जागर पाण्याचा

डोंगरगणचे भुतकर बनले भगीरथ

राहुल विळदकर, अहमदनगर
पिवळं पडत चाललेलं ज्वारीचं पीक माना टाकायला लागलंय, सुकाटा-फुफाट्यानं तडकून जमिनीवरच्या भेगांची भगदाडं झालीत, ऐन थंडीत काहिली चाललेली. अशा उजाडवेळी नगर तालुक्यातल्या डोंगरगणचा एक बहाद्दर सीताफळ, डाळिंबाच्या बागा फुलवतोय, एवढंच नव्हे जरबेरासाठी पॉलीहाऊस बांधतोय. स्वप्नवत वाटावी अशी ही गोष्ट साकारलीय दूरदृष्टीनं उभारलेल्या शेततळ्यामुळं...

 

एके काळी अवघ्या नगर शहरासह आसपासच्या वाड्या-वस्त्यांनाही पाणी पुरवणारा पिंपळगाव माळवीचा तलाव, तो आता असा कोरडाठाक पडलाय. आफ्रिकेतलं सेरेनगटी जंगल वाटावं, एवढी वावरं वाळून पिवळीधोक झालेली, अशा वेळी डोंगरगणच्या राधाकिसन भुतकरांचा हा हिरवागार शेतमळा फुलून आलाय तो शेततळ्याच्या जोरावर!

 

आजमितीला एक ते सव्वा कोटी लिटरच्या आसपास पाणी या शेततळ्यात साचलंय... तेही केवळ सप्टेंबरात आधाराला म्हणून पडलेल्या हस्ताच्या पावसामुळं. या 10 ते 15 दिवसांत विहिरी, कूपनलिका आणि पावसाचं पाणी या जोरावर भुतकरांनी हे शेततळं भरून घेतलं. आज हेच पाणी आता त्यांच्या शेती-बागांची तहान भागवणारेय ती थेट जूनपर्यंत. बरं उगीचच आधुनिक शेतीचा टेंभा मिरवायचा म्हणून त्यांनी खिसा मोकळा केलेला नाही, तर फेब्रुवारीनंतर लोडशेडिंग प्रचंड प्रमाणात वाढणार याचीही शक्यता गृहीत धरलीय आणि शेततळ्याची जागाच अशी निवडली, की तिथलं पाणी विजेचा अजिबात वापर न करता नैसर्गिक गुरुत्वाकर्षणामुळं कुठल्याही पट्ट्यात हवं तेव्हा सोडता येईल. हे पाणी फ्लड  इरिगेशन करून भरमसाट नाही, तर मोजमापानं अगदी, ड्रीप आणि स्प्रिंकलर्स वापरून!

 

या सगळ्या मेहनतीमागं पाठिंबा होता, तो तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांचा. त्यांनीच अनेक पर्याय सुचवले. आता या पाण्यावर डाळिंब, मोसंबी, सीताफळाच्या बागा तर तरारणारच आहेत, शिवाय आवळ्याचंही रूपडं सुखावलंय आणि केवळ अंतरपीक म्हणून केलेला कांदाच त्यांना मोढ्यावर लाखाचं उत्पन्न काढून देईल. 

 

शेतकऱ्यांच्या मुलानं शेती कनिष्ठ मानूच नये, नियोजन केलं तर एमआयडीसीतल्या ढोरमेहनती नोकरीपेक्षाही शेती लाखोचं उत्पन्न देते. फक्त आळस नको, असा भूतकरांचा मोलाचा सल्ला आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्राचा वापर करून, कृषी विभागाची मदत घेतली तर दुष्काळाच्या झळा शिवाराला शिवणारही नाहीत याचीही त्यांना खात्री आहे आणि संक्रातीच्या ऐन तोंडावरही सव्वा कोटी लिटर पाणी साचवून त्यांनी ते सिद्धही करून दाखवलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.