...आणि गावविहीर आटली
औरंगाबादपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्यालाच दौलताबाद वसलंय. गावाची मूळ लोकसंख्या ही आठ हजाराच्या आसपास आहे. पण दौलताबाद किल्ल्याला भेट देण्यासाठी दरवर्षी सुमारे ४ ते ५ हजार पर्यटक येतात. त्यांनाही या गावातूनच किल्ल्यावर जावं लागतं. या भागात वीटभट्ट्यांचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. त्यासाठीही अनेक कामगार इथं येतात. दुभत्या जनावरांची संख्याही ७ ते ८ हजारांवर आहे. या सर्वांना गावविहिरीतूनच पाणीपुरवठा केला जातो. तीन वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या विहिरीतील पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली. तरीही उपसा सुरूच राहिल्यानं विहीर आटली आणि गावात पाणीटंचाईला सुरुवात झाली. गेली सलग तीन वर्षं उन्हाळ्यात दौलताबादला टॅंकरनं पाणीपुरवठा केला जातोय. या वर्षीही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईनं उग्र रूप धारण केलं. दिवसभरात कसा तरी तासभरच पाण्याचा पंप चालायचा. त्यातून जेमतेम तहान भागवण्यापुरतं पाणी मिळत होतं.
दौलताबादकरांना सुचली पूर्वीची युक्ती
कावलेल्या गावकऱ्यांनी मग नेहमीप्रमाणं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढावी यासाठी विहिरीतच ८ ते १० आडवे बोअर मारले. पण म्हणतात ना, आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? भूजल साठाच नसल्यानं त्याचा काही उपयोग झाला नाही. मग टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला टॅंकरनं पाणीपुरवठा करून पाण्याचा प्रश्न सुटणारा नव्हता. त्याशिवाय टँकरसाठी होणारा खर्च वेगळाच. म्हणूनच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार गावकरी करू लागले. त्यांना पूर्वी दौलताबाद किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या आणि गावापासून जवळच आणि उंचावर असलेल्या प्राचीन मोमबत्ता तलावाची आठवण झाली. या तलावातील पाणी वापरता येईल का, या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. पंप लावून तलावातील पाणीउपसा करण्याचा विचार पुढे आला. पण लोडशेडिंगचा अडसर होता. याशिवाय वीजजोडणीचा खर्च वेगळा. मग गावकऱ्यांनी त्याकाळी दौलताबाद किल्ल्याला याच तलावातून पाणीपुरवठा कसा होत होता, याचा अभ्यास केला. त्यांना लहानपणी शाळेत शिकलेला हवेच्या दाबावर आधारित प्रयोग करण्याची कल्पना सुचली. ग्रामसेवक एम. एस. पाटील, सरपंच संजय काजुणे, उपसरपंच सय्यद हरून यांनी पुढाकार घेऊन विनावीज तळ्यातलं पाणी विहीरीपर्यंत आणलं.
असा केला हा प्रयोग
एका मोठ्या पाईपमध्ये पाणी भरलं आणि पाईपचं तोंड दोन्ही बाजूंनी बंद केलं. नंतर पाईपचं एक तोंड तलावात सोडलं तर दुसरं टोक जवळच असलेल्या नाल्यात सोडलं. पाईपमधील पाणी बाहेर आलं आणि हवेच्या दाबामुळं तलावातील पाणी ओढलं जाऊ लागलं. आणि या हवेच्या दाबामुळं पाईप भरून पाणी येऊ लागलं. सुरुवातीला तलावातील पाणी हे वापरण्यायोग्य नव्हतं. त्यासाठी गावातील सार्वजनिक विहिरीजवळ १०० मीटर अंतरावर चर खोदून त्यात तलावाचं पाणी सोडण्यात आलं. चारीतील पाणी नैसर्गिकरीत्या पाझरून विहिरीत जमा होऊ लागलं. गेल्या २० दिवसांत या विहिरीतील पाणीपातळी चांगलीच वाढलीय. त्यामुळं गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणंही या प्रयोगामुळं शक्य झालंय. ज्या ठिकाणी गेली तीन वर्षं टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता तिथं या अनोख्या प्रयोगामुळं ऐन दुष्काळात पुरेसं पाणी मिळतंय. उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीनं व्हावा, याकडंही ग्रामपंचायत कटाक्षानं लक्ष देतेय. अगदी पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरेल, असा विश्वास त्यांना वाटतोय.
गोष्ट छोटी, पण आभाळाएवढी !
आपल्या देशात भरपूर जलस्रोत आहेत, पर्जन्यमानही चांगलं आहे. परंतु आज आपण पावसाचं फक्त 29 टक्के पाणी वापरतो. 71 टक्के पाणी समुद्रात जातं. 29 टक्क्यांपैकी शेतीला 40 टक्के पाणी मिळतं आणि 60 टक्के पाणी वाया जातं. आजही आपण पावसाचं पाणी साठवून, पर्जन्यशेती आणि उपलब्ध पाणीसाठ्यात भर घालून, हे पावसाचं पाणी विहिरी - कूपनलिकांमध्ये सोडून त्यांचं पुनर्भरण करू शकतो. विहीर, बोअरवेल, तलाव असं कुठल्याही स्रोताचं पाणी तुम्ही घेत असा, जलपुनर्भरण करावंच लागतं. आजपर्यंत आपण केवळ पाणी उपसायचंच काम केलं. आता इथून पुढं ते भरायलाही शिकलं पाहिजे. दौलताबादच्या गावकऱ्यांनी नेमकं हेच केलं. तरीही त्यांच्या हाताशी पाण्यानं भरलेला प्राचीन तलाव होता. गावविहिरीचं पुनर्भरण करणाऱ्या या तलावाच्या पुनर्भरणाकडंही लक्ष द्यावं लागणार आहे, याची जाणीवही गावकऱ्यांना आहे. त्यामुळंच जलपुनर्भरणाची ही, गोष्ट छोटी पण आभाळाएवढी, आहे बरं!
Comments
- No comments found