जागर पाण्याचा

वृद्धाश्रम भागवतोय जनावरांची तहान!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असल्यानं पाण्याला सोन्याचा भाव आहे. माणसांची आणि जित्राबांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना तर 'पाण्याचं तेवढं बोला राव...' असाच प्रश्न सर्व जण करतायत. अशा अणीणीच्या काळात औरंगाबादमधील मातोश्री वृद्धाश्रमात भटक्या आणि दावणीच्या जित्राबांची तहान भागवण्यासाठी गर्दी होतेय. आश्चर्य वाटलं ना? हो... इथं जनावरांसाठीची पाणपोई आहे. भटकणारी, तसंच दावणीची जित्राबं घेऊन शेतकरी येतात. मुकी बिचारी पाणी पिऊन तृप्त होतात. वृद्धाश्रम चालवत असलेली ही जनावरांची पाणपोई त्यामुळंच सर्वत्र कुतूहलाचा विषय झालीय. आज दुष्काळ आहे म्हणून  नव्हे तर गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे, बरं!
 

24 तास सुरू असते पाणपोई
वृद्धाश्रम म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, ते आयुष्याची संध्याकाळ सुखद करण्यासाठी धडपडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं. पैठण रस्त्यावर असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात अशाच ज्येष्ठ नागरिकांचं एक कुटुंब तयार झालंय. त्यांनी १९९८ साली ही पाणपोई सुरू केली. वृद्धाश्रमासमोरच जनावरांच्या गरजा लक्षात घेऊन ही सुसज्ज पाणपोई बांधण्यात आलीय.


ही पाणपोई काही तासांसाठी नव्हे तर २४ तास चालवली जाते. इथं जनावरांना मिळणाऱ्या पाण्यामुळं गोपालक आपल्या गाईंना आणतात. भटकणाऱ्या जनावरांचं तर हे हक्काचं ठिकाण झालंय.


matoshri3दिवसभरात भागते चारशे जनावरांची तहान
सध्याच्या भीषण दुष्काळामुळं ही पाणपोई भटक्या, तसंच जनावरांच्या मालकांचा मोठा आधार ठरलीय. बैलगाडीनं ऊसवाहतूक करणारी मंडळी इथं विसावतात आणि बैलांची मनसोक्त तहान भागवतात. शहरातील अनेक शेतकरीही सकाळ-संध्याकाळ आपली जनावरं या पाणपोईवरंच पाण्यावर आणतात. दिवसभरात तब्बल 400 जनावरांची तहान ही पाणपोई भागवते.


सरकारी मदतीची नाही अपेक्षा
''मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळात सरकारनं चारा छावण्यांची आणि पिण्याच्या पाण्यासाठी अनुदान द्यायला सुरुवात केलीय. मात्र, आम्ही मदतीची कोणतीही अपेक्षा न धरता ही पाणपोई चालवतो. सद्या औरंगाबाद शहरातही पाणीटंचाईनं डोकं वर काढलंय. जिथं माणसांची तहान नीट भागत नाही, तिथं बिचाऱ्या मुक्या जनावरांना कोठून मिळणार पाणी? रखरखत्या उन्हात पाणी मिळालं नाही, तर या मुक्या जनावरांची काय अवस्था होत असेल? त्याची मूक भाषा समजून आम्ही ही पाणपोई सुरू केलीय,'' असं वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सांगितलं. वाटसरूंसाठीही लवकरच पाणपोई सुरू करण्याचा मनोदयही त्यानी बोलून दाखवला.


रसवंतीधारकाचा खारीचा वाटाmatoshri
या मातोश्री वृद्धाश्रमाजवळ लागूनच एक रसवंती आहे. या रसवंतीवर अनेक वाटसरू उसाच्य़ा रसाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून थांबतात. या रसवंतीवर उसापासून मिळणारी चिपाडं दररोज जवळपास १५० किलोपर्यंत सहज जमा होतात. या उसाच्या चिपाडाला बाजारात चारा म्हणून चांगली मागणी असून भावही चांगला मिळतो. मात्र, रसवंतीधारक गंगाधर गोरे पैशांचा हव्यास न ठेवता चिपाडं भटक्या जनावरांना मोफत चारा म्हणून ठेवतात. वृद्धाश्रमातील या पाणपोईपासून प्रेरणा घेत त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय. मुक्या जनावरांची सेवा केल्यानं पुण्य पदरी पडेल, या भावनेनं आपण हे करतो, असं त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.


मिळून सारे जण जागर पाण्याचा घालूया!
समाजाच्या गरजा ओळखून निरपेक्ष भावनेनं केलं जाणारं काम हे समाजासाठी आदर्श बनून राहतं. त्यातून प्रेरणा घेऊन सामान्य जणही आपापल्यापरीनं काम करत राहतात. या छोट्या छोट्य़ा गोष्टींमधूनच मोठं काम सुसह्य होतं, हेच यावरून दिसून येतं. 'भारत4इंडिया'नं हीच बाब समाजासमोर आणण्यासाठी जागर पाण्याचा घालायला सुरुवात केलीय. केवळ दुष्काळ, दुष्काळ असं म्हणत न बसता आपण मिळून सारे जण आपल्या परीनं जागर पाण्याचा घालूया!

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.