तुळजापुरात 'जागर पाण्याचा'

'टीस'चं जलसाक्षरतेचं मॉडेल

विवेक राजूरकर, तुळजापूर
दर आठ-दहा वर्षांनी दुष्काळ पडतोच आणि आपण केवळ 'दुष्काळ, दुष्काळ' असा जप करत मायबाप सरकारच्या वाटेवर डोळे लावून बसतो. दुष्काळावर मात करण्यासाठी सध्या तरी जलसाक्षरता हाच उपाय आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर शाखेनं पडणाऱ्या आणि वापरात येणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब कारणी लावलाय. त्यांचा हा उपक्रम कोणत्याही मोठ्य़ा संस्था, सोसायट्या यांनी आवर्जून अनुकरण करावं, असाच आहे.
 

100 एकरवरील प्रकल्प
दुष्काळ हा काही आपल्या महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाचा दुष्काळही त्यातलाच. आपण जर समस्या उद्भवण्याआधीच त्यावर उपाय योजले तर आपण त्या परिस्थितीशी चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. पण 'नेमेचि येतो पावसाळा' याप्रमाणं आपण निसर्गाला गृहीत धरून आपलं कर्तव्य विसरतो. आणि तिथंच घोडं पेंड खातं. परंतु काही सामाजिक संस्था त्याला अपवाद आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारी 'टीस' ही त्यापैकीच एक. संस्थेला सरकारकडून १९८९ ला १०० एकर जमीन मिळाली. तुळजापूरपासून जवळपास ७ ते ८ किलोमीटर अंतरावर माळरान आणि डोंगरमाथ्यावर असलेला हा उजाड परिसर. त्यावेळेस तिथं पाण्य़ाचा एक टिपूसही शोधून सापडत नव्हता. अशा या परिसरात एक मोठी सामाजिक शैक्षणिक संस्था उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं. मात्र, हिंमत न हरता पाण्याचं योग्य व्यवस्थापन करत प्रा. राम राठोड यांच्यासारख्या अनेक कर्तव्यनिष्ठ शिक्षकांनी पाणलोट विकासाचं मॉडेल तिथं विकसित केलंय. अनेक उतारांवर दगडी बांध घातले. 'पाणी अडवा पाणी जिरवा' याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आणि या सर्वांवर मात करीत रेन वॉटर हार्वेस्टिंगचं (पावसाचं पाणी संकलित करून त्याचा पुनर्वापर) अतिशय सुंदर मॉडेलही विकसित केलंय.

tiss water harwesting111रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बरंच काही
या परिसरात प्रत्येक उतारावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संकलन एकत्रित करून इमारतीच्या खाली एका टॅंकमध्ये ते गोळा केलं जातं. तसंच प्रत्येक इमारतीच्या छतावर देखील जमा होणारं पावसाचं पाणी कोपऱ्यातून आऊटलेट करून ते त्याच इमारतीच्या खाली असलेल्या टॅंकमध्ये गोळा केलं जातं. या टॅंकची क्षमता जवळपास ४० ते ५० हजार लिटर इतकी आहे. या टॅंकमध्ये साचलेलं अतिरिक्त पाणी नंतर एका पाईपलाईनद्वारे चेक डॅममध्ये सोडलं जातं. या चेक डॅंममध्ये जमा होणारं अतिरिक्त पाणी तिथून पुढं असलेल्या रामधरा या तलावात सोडलं जातं. पुढं याच तलावातील पाणी आणि जमिनीत मुरलेलं पाणी डोंगरपायथ्याशी असलेल्या अनेक बोअरवेल्सना उपलब्ध होतं आणि तिथून परत या सर्व परिसराला उपलब्ध होतं.

सांडपाण्याचा पुनर्वापर
याशिवाय परिसरातील प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला संस्थेनं चर खोदले आहेत. पावसाळ्यातील पाणी या रस्त्यावरून वाहत या चरीत मुरतं. तसंच परिसरातील मोकळ्या जागेतही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. त्यामुळं नैसर्गिकरीत्या पाण्यासोबत जमिनीचं संवर्धन होतं आणि जमिनीची धूप थांबते. आजमितीस जवळपास ५ लक्ष लिटर पावसाचं संकलित पाणी या संस्थेच्या टॅंकमध्ये उपलब्ध आहे. बाहेर परिसरात जमा होणारं पाणी, छतावर जमा होणारं पाणी, हे सर्व संकलित करण्याबरोबरच विद्यार्थी वसतिगृह, उपाहारगृहातील टाकाऊ सांडपाण्याचाही इथं पुनर्वापर केला जातो. वसतिगृहातील स्नानगृहातील, स्वयंपाकगृहातील पाणी एकत्रित करून एका आऊटलेटद्वारे इमारतीबाहेर एका टॅंकमध्ये सोडलं जातं. या ठिकाणी नैसर्गिकरीत्या ते फिल्टर केलं जातं. (या टॅंकमध्ये मोठे खडक, गारगोटे, लहान खडी, आणि वाळूचा थर वापरून नैसर्गिक फिल्टर तयार करण्यात आला आहे.) ते पाणी नंतर एका मोठ्या टॅंकमध्ये घेऊन त्याच्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. नंतर हेच पाणी परिसरातील झाडांसाठी वापरलं जातं. तसंच याच पाण्यावर इथं भाजीपाला घेतला जातो आणि एक रोपवाटिकाही जगवली जाते.

विहीर, बोअरचं पुनर्भरण
संस्थेच्या आवारात विहीर पुनर्भरण, बोअरवेल्स पुनर्भरणाचेही प्रयोग यशस्वीपणं राबवण्यात आले आहेत. त्यामुळं उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब या ठिकाणी वापरला जातो. हे प्रयोग त्यांनी केवळ आपल्या संस्थेपुरतेच मर्यादित ठेवलेले नाहीत. संस्थेला भेट देण्याऱ्या प्रत्येकास या जलसाक्षरतेची ओळख आवर्जून करून दिली जाते. राज्यभरातील शेतीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था, शेतकरी, विद्यार्थी इथं भेट देऊन जलसाक्षरतेचे धडे गिरवतात. जलसाक्षरतेचे हे धडे हाच दुष्काळावर मात करण्याचा हुकमी उपाय आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.