वाढत्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी पाण्याचा थेंब न् थेंब वाचवणं गरजेचं झालंय. राज्यात ठिकठिकाणी असणारे सहकारी साखर कारखाने यासाठी पुढाकार घेऊ शकतात. त्याचं उदाहरण घालून दिलंय, भुईंज इथल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं.
साकारली तीन शेततळी
पाणलोट कार्यक्रमासाठी सरकार पुढाकार घेतंय. सरकारच्या या कार्यक्रमानुसार त्याचा पाठपुरावा करत किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं माळरानावरील खडक फोडून सुमारे साडेचार कोटी लिटर क्षमतेची तीन शेततळी तयार केलीत. त्याचा वापर कारखान्याला तर होतोच, सोबत आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालीय. या पाण्यामुळं अडीचशे एकर शेतीचं रूपांतर बागायती शेतीत झालंय.
जलसंधारण करणारा कारखाना
राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्तम पाच साखर कारखान्यांमधील एक असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा लौकिक वाढतोय. पाणीटंचाईच्या काळात अडचणींना सामोरं जावं लागणार नाही याची दूरदृष्टी ठेवून कारखाना परिसरातील खडकाळ जमिनीत शेततळी काढण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला. यासाठी त्यांनी व्यवस्थापनाला पाणी अडवण्यास प्राधान्यक्रम द्यायला सांगितला. या विचाराला सर्वांनीच पाठिंबा दिला. कारखान्यानं स्वखर्चानं पोकलेन, जेसीबी, डंपर आणि ब्लास्टिंग याचा वापर करत ही शेततळी खोदली. 8 हजार 190 स्क्वेअर मीटर आणि 7 हजार 384 स्क्वेअर मीटरची दोन शेततळी खोदण्यात आली.
पहिलं शेततळं खोदलं सव्वा कोटी लिटर क्षमतेचं. यासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च आला. हे शेततळं खडकाळ जमिनीत असल्यामुळं पोकलेन वापरावं लागलं. ब्लास्टिंग करावं लागलं. दुसऱ्या शेततळ्यासाठी ब्लास्टिंग वगैरे करावं लागलं नाही, कारण इथली जमीन खडकाळ नव्हती. तरीही पोकलेन, माती उचलणं आणि वाहतूक इत्यादीसाठी 3 ते 4 लाख रुपये खर्च आला. या शेततळ्याची क्षमता दोन कोटी लिटर पाण्याची आहे.
झिरपणाऱ्या पाण्याचा उपयोग
कारखान्याच्या व्यवस्थापनानं शेततळं खोदलेल्या जमिनीतील दगड, मुरुमाचा वापर परिसरातील रस्ते करण्यासाठी केला. तसंच धोम धरणाच्या कालव्याच्या पोटकालव्यातून जाणारं पाणी झिरपून ओढ्यातून वाहून जात होतं. हेच पाणी आता टंचाईच्या काळात शेततळ्याच्या माध्यमातून साठवलं जातंय. त्यासाठी शेततळ्याला इनलेट आणि आऊटलेट बसवण्यात आलीत. या ठिकाणी 35 हॉर्सपॉवरच्या दोन मोटारी बसवण्यात आल्यात. या मोटारींद्वारे पाणीउपसा केला जातो. यातून लाखो रुपयांच्या वीजबिलाच्या खर्चातही कपात झालीय. तसंच पाणीसाठा नियंत्रित केल्यानं परिसरात असलेल्या 15 ते 20 विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही सातत्यानं वाढ होतेय.
अडीचशे एकर जमीन ओलिताखाली
या पाण्याचा उपयोग करून आजूबाजूची अडीचशे एकर शेती ओलिताखाली आलीय. त्यामुळं पाणीटंचाईच्या काळातही या जमिनीत केवळ धान उत्पादनच नव्हे, तर बागायतही फुलू लागलीय. कारखान्यानं आणखी एक शेततळं बनवलं असून या तिसऱ्या शेततळ्याच्या कामाला बराच कालावधी लागला. कारण इथली जमीन पूर्णपणे खडकाळ होती. हे खोदण्यासाठी कारखान्यास 7 ते 10 लाख रुपये खर्च आला. या तिसऱ्या शेततळ्याच्या पाण्याचा वापर पडिक जमिनीवर ऊस लागवड करण्यासाठी केला जाणार आहे.
किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं घेतलेल्या या पुढाकारानं केवळ या पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा स्रोतच निर्माण झाला नाही, तर आजूबाजूची जमीनही ओलिताखाली आल्यानं शेतकरी उत्पादन घेऊ लागलाय. शिवाय भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणं बऱ्याच प्रमाणात शक्य होणार आहे. याचा आदर्श इतर सहकार क्षेत्रातील कारखान्यांनी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ सरकारी योजना येणं पुरेसं नसतं, तर त्यासाठी आपणही पुढाकार घेणं तितकंच महत्त्वाचं असतं हे किसनवीर साखर कारखान्यानं आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.
Comments
- No comments found