जागर पाण्याचा

टंचाईत यात्रांसाठी सेवागिरी पॅटर्न

शशिकांत कोरे, सातारा
सातारा - दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पाणी कुठून आणायचं, या चिंतेनं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालंय. अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पुसेगावला भरणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेत ट्रस्टनं सुमारे 50 हजारांहून अधिक जनावरं आणि लाखो भक्तांना नियोजनबद्धरीत्या व्यवस्थित पाणीपुरवठा केला. याकामी गावकऱ्यांनीही मोलाची साथ दिली. राज्यात भरणाऱ्या मोठमोठ्या यात्रांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी हा सेवागिरी पॅटर्न उपयोगी ठरणार आहे.
 

paniदानत देवस्थानची... सहभाग जनतेचा

सध्या राज्यावर दुष्काळाचं भीषण संकट आहे. अजून उन्हाळा सुरू व्हायचंय तोपर्यंतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सातारा जिल्ह्यातील माणदेशही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत दरवर्षी मोठ्या झोकात होणाऱ्या पुसेगावच्या यात्रेवरही त्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. परंतु, ट्रस्टनं नियोजन केलं आणि गावकऱ्यांनी बरहुकूम साथ दिल्यानं यात्रेसाठी येणारे पाहुणेराऊळे आणि मुख्य म्हणजे बाजारात येणारी 50 हजारांहून अधिक जनावरं यांच्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि यात्रा निर्विघ्नपणं पार पडली.

6 लाख लिटर पाणी

सालाबादप्रमाणं यंदाही सुमारे एक किलोमीटर परिघात पसरलेल्या माळरानावर जनावरांचा बाजार भरलाय. मात्र टंचाईचं सावट बाजारावरही पडलंय. तीन दिवस चाललेल्या या यात्रेत दरवर्षी सुमारे 70 हजारांहून अधिक खिलारी बैल बाजारात येतात. ही संख्या यावेळी 50 हजारांच्या घरात होती.


या जनावरांना पाणी देण्याची जबाबदारी पुसेगाव देवस्थान ट्रस्टची होती. त्यासाठी ट्रस्टनं देवस्थानच्या पैशानं नेर तलावात विहीर खोदली. या कामासाठी गावकऱ्यांनीही हातभार लावला. याशिवाय तलावातून टँकरव्दारे पाणी यात्रास्थळावर पोहोचवण्यात आलं. तसंच ग्रामपंचायतीनंदेखील ग्रामपंचायत निधीतून यात्रास्थळावर पाईपलाईन टाकली. चारा बाहेरून मागवण्यात आला. अशा प्रकारे चारापाण्याचा प्रश्न निकाली निघाला. एका जनावरास कमीत कमी दोन बादल्या याप्रमाणं एका दिवशी दोन लाख लिटर म्हणजेच तीन दिवसांत सुमारे 6 लाख लिटर पाणी जनावरांसाठी देण्यात आलं. दुष्काळगस्त भागाच्या दृष्टीनं ही आव्हानात्मकच गोष्ट होती.

जनावरांचे दर घसरले, 2 कोटींची उलाढाल

यात्रेमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील शेतकरी खरेदीविक्रीसाठी आले होते. जनावरांचा दर हा त्याचं तोंड, पाय, पोट, शेपूट आणि छातीच्या बरगडया यांच्या दर्जानुसार ठरवला जात होता. ज्या भागात पाणी आणि चारा आहे, त्या भागातील खिलार बैल दिमाखदार दिसत होते. त्यांना सुमारे 1 ते 3 लाखापर्यंत किंमत मिळाली. याशिवाय दुष्काळी भागातील जनावरांना मात्र निम्म्या किमतीनं व्यापारी मागत होते. सर्वसाधारण गाईची किंमत 40 हजार असते. तिला 18 ते 20 हजार रुपये भाव मिळत होता. तर खोंडांना 70 ते 80 हजार रुपये दर मिळत होता. एकूणच चारा-पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं तब्येत, वय आणि दिसणं यावरून जनावरांना किंमत मिळत होती. एकूण सुमारे दोन कोटींची उलाढाल बाजारात झाली.

दुष्काळात पाण्याला सोन्याचा भाव आलाय. पण हे पाण्याचं सोनं लुटून मुक्या जनावरांची तहान भागवण्याचं काम सेवागिरी देवस्थान ट्रस्टनं केलं, अशी सेवागिरी महाराजांची शिकवणूक आचरणात आणली, अशाच भावना यात्रेकरू व्यक्त करीत आहेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.