तुळजापुरात 'जागर पाण्याचा'

पाण्याचा जागर होणार बांधा-बांधापर्यंत

यशवंत यादव/विवेक राजूरकर, तुळजापूर
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस)चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलसाठी देशभरातून आलेल्या हजारांवर तरुणाईनं पाण्याचा जागर घालण्यासाठी गावागावांतच नव्हे तर अगदी बांधाबांधापर्यंत जाण्याचा निर्धार केला. गेले तीन दिवस सुरू असणाऱ्या या फेस्टिव्हलची आज रात्री सांगता झाली. त्यावेळी तरुणांनी हा निर्धार बोलून दाखवला. `युथ अॅण्ड वॉटर-मेकिंग एव्हरी ड्रॉप काऊंट` ही या फेस्टिव्हलची मध्यवर्ती संकल्पना होती. तरुणांना इथून मिळालेलं टॉनिक आणि त्यांनी केलेला निर्धार पाहता हा फेस्टिव्हल य़शस्वी झाल्याची भावना 'टीस'च्या प्राध्यापकांनीही बोलून दाखवली.
 

DSC00438टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या संस्थेच्या गुवाहाटी, हैदराबाद, मुंबई आणि तुळजापूर या चार ठिकाणी शाखा आहेत. 'भारत4इंडिया' याचा मीडिया पार्टनर होता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईनं उग्र रूप धारण केलंय. या अनुषंगानं पाण्याचं महत्त्व लक्षात घेता, पाण्याच्या एका एका थेंबाच्या काटेकोर वापराचा प्रसार करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे.
या फेस्टिव्हलच्या उदघाटनास उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, तसंच पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार पद्मसिंह पाटील, तेरणा साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हाटे, टाटा संस्थेचे संचालक एस. परसुरामन, स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डीन एस. पेपिन उपस्थित होते.

युवा महोत्सवात मान्यवरांनी तरुणांना मार्गदर्शन केलं

मधुकरराव चव्हाण, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री -
टाटा सामाजिक संस्था गेली 27 वर्षं या दुष्काळी भागात चांगलं काम करत आहे. येथील युवकांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मदत करावी. या युवकांनी ग्रामीण भागात जाऊन पाण्याचा काटकसरीनं कसा वापर करावा, छतावरील पावसाचं पाणी साठवून ते कसं वापरात आणावं. पाणलोट विकास, शेततळी याबाबत शेतकरी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करावं. पाण्याची खोल गेलेली पातळी वाढवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी मदत करावी. भूगर्भातील पाणी कमी होत असून ते वाढवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. कूपनलिका खोदण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचं नियोजन चांगल्या पध्दतीनं कसं करावं, याबद्दल तसंच शेतीसाठी ठिबक सिंचन पध्दतीचा प्रचार व प्रसार करावा. गावागावातील लोकांची व्यसनापासून मुक्ती करण्यासाठीही युवकांनी पुढं यावं.

खासदार पद्ममसिंह पाटील
15 वर्षांपूर्वी विहीर आणि बोअर घेतली की 50 ते 60 फुटांवर पाणी लागायचं. पण आता 600 फुटांवरही पाणी लागत नाही. यंदाचा दुष्काळ 1972च्या दुष्काळापेक्षाही खडतर आहे. पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यावर भर दिला पाहिजे. यामुळं परिसरात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. मी पाटबंधारे मंत्री असताना उस्मानाबाद जिल्ह्यात 720 गावांत 930 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधले. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गावागावांत जाऊन पाणी बचतीचा संदेश द्यावा. शेततळी, साठवण तलाव, ठिबक सिंचन या शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे
पाणी हेच जीवन... पाण्याबद्दल युवकांनी योग्य भूमिका घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवावी. आता पाण्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून छतावरच्या पाण्याचा उपयोग केला पाहिजे. शहरातील लोकांनीही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. पाणी रिसायकलिंग करण्याबाबतही विचार करावा. असे प्रयोग चेन्नई आणि इंदौर या ठिकाणी यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा. पिकांना ड्रीप सिंचन सक्तीचं करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार याबाबत आग्रही आहेत. पाणी अडवून ते जिरवलं पाहिजे. भूगर्भातील पाणी पातळी कशी वाढेल, याकडं लक्ष देण्याची गरज आहे. यामुळं दुष्काळ हटवण्यासाठी मदत होईल. अवेळी पडणारा पाऊस, कमी पर्जन्यमान यामुळं वॉटर टेबल खाली गेलं आहे. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घ्यावा.

प्रो. परसुरामन - संचालक टाटा सामाजिक विज्ञान संस्था
तुळजापूरमधील ही संस्था गेल्या 27 वर्षांपासून भागातील लोकांसाठी कार्यरत आहे. युवकांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पाणी बचतीचा आणि जलसंधारणाचा प्रसार करावा, यामुळं दुष्काळावर शाश्वत उपाय मिळेल. लवकरच या रुरल कॅम्पसमध्ये 1200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करणार आहोत.

डॉ. सुभाष व्हट्टे, जि.प. अध्यक्ष, उस्मानाबाद
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा युवकांनी आदर्श ठेवावा. ग्रामीण भागातील लोकांसाठी युवकांनी अनेक विधायक उपक्रम हाती घ्यावेत. युवाशक्तीनं एकत्र येऊन ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी कार्य करावं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.