जागर पाण्याचा

१८ वर्षं सेवा करणारा महात्मा

शशिकांत कोरे, सातारा
सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? याची उत्तरं वेगवेगळी मिळतील. पण पाण्यापेक्षा मोठं दान असूच शकत नाही, असा संदेश महात्मा जोतिराव फुले यांनी दिला होता. घरातला पाण्याचा हौद जनतेसाठी खुला केला होता. जोतिरावांचा हाच वारसा चालवतंय साताऱ्याजवळील वनवासवाडी इथलं लोखंडे कुटुंबीय. दुष्काळी जनतेला हे कुटुंब लाखो लिटर पाण्याचं दान करतंय.

१८ वर्षांपासूनची सेवा 

राज्यभर पाणीटंचाई जाणवतेय. सरकारनं या टंचाईवर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. पण आपण स्वत:हून यासाठी काही तरी करू शकतो, असा विचार प्रत्येकानंच करायला हवा. तसा विचार केलाय, वनवासवाडी इथल्या दिलीप लोखंडे यांनी. लोखंडे कुटुंबीय गेली १८ वर्षे आपल्या विहिरीतलं पाणी टंचाईग्रस्त जनतेला दान करतंय. आजपर्यंत त्यांनी लाखो लिटर पाणी दान केलंय. आजही करत आहेत. 

 

घराण्याची परंपरा

दिलीप लोखंडे यांची स्वतःची दहा एकर शेती आहे. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. त्यामुळं आपण समाजासाठी काही तरी करावं, अशी भावना लोखंडे कुटुंबियांच्या मनात आली. त्यातूनच त्यांनी हे 'पाणी दान' सुरू केलं. या दानाची परंपराच आमच्या घराण्यात आहे, असं लोखंडे अभिमानानं सांगतात. पिण्याच्या पाण्यासाठी मोफत तर टँकरसाठी केवळ ३० रुपये घेऊन लोखंडे पाणी देतात. हे पाणी बांधकाम, शेती आणि व्यवसायीक कारणासाठीही वापरलं जातं. बाजारात बिसलरीच्या एका लिटरच्या बाटलीमागं 15रुपये घेतले जातात. त्याच वेळी विहिरीतलं पाच हजार लिटर पाणी केवळ ३० रुपयांना देणाऱ्या लोखंडे यांच्याबद्दल टँकरवाल्यांसोबतच सामान्य जनतेलाही आदर आहे. हे ३० रुपयेही विहिरीवरील पाणी उपसणाऱ्या इंजिनला लागणाऱ्या डिझेलचा खर्च म्हणून घेतले जातात. हे इंजिन दुरुस्त करताना विजेचा शॅाक बसून त्यांचा हात निकामी झाला होता. सुदैवानं या संकटातून ते बचावले.  पाणी वाटण्याचं पुण्यच यासाठी कामी आलंय असं दिलीप लोखंडेंना वाटतंय.

 

दिवसभर आपल्या विहिरीवर एखाद्या मजुराप्रमाणं दिलीप लोखंडे स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यही काम करतात. एखाद्या टँकरवाल्यानं पैसे दिले नाहीत तरी त्यांची हरकत नसते. पैसे न देणारालाही ते पाणी नेऊ देतात.  

 

आज लोखंडेंच्या विहिरीवरून महिन्याला दीड कोटी लिटर पाणी दान केलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचीही लोखंडेंवर कृपा आहे. त्यांच्या विहिरीला अगदी उन्हाळ्यातही भरपूर पाणी असतं. आपल्या विहिरीचं पाणी लोकांना उपयोगी पडतंय, याचच त्यांना केवढं तरी समाधान आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.