जागर पाण्याचा

साताऱ्याचा गोडोली तलाव कात टाकतोय

शशिकांत कोरे, सातारा
 राज्यात एकीकडं पाणीटंचाई तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला पाण्याचा जागर सुरू झालाय. अनेक ठिकाणी लोक स्वतःहून पुढं येत स्वयंस्फूर्तीनं काम करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करतायत. साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तलावातील गाळ काढण्याचं काम श्रमदानातून सुरू झालंय. लोकसहभातून लोकपहाऱ्यात होत असलेल्या या कामामुळं सातारकरांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई आहे. सिंचन घोटाळ्यावरून महाभारत सुरू आहे. पण त्यातून राजकारणापलीकडं काही साध्य होईल, असं दिसत नाही. अशाच वेळी लोकांनी पुढाकार घेत पाण्याचा जागर सुरू केलाय. 

गोडोलीकरांचा पुढाकार

सातारा हे तलावांचं शहर. तलावांचं अस्तित्व टिकावं आणि त्यांचं संवर्धन व्हावं, अशी भावना सातारकरांची आहे. मात्र, मायबाप सरकारपुढं गाऱ्हाणं मांडण्यापलीकडं त्यांची धाव फारशी गेली नाही. गोडोलीकर त्याला अपवाद ठरलेत. 'आम्ही गोडोलीकर' संस्थेचे डॉ. अविनाश पोळ यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागाचं महत्त्व पटवून दिलं. आज गोडोलीकरांचे शेकडो हात या कामात गुंतलेत. यानिमित्तानं सुमारे 50 वर्षांनंतर गोडोली तळ्यातील गाळ काढला जातोय. याशिवाय साडेचार एकर क्षे़त्रात नव्यानं तलाव बांधला जातोय. जेसीबीसारखी आवश्यक यंञसामग्री प्रशासनानं दिलीय, तर तलावाच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून दगड, विटा, सिमेंट आणलं जातंय. श्रमदानासाठी तर गोडोलीकर बाह्या सरसावून तयार आहेत. 

नैसर्गिक स्रोत जिवंत झाले 

विशेष म्हणजे, तलावाचं काम सुरू करताच नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत होऊ लागलेत. काम पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यातही या तलावात पाणी राहील आणि पावसाळ्यात तर तलाव भरून वाहील, याची खात्री सर्वांनाच झालीय. यंदा पाऊस कमी पडल्यानं ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. ही आपत्ती इष्टापत्ती मानून काम केलं तर नक्कीच मोठं काम उभं राहू शकतं, हेच यावरून दिसतंय.


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.