जागर पाण्याचा

कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!

मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून तो कोकणासाठी वरदायी ठरू शकतो, असं दापोली कृषी विद्यापीठातील जलतज्ज्ञांनी सिद्ध केलंय. अस्तरीत शेततळी उभारल्यास उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होतं. त्यामुळं फळबागा तसंच भाजीपाला यांनाही ही शेततळी उपयुक्त ठरणार आहेत.
 

कृषी विद्यापीठाचा पुढाकार

कोकणात सरासरी 3 ते 4 हजार मि.मी.पर्यंत पाऊस पडतो. पण सर्व पाणी वाहून जातं. त्यामुळं पावसाळ्यानंतर कोकणातील बहुतांश शेती पडिकच राहते. त्यातच कोकणच्या भौगोलिक रचनेमुळं पाण्याचा निचरा जलदगतीनं होतो. त्यामुळं जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कोकणातल्या अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागते. जिथं पिण्याचं पाणी नाही तिथं शेती काय करणार, अशी परिस्थिती निर्माण होते. Dapoli Shet-tale-Intro Imageयावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून ती फळबागा आणि भाजीपाल्यांसाठी वरदान ठरू शकतात, असं जलतज्ज्ञ प्रा. दिलीप महाले यांचं मत आहे. पावसाळ्यानंतरही या भागात पाणी उपलब्ध राहावं यासाठी कोकण कृषी विद्यापीठानं अस्तरीत शेततळ्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलं आहे. शेततळ्यांचा उद्देशच मुळी पावसाचं पाणी साठवून शेतातील पिकांना, फळबागांना आणि भाजीपाल्याला वापरता यावा हाच आहे. त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं, हाही महत्त्वाचा भाग आहेच.

 

असं करायचं शेततळं

शेततळं खोदताना उताराची बाजू सर्वसाधारणपणं 1-1 ते 2-1 असणं आवश्यक आहे. तळं खोदून झाल्यावर त्यात दगड, मोठी खडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तळ्यातली माती फावड्यानं समान करून घ्यावी. पूर्ण तळ्यात 6 इंचाचा भाताचा पेंढा किंवा गवताचं आच्छादन द्यावं. त्यात काटे आणि काडी कचरा नसणार याची काळजी घ्यावी. त्यानंतर तळ्याच्या चारही बाजूस 30 सें.मी रुंद आणि खोल चर खोदावेत. त्यावर मग सीलपॉलीन आच्छादन करावे. इतरही अनेक बारकावे यात आहेत ते समजून घेण्यासाठी तुम्ही विद्यापीठाशी संपर्क साधू शकता.

 

जलस्रोत टिकण्यासाठी विविध प्रयोगDapoli Shet-tale-5

शेततळं बांधून झाल्यानंतर पावसाचं पाणी साठवून शेतकरी स्वत:चा जलस्रोत तयार करू शकतो. या शेततळ्यातल्या पाण्याचा वापर खरीप हंगामात पावसानं उघडीप घेतल्यानंतरही आपण करू शकतो, जेणेकरून भात पिकाचं उत्पादन घटणार नाही. त्याचबरोबर या तळ्यातल्या पाण्याचा वापर रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाला आणि फळबागांसाठी करू शकतो. विद्यापीठानं यासंदर्भात जे काही प्रयोग केले आहेत त्याला चांगलंच यश आलंय. शेततळ्यात किती पाणी आहे यानुसार आपण पिकांचं नियोजन करू शकतो. त्याचबरोबर शेततळ्यातल्या पाण्याची काळजी घेणंही गरजेचं आहे. बाष्पीभवनानं ते निघून जाणार नाही यासाठी तळ्यावर कापड टाकल्यास पाणी वाचवता येऊ शकतं. तळ्यातून पिकांना पाणी देताना सिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्लाही विद्यापीठाकडून दिला जातोय.

 

मत्स्योत्पादनाचाही पर्याय

शेततळ्यात साठवण्यात आलेल्या पाण्यात मत्स्यसंवर्धन करून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो. शेततळ्याचं पाणी शुद्ध असतं, त्याचबरोबर पाण्यामध्ये प्राणवायूही मोठ्या प्रमाणात असतं. शेततळ्यात पोषक वातावरण असल्यामुळं 9-10 महिन्यात रोहू, कटला या माशांची एक ते सव्वा किलोपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेततळं एक उत्तम पर्याय आहे.

 Dapoli Shet-tale-10

अनुदानाचा फायदा घ्या

शेततळं बांधण्याचं काम जर तुम्हाला खर्चिक वाटत असेल, तर त्यावरही उपाय आहेत. शेततळ्याचा खड्डा खोदण्यापासून त्यावर प्लास्टिकचं आच्छादन करण्यापर्यंत सरकारकडून अनुदान मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेततळ्यांची बांधणी करून फायदा करून घ्या, असं आवाहन प्रा. दिलीप महाले यांनी केलंय. शेततळ्यांबद्दल जर तांत्रिक माहिती हवी असेल तर प्रा. महाले यांच्याशी 9422052269 या क्रमांकावर संपर्क साधा. त्याचबरोबर जर योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या भागातल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घ्या. जिद्दीनं पाठपुरावा केल्यास कोणीही शेतकरी शेततळं साकारू शकतो.

Comments (1)

  • खरं तर कोकण कृषी विद्यापीठ त्यांचा संशोधनाचा प्रसार अजिबात करत नाही. म्हणून कोकणात शेतीचा प्रसार झाला नाही. पण ठीक आहे, आता काही तरी प्रयत्न होतात. प्रसार माध्यमांनी असा संशोधनाचा प्रसार करावा. मुश्ताक खूप चांगला प्रयत्न आहे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.