जागर पाण्याचा

योग्य नियोजनानं दुष्काळावर मात

विवेक राजूरकर, औरंगाबाद
पावसाच्या लहरी स्वभावामुळं शेती करणं दुरापास्त झालं होतं. शेतीत गुंतवलेल्या पैशाचीसुद्धा परतफेड होत नव्हती. सातत्यानं येणाऱ्या तोट्यामुळं शेतीची भिस्त ही पाण्यावरच असल्याचं पांडुरंग इनामे यांना लक्षात आलं. त्यांनी मग बॅंकेत पैसा साठवण्यापेक्षा पाण्याची बॅंकच तयार करण्याचा निर्णय घेतला. इनामे यांनी पाण्याची बॅंक कशी निर्माण केली ते पाहूया...

यंदाही पावसानं दगा दिल्यामुळं मराठवाड्यात कधी नव्हे इतका दुष्काळ पडलाय.  कोरडे तलाव, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट, अनेक विहिरी तर पूर्णपणं आटल्यात, बोअरवेल शुष्क झाल्यायत, पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. यापूर्वी पडलेल्या दुष्काळात विहिरीचं पाणी तरी आटत नसे त्यामुळं पावसाळ्यापर्यंत या विहिरींवर लोकांची तहान भागत असे. मात्र सद्य परिस्थितीत मराठवाड्यात पिण्याचं पाणीसुद्धा मिळणं दुरापास्त झालंय, मग शेतीसाठी पाणी मिळणं ही तर फार दूरची बाब. आज पाणी नसल्यानं हजारो हेक्टर फळबागा नष्ट झाल्यात. अनेक शेतकऱ्यांवर तर आपल्या फळबागा नष्ट करण्याची नामुष्की ओढावलीय.

अशी विदारक परिस्थितीही काही शेतकऱ्यांनी पाण्याचं योग्य नियोजन आणि काटेकोर वापरातून आपल्या फळबागा टिकवून ठेवल्या आहेत, या शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांना जीवदान तर दिलंच, शिवाय या बागांमधून चांगलं उत्पन्नसुद्धा घेण्याचा प्रयत्न केलाय. यापैकीच एक आहेत औरंगाबाद तालुक्यातील रांजणगाव येथील पांडुरंग इनामे. 

इनामे यांनी प्रथम आपल्या शेताजवळून वाहणाऱ्या ओढ्याला दगडी बांध घातला. यासाठी 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही पद्धत वापरून त्यांनी स्वखर्चानं शेतीच्या वरच्या भागात पाच दगडी बंधारे बांधले. यामुळं पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरत गेलं. त्यामुळं परिसरातील विहिरींना पाणी आलं. त्यानंतर त्यांनी बॅंकेचं कर्ज काढून त्या पैशात २०० बाय २००चं शेततळं घेतलं. विहिरीतील पाणी शेततळ्यात आणि शेततळ्यातील पाणी ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे फळबागांना देण्याची व्यवस्था केली. या शेततळ्यात एक कोटी लिटर पाण्याची साठवण होऊ लागली. या पाण्याचा काटेकोर वापर करत मोसंबी, चिकू, आंबा, डाळिंब या फळपिकांसोबत कापूस, उसासारखी नगदी पिकंही मोठ्या हिंमतीनं इनामे यांनी जगवली. 

आज मराठवाड्यातील अनेक शेतकरी हवालदिल झालेले असताना पांडुरंग इनामे मात्र आपल्या शेततळ्याच्या भरवशावर आपली फळबाग टिकवून आहेत. पाण्याच्या योग्य नियोजनाबरोबरच त्यांनी पिकांचंही योग्य व्यवस्थापन केलंय. मुख्य पिकासोबत आंतरपीक घेऊन त्यातूनही उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केलाय. इनामे यांची उसाचं पीक घेण्यामागं दूरदृष्टीच आहे. हे पीक निव्वळ उत्पन्न मिळवण्यासाठी न घेता आपल्या जवळपास ३० ते ३५ जनावरांना सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची कमतरता भासू नये याची काळजी त्यांनी घेतली. नाहीतर या भागातील अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी जनावरं विक्रीस काढली आहेत. 

त्यांनी उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर आपल्या शेतात केलाय. याशिवाय आपल्या शेततळ्याचा योग्य वापर करत, कृषी विभागाच्या मदतीनं मस्यशेतीसुद्धा केली. मस्यशेतीतून त्यांना दरवर्षी ९० हजार ते एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवत असते, तसंच तिला काळानुरूप वागायलाही शिकवते... पाण्याच्या टंचाईनं पांडुरंग इनामे यांना एक प्रयोगशील शेतकरी बनवलं... वर्षाकाठी इनामे यांना सर्व खर्च वजा जाता निव्वळ १५ ते १८ लाखांचं उत्पन्न सहज मिळतं. आज मराठवाड्याच्या भीषण दुष्काळातही इनामे धैर्यानं तोंड देत आहेत... पाण्याचं योग्य नियोजन, जनावरांच्या खाद्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पिकांचं व्यवस्थापन, या सर्वांची योग्य सांगड घातल्यास कोणत्याही दुष्काळी परिस्थितीत शेती तग धरू शकते हे इनामे यांच्या शेतीच्या कार्यातून दिसून येतं हेच खरं. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.