्यासाठी आया-बहिणींच्या रांगा, आम्हाला अमान्य असले तरी सहन करावे लागे. चहा प्यायला जाणे हा एक कार्यक्रमच असे. सगळयांच्या घरी जावे लागे. मी तर चहाही न पिणारा. त्यामुळे मला नुसतेच जाऊन बसावे लागे. परंतु लोकेच्छेचा आदर करावा लागे. त्यांचे प्रेम तर असे की, त्यांच्या कथांचा संग्रहच करावा लागेल.

जगातील फार थोडया नेत्यांच्या वाट्याला असे प्रेम आले. माझ्या अठरा विश्वे दरिद्री समाजाने असे प्रेम मला आम्हाला दिले की, त्याची उतराई कधीही करता येणार नाही. प्रेमाची नशा आम्हालाही चढत असे, त्याचमुळे असेल. मी मान कधीही खाली झुकवली नाही. बाणा ताठ राहिला. मोडलो पण वाकलो नाही. नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. दिल्लीहून पंतप्रधानांपासून निरोप आले. पण आमिषाला बळी पडलो नाही. हा स्वाभिमान कोठून आला? ही सूर्यशक्ती  कोठून मिळाली, याचा आज विचार करतो तेव्हा समजते, हे बळ बाबासाहेबांच्या विचारांपासून, त्यांच्या व्यक्तिमत्वापासून मिळाले आणि त्याला पीळ बसला तो माझ्या अर्धपोटी, नागडया- उघडया बांधवांच्या प्रेमाचा. त्यांची ही निष्ठा, प्रेम, भाबडेपणा आमच्यातील प्रामाणिपणाला कारणीभूत ठरला भ्रष्टाचार जाळून टाकण्याचे सामर्थ्य त्यात होते. त्यामुळे आम्ही अधिकच प्रदीप्त झालो. मराठवाड्यातील हिंसाचारानंतर पंतप्रधान व सर्वपक्षीय नेत्यांना यासंबंधीची माहिती देण्यासाठी मी स्वत: दिल्लीला गेलो. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या भेटीचा सविस्तर वृत्तांत मी अन्यत्र कथन केला आहे. तो गंमतीदार आहे. श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी आमची चांगली विचारपूस केली. आगतस्वागत केले व मराठवाड्याचा दौरा करण्याची इच्छाही व्यक्त केली. बाबू जगजीवनराम हे दलित नेते. बाबूजींनी त्यावेळी असे उद्गार काढले की ‘आप लढो हम सत्तामें रहेंगे’

मी यशवंतरावांना भेटत असे. यशवंतरावांनी नेहमीच्या पद्धतीने माझे स्वागत केले. साहित्यिक घडामोडीसंबंधी चर्चाही केली. मराठवाड्यातील हिंसाचाराबद्दल बोलणे सुरू झाले तेव्हा अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती असलेली ध्वनिफित मी त्यांना ऐकवली. दलितांच्या मदतीला धावून जाणार्‍या नांदेडच्या महाजन पाटलाची हकीकत ऐकून यशवंतराव भारावले. त्यांच्या डोळयातून अश्रूधारा वाहिल्या, माझा हात धरून ते म्हणाले, ” आमचीही स्थिती महाजन पाटलांसारखी आहे. मराठवाड्यातील लोक माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.”यशवंतरावांचे ते पाणावलेले डोळे आजही माझ्या डोळयांसमोर दिसताहेत. एक प्रसंग आठवतो. नामांतराच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी नागपूरला एक बैठक बोलावली. बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. मी बोलायला उभा राहिलो. लोकशाही प्रथेप्रमाणे ठरावाची अंमलबजावणी आताच करा अन्यथा ती होणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली होती. स्वत: अण्णा एस.एम. जोशी मला म्हणाले अरुण, शरदला थोडा वेळ देऊ , त्याच्या मनात नामांतराचे आहे. मी बधलो नाही. अखेर मुख्यमंत्री शरद पवारांनी मला स्वत: चिठ्ठी पाठवली. त्यावर त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिले होते, अमुक अमूक तारखेपर्यंत नामांतर करतो. तोपर्यंन्त आंदोलन करू नका. मला वेळ द्या.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला फाटक्या माणसाला हस्ताक्षरात पत्र लिहून वेळ द्या, असे म्हणतो हे सामर्थ्य आंदोलनातून निर्माण झाले. (मुख्यमंत्र्यांनी पत्रात दिलेल्या तारखेच्या तीन दिवस अगोदर त्यांचे सरकार बरखास्त झाले व नामांतराचे भिजत घोंगडे तसेच राहिले हे अलाहिदा). अशा आंदोलनाचा मला अभिमान वाटतो. हीच माझी कमाई! हीच दौलत! यापुढे कोणत्याही पदाची मला कधीच किंमत वाटली नाही. पुढेही वाटणार नाही.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.