पत्नी सुमंगलाच्या साथीनं त्यांनी आपल्या वडिलोपार्जीत शेतीत गांधीजींच्या स्वप्नातलं स्वयंपूर्ण खेडं म्हणजेच ‘रूरबन’ (रुरल + अर्बन = रुरबन, शहर आणि खेड्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन उभारलेलं गाव) उभारलं. 500 कोटी लिटर पाणी बसण्याची क्षमता असलेल्या वॉटर बँकेत पावसाचं पाणी साठवलं जातं. सुमारे २६ फूट खोल असलेल्या या बँकेमध्ये वर्षभर पाणी राहतं. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही ही बँक पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरतो. त्यामुळं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. हे वाढलेलं पाणी आणि पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी या वॉटर बँकेत साठवलं जातं. ऐन उन्हाळ्यातही या पाण्याचं बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यांनी ‘इव्हॉलॉक केमिकल’ची फवारणी केली. हे रसायन इकोफ्रेंडली असल्यानं सूक्ष्म पडदा तयार होतो. तसंच गर्द झाडीमुळं वारा अडून बाष्पीभवन टाळता येतं. हे शेततळं नव्हे, संपूर्ण प्लास्टिक कोटिंग करून बनविलेली ‘पाण्याची बँक’ आहे. त्यामुळं इथं बारमाही पाणीसाठी उपलब्ध असतो.
पाण्याचं चांगलं नियोजन
चारा छावण्यातील 5000 जनावरांना आणि त्यांच्याबरोबरच्या 500 माणसांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या या बॅंकेत उपलब्ध आहे. देशपांडे ‘वॉटर बँकेचं’ हे पाणी शेती, जनावरं, घरगुती वापरासाठी घेतात. छोटेमोठे प्रयोग आणि ऊर्जानिर्मितीसाठीही इथलं पाणी वापरलं जातं. बँकेच्या परिसरातील ५१ एकर क्षेत्रासाठी या बँकेचं पाणी वापरता येतं. वर्षाकाठी ३ कोटी लिटर पाणी एकूणच शेतीला वापरलं जातं. पाच वर्षांत दोन वर्षं जरी चांगला पाऊस झाला तरीही पुढील तीन वर्षं या बँकेच्या माध्यमातून पाण्याचं चांगलं नियोजन होऊ शकतं. प्रत्येक गावामध्ये किमान पाच वॉटर बँका तयार व्हाव्यात अशी देशपांडेंची अपेक्षा आहे, आणि त्याच्या योग्य नियोजनासाठी त्यांचे अधिकार महिला बचत गटांकडं दिले जावेत, अशी त्यांची मागणी आहे.
महिलांची वॉटर बँक
७० हजार घनमीटर क्षमतेची वॉटर बँक नुकतीच अंकोलीच्या माळावर उभी राहिली आहे. तीही कुठल्याही देशी-विदेशी देणग्या अनुदान न घेता. बँकेकडून रीतसर कर्ज घेऊन. वीस हजार हेक्टरवर एक वॉटर बँक. आता या बँकेच्या भोवती २० हेक्टरवर उभी राहतेय, अत्याधुनिक ‘रूरबन’ कृषी औद्योगिक वसाहत. तळ्याच्या बांधाभोवती घरं आणि बांधावर रस्ता आहे. त्रिकोण एकमेकांना जोडून त्याची घुमटाकार घरं बांधण्याची यशस्वी प्रात्यक्षिकं अरुणरावांनी भूजच्या भूकंपानंतर करून दाखवली. विशिष्ट भूमितीय आकारामुळं या घरांना येणारा नैसर्गिकपणा वादातीत आहे. हीच घरं नैसर्गिक ‘रूरबन’ वसाहतीत उभी राहत आहेत.
पर्यटन केंद्राचा दर्जा
कृषी संशोधन आणि जलसाक्षरतेचं काम करणाऱ्या या वॉटर बॅंकेला महाराष्ट्र शासनानं पर्यटन केंद्राचा दर्जा दिलाय. 25 एकराच्या या शिवारातील संशोधन आणि वॉटर बॅंक पाहण्यासाठी देशांतर्गत, तसंच जागतिक पर्यटकही आकर्षिले जात आहेत. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात वॉटर बॅंक तयार करावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या वॉटर बॅंका शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरतील. आता गरज आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'जिथं शेत, तिथं तळं या योजनेचा लाभ घेण्याची. जलसहकार काळाची गरज बनली आहे. ज्याच्याकडं पाणी आहे, ते दुसर्यांना द्यायला हवं. पाण्याचं ‘डीपॉझिट’ करा, रानाच्या बाहेर पाणी जाऊ देऊ नका तरच दुष्काळ हटेल. तेव्हा या आदर्श वॉटर बँकेला भेट देऊन त्याच्यापासून बोध घेण्याची आणि जलसाक्षरतेत आपणही सहभागी होण्याची गरज स्पष्ट होते.
अंकोली वॉटर बॅंकेचं वैशिष्ट्य
- आशिया खंडातील सर्वात जुनी वॉटर बॅंक
- देशपांडे कुटुंबीयांनी दिली जमीन
- पडिक जमिनीचा वापर
- गोलाकार वॉटर बॅंक असल्यामुळं क्षमता चांगली
- पाण्याचं प्रेशर वाढत नाही
- एक हेक्टरची बॅंक
- तळ्यातील मातीचा वापर योग्य
- पाण्याचा ड्रीप आणि तुषार सिंचनामधून पिकांसाठी वापर
संपर्क - अरुण देशपांडे, मु. पो. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर, पिन- 413253
ई-मेल- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
मोबाईल नं- 09822174038
Comments
- No comments found