लोकांनी लोकांसाठी...

कोकणाचं माळरान करण्याचा डाव

मुश्ताक खान, सिंधुदुर्ग
जगभरात प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्यालाच नामशेष करण्याचा प्रयत्न सरकारनं 2004मध्ये केला होता. गिर्ये परिसरात औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा बेत आखला होता. त्यासाठी हुकूमशाही, दंडुकेशाही आणि अगदी जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या होत्या. पण त्याला भीक न घालता इथल्या नागरिकांनी व्यवस्थेविरुद्ध लढा उभारला अन् सरकारला माघार घ्यायला लागली...
 

ही घटना आहे 2004च्या आसपासची. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गिर्ये गावात चार हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करण्याचा मानस त्यांनी आखला. त्यानंतर त्यांनी गिर्ये गावातून प्रकल्प हलवून सौंदाळे गावात नेला. पण इथल्या स्थानिक नागरिकांना त्याची कानोकान खबर होणार नाही याची खबरदारीही त्यांनी घेतली. पण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्दैवानं खारेपाटणच्या बाजारात गेलेल्या इथल्या तरुणांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी मग गावात येऊन रिक्षावरून माईकनं ही माहिती लोकांना पुरवली. तरुणांनी स्वत:हून पुढाकार घेऊन पंचक्रोशीतील लोकांना जागं केलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाविरोधातल्या लढ्याला सुरुवात झाली. rat


सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा. खरं तर इथल्या आंबा, पोफळी आणि नारळाच्या बागायती वाचवणं सरकारचं कर्तव्य आहे. पण तसं न करता त्यांनीच इथल्या सौंदर्याला बाधा पोहोचेल असा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला.

ऊर्जा प्रकल्प येणार हे कळल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता वाडा, वाघोटन, सौंदाळे, तिरलोट, विजयदुर्ग, गिर्ये, पुरळ आणि पडेल या गावातील नागरिक रवळनाथ मंदिरात जमले आणि प्रकल्प येऊ देणार नाही, हा एकमुखी निर्णय झाला. याच मंदिरात समन्वय समितीची स्थापना झाली. इथं एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे इथं त्यांनी संघर्ष समिती स्थापन केली नाही.

समन्वय समितीचे अध्यक्ष सुधीर जोशी आणि सचिव इंदिराकांत महांब्रे यांनी लढ्याची धुरा सांभाळली आणि गावं पिंजून काढली. जीव गेला तरी बेहत्तर, पण प्रकल्प येऊ देणार नाही, असा वज्रनिर्धार गावकऱ्यांनी केला. चार वर्षं भूक, तहान विसरून या परिसरातील लोकांनी लढा सुरूच ठेवला.

सिंधुदुर्गातले नेते असोत किंवा जिल्हाधिकारी सर्वांनी प्रकल्प कसा चांगला आहे हे इथल्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. जुन्या प्रकल्पांचे दाखले दिले. एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना इथं बोलावून घ्या, असंही त्यांनी सांगितलं, पण कुणीही आलं नाही. अखेर तहसीलदार कार्यालयात दिल्लीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. पण लोकांना प्रस्थापित करण्याच्या बाबतीत, आंब्याच्या संरक्षणाच्या बाबतीत त्यांना काहीच ठोस उत्तर देता आलं नाही. त्यानंतर इथल्या लोकांना समजावण्यासाठी ते कधीच आले नाहीत.

rat3देवगडच्या या गावांमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प नको, अशा घोषणा होत असतानाच इथले पालकमंत्री नारायण राणे यांनी विरोध करणाऱ्यांची 'डोकी फोडू'  असं वक्तव्य पडेल हायस्कूलच्या मैदानात झालेल्या सभेमध्ये केलं, अशी माहिती समन्वय समितीचे सचिव इंदिराकांत महांब्रे यांनी दिली. तरीही इथल्या लोकांनी त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही.

 आंदोलनाची तीव्रता वाढत असताना अनेकदा आंदोलक आक्रमक होतात. पण इथं झालं उलटंच. नारायण राणेंच्या ताफ्याबरोबर आलेल्या लोकांनीच स्थानिकांवर दगडफेक केली. त्यात राज्याचे माजी मंत्री भाईसाहेब गिरकर आणि सदा ओगळे जखमी झाले. पण आम्ही संयम राखत त्यांच्यावर प्रतिहल्ला केला नाही, असंही इंदिराकांत महांब्रे म्हणाले.

नारायण राणेंनी त्यांना मुंबईत येण्याचं आमंत्रणही दिलं, पण इथल्या लोकांनी स्वत:च्या खर्चातून राज्यातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची माहिती मागवली. त्यांनी विजयदुर्ग गावच्या चंदू वेलणकर यांची यासाठी निवड केली. त्यानंतर डहाणू, चंद्रपूर, परळी आदी ठिकाणच्या प्रकल्पांची माहितीवजा शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली. तेव्हा त्यांच्या असं निदर्शनास आलं की, डहाणूतला चिकू उद्ध्वस्त झाला होता, तिथे राखेचा डोंगर तयार झाला होता आणि पाण्याची नासाडी झाली होती. त्या सर्व परिसरामध्ये भाजीपाला आणि बागायतींची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. हे सर्व पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये अधिकच उद्रेक झाला. यावेळी तर त्यांनी प्रकल्प होऊ न देण्याचा पणच केला.

राष्ट्रवादीचे नेते कुलदीप पेडणेकर यांनी मत्स्यपालन, फळबागा आणि भाजीपाल्यावर काय परिणाम होईल याची शास्त्रोक्त माहिती दिली. त्याचाही परिणाम इथल्या लोकांच्या मनावर झाला. मग देवगडचे आमदार अजित गोगटे यांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी संघर्ष समितीची स्थापनाही केली. इथला प्रकल्प घालवण्यासाठी मी सर्वात पुढे असेन, अशी घोषणाही दिली. मात्र प्रकल्पाच्या परिसरात ते एकदाही फिरकले नाहीत, असं महांब्रे यांनी सांगितलं.

नंतर नंतर तर नारायण राणेंनीही माघार घेतल्याची परिस्थिती इथं निर्माण झाली. अखेर तिरलोटमध्ये सभा घेऊन त्यांनी शेवटचा प्रयत्न करून पाहिला. पण पंचक्रोशीतील लोकांनी विरोध कायमच ठेवला. त्यानंतर जवळजवळ दोन महिने काहीच हालचाल झाली नाही. पण अचानक महाजन नावाचे अधिकारी प्लान आणि प्रकल्पाचं साहित्य घेऊन आले. त्यामुळं संतापलेल्या लोकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावलं. त्यानंतर या प्रकल्पाचं नाव कुणीही काढलं नाही आणि अशा प्रकारे हा लढा यशस्वी झाला...

आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणं भारतात एखादी समस्या सोडवण्यापेक्षा दुसरीकडं स्थलांतरित करतो. त्यामुळं हा प्रकल्प आता वेंगुर्ल्यात हलवण्यात आला आहे. तिथे विरोध सुरूच आहे... आता ती लढाई यशस्वी होते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणी माणूस जर इरेला पेटला तर तो कुणालाही जुमानत नाही हे या लढ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे... सर्वसामान्य माणसांच्या या लढ्याला ‘भारत4इंडिया’चा सलाम...

 


Comments (4)

  • धन्यवाद...भारत४इंडियाचाही सलाम...

  • धन्यवाद... महांब्रे सरांचं आणि ग्रामस्थांचं कौतुकच आहे... अशा लोकांची देशाला जास्त गरज आहे...

  • लोकशाहीतील सामान्य माणसांच्या या लढ्याला माझा सलाम....

  • This is the start of the new India.... we love nature and beauty.....

    Hats off to all of them....

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.