जागर पाण्याचा

दुष्काळी महूदला शेततळ्यांचं वरदान

ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
आजूबाजूला ओसाड माळरान, पाण्याची कमतरता... पण अशाच ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा संकल्प घेतलाय, महूदच्या किशोर पटेल यांनी. केळी, ऊस, आणि इतर फळबागांनी हे क्षेत्र फुलावं यासाठी त्यांनी दोन शेततळी उभारुन पाण्याचं नियोजन केलंय. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी 'जिथं शेत, तिथं तळं' या योजनेचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञाची कास धरलीय. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात येणाऱ्या महूद गावातली ही शेततळी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.
 

 

माळरानावरील शेततळी
लहान पणापासून शेतीची आवड असलेल्या किशोर पटेल या तरुणानं शेती करायची ठरवून ओसाड माळरानावर 30 एकर जमीन घेतली. मुळात गुजराती असलेल्या पटेल यांच्याकडं व्यावसायिक दृष्टिकोन तर होताच पण सोबतच त्यांना योग्य मार्गदर्शन जोडही मिळाली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे योजनेचा त्यांनी लाभ घेतला आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं दोन शेततळी निर्माण केली. त्यामुळं त्यांनी दुष्काळी परिस्थितीत आपल्या शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करून ठेवलंय.

 

 

mahud intro 1

ठिबक सिंचन पद्धत

पिकांसाठी पटेल यांनी ठिबक सिंचन पध्दतीनं पाण्याचा वापर केलाय. यामुळं खर्चात बचत तर होतेच, शिवाय तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रमाणात होतो. पिकांना स्वयंचलित पध्दतीनं पाणी देण्यात येणार आहे. आधुनिक पध्दतीनं आणि सेंद्रीय खतांचा वापर करून फळबाग आणि ऊस शेती यशस्वी करण्याचं त्यांचं नियोजन आहे.

 

 

महूद भागात शेततळी, ठिबक सिंचन योजना, त्याप्रमाणं फळबाग लागवड योजना वरदान ठरत आहेत. कमी कालावधीत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढून अल्पभूधारक, मध्यम शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना खर्चाची बचत होणं फार आवश्यक आहे, यासाठी ठिबक सिंचनमधून विरघळणारी खतं देणं ही काळाची गरज आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळं शेतकऱ्यानं आपल्या शेतीत सेंद्रीय खतांचा वापर करणं आवश्यक झालंय, असं अकलूजचे कृषी तज्ज्ञ राजकुमार पताळे 'भारत4इंडिया'शी बोलतांना सांगितलं.

 

 

कृषी विभागाचं आवाहन

शासनाच्या शेततळी योजनेचा लाभ दुष्काळी भागातील फळबागाधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं घ्यावा, असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे. तसंच उपलब्ध पाणी येत्या जून-जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी काटकसरीनं वापरावं यातच आपलं राष्ट्रहित सामावलं आहे यात शंका नाही.

दुष्काळी परिस्थितीमध्ये अशा प्रकारची शेततळी शेतकऱ्यांना वरदान ठरत आहेत. आता गरज आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'जिथं शेत तिथं तळं' या योजनेचा लाभ घेण्याची.

 

संपर्कः किशोरभाई पटेल, प्रयोगशील शेतकरी, महूद, ता. सांगोला, सोलापूर
मोबाईल नंबरः 9922438333

 

 

mahud 2योजनबाबत पूरक माहिती....

शंभर टक्के अनुदानातून शेततळं
राज्यात यंदा पुरेशा पावसाअभावी येथील शेती, फळबागा धोक्यात आल्या आहेत. या नाजूक स्थितीचा विचार करता राज्य सरकारच्या सहकार्यानं जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत 'राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' राबवण्यात येतं. या योजनेद्वारे पाण्याअभावी जळून जाणाऱ्या फळबागांना जीवनदान, तसंच फळबागेचा विकास होण्याच्या दृष्टीनं शंभर टक्के अनुदानावर शेततळं घेण्यासाठी, शेतकऱ्यांना फळबागेच्या क्षेत्रानुसार सामूहिक शेततळं मंजूर करण्यात येतं.

 

 

असा घ्या शेततळी योजनेचा लाभ

संबंधित शेतकऱ्यानं या शेततळ्याचा विस्तृत प्रस्ताव तीन प्रतीत तालुका कृषी अधिकाऱ्याकडं द्यावा.

 

 

यासाठीचे निकष पुढीलप्रमाणं :-
संबंधित शेतकऱ्यांचा फळबाग नोंदीसह स्वतंत्र 7/12 व 8 अ चा उतारा असणं आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन किंवा त्याहून अधिक फळबागधारक शेतकरी असणं आवश्यक आहेत.
संबंधित शेतकऱ्याचं स्वतंत्र रेशनकार्ड, त्याचबरोबर 100/- रु.च्या स्टॅम्पवर करारनामा आणि हमीपत्र लिहून नोटरी करणं आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.शेततळ्याच्या आकारानुसार विवरण

शेतकऱ्यांसाठी पुढील आकारमानाचं सामूहिक शेततळं उपलब्ध राहणार असून त्याचं विवरण खालीलप्रमाणेः-

.क्र.

शेततळ्याचं आकारमान

फळबाग क्षेत्र हेक्टर

पाणीसाठा घनमीटर

अनुदान रक्कम

(लाखात)

1

44 X 44 X 5.4

10.00

10,000

5.86

2

41 X 41 X 5

8.00

8,000

4.80

3

34 X 34 X 4.7

5.00

5,000

3.39

4

24 X 24 X 4

2.00

2,000

1.75

5

14 X 14 X 3

0.50

500

0.65 (हजार)

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.