गाळ साचल्यानं कमळगंगा नदी कोरडी पडली होती. महात्मा फुले जलभूमी विकास योजनेंतर्गत तिच्यातील गाळ उपसण्यात आला. तिचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलं. त्यामुळं नदीचं रूपच पालटलं. या कडक उन्हाळ्यातही नदीपात्रात भरपूर पाणी आहे. काठाला हिरवी शिवारं डुलताहेत. याशिवाय आजूबाजूच्या विहिरींच्या पातळीतही वाढ झालीय.
गाळानं भरलेली कमळगंगा नदी
अकोला जिल्ह्यातील कमळखेड गावातून उगम पावणारी कमळगंगा नदी जिल्ह्यातून 25 किमी प्रवास करीत दुर्गवाडा इथं उमा नदीत सामावते. या नदीवरील अतिक्रमणानं अरुंद झालेलं पात्र आणि गाळानं भरल्यामुळं तिच्यामध्ये पावसाळ्यात पडलेलं अब्जावधी लिटर पाणी वाहून जाई, कारण यामुळं पात्रात पाणी ठरत नव्हतं आणि जमिनीत मुरत नव्हतं. भूगर्भात पाणी भरलं जात नसल्यानं पावसाळा संपल्यावर काही दिवसांतच विहिरींचे तळ दिसायला लागायचे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही मारामार होई, मग शेती ओलिताखाली आणणं ही दूरचीच गोष्ट.
वॉटर रिस्टोरिंग प्रक्रियेत अडथळा
पालनदास घोडेस्वार हा तरुण भूजल तज्ज्ञ या नदीकाठच्या मोहबतपूर गावचा. त्यानं ही नदी लहानपणापासून पाहिलेली. कधी काळी दुथडी भरून वाहणारी ही नदी का आटली, याचा त्यानं अभ्यास केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. शिवाय नदीवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळं रुंदी कमी झालेली. गाळामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरत नव्हतं. गाळाखाली असलेला मुरुम हा पाणी साठवणुकीसाठी फार उपयोगी साधन आहे. मात्र वर साचलेल्या गाळामुळं या मुरुमापर्यंत पाणी पोहोचत नव्हतं. पर्यायानं वॉटर रिस्टोरिंगची प्रक्रियाच कार्यान्वित होत नव्हती. त्यामुळं पावसाळा संपला की ही नदी कोरडी पडे.
चार हजार ट्रॅक्टर ट्रॉली गाळ उपसला
पावसाच्या पाण्याला कुठंही अटकाव होत नसल्यानं पाणी थांबत नाही, ही बाब लक्षात घेऊन हातगाव इथं नदीपात्राचं खोलीकरण करण्यात आलं. यासाठी कृषी विभागाच्या महात्मा फुले जलभूमी विकास योजनेंतर्गत 1 लाख 32 हजार रुपयांचा निधी यासाठी मिळाला. यातून या नदीच्या पात्रातील जवळपास चार हजार ट्रॅक्टर ट्रॉली गाळ उपसण्यात आला. आणि तो गाळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देण्यात आला. या नदीची आधी रुंदी फक्त 20फूट, तर खोली 6फूट होती. या योजनेतून या नदीचं पात्र 100 फूट रुंद, तर 400 फूट लांब आणि 20फूट खोल करण्यात आलं. यामुळं आज पंचवीस फूट खोल पाणी साचलं आहे. शेतातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.
गाव टँकरमुक्त, जनावरांना मुबलक पाणी
पावसाचं पाणी वाचवण्यात, ते साठवण्यात य़श आल्यानं त्याचे फायदेही दृष्य स्वरूपात दिसायला लागले. हातगाव गावात दहा वर्षांपासून पाणीटंचाई होती. टँकरनं पाणीपुरवठा व्हायचा. आज मात्र हे गाव टँकरमुक्त झाल्याचं सरपंच रवींद्र गोपकर सांगतात. तर पुरुषोत्तम कथलकर या शेतकऱ्याचं मागील वर्षी लिंबूचं झाड फक्त पाणी नसल्यानं वाळलं. आज भरपूर पाणी असल्यानं मुख्य पिकांसोबत ते वेगवेगळं पीक काढतायत. रानातून चरून आलेल्या गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालंय.
शेतीचा पोत सुधारला
नदीतील गाळाचा उपसा केल्यामुळं नदीपात्राची खोली तर वाढली. सोबतच हा गाळ संदीप कथलकर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात टाकल्यानं उत्पादन वाढलं. शेतीचा पोत सुधारला. हा गाळ अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पसरवला.
वॉटर स्टोअरेज टँक
नदी मूर्तिजापूर तालुक्यातून 25 किमी प्रवास करते. या नदीच्या पात्राची रुंदी आणि खोली वाढल्यानं काय परिणाम होतात हे लक्षात आल्यावर स्थानिक आमदार हरीष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय अशी कमळगंगा कार्यन्वय समितीची स्थापना झाली. या नदीचं पुनरुज्जीवनच यानिमित्तानं झालं. अरुंद असलेली नदी आता मोठी झालीय. ठिकठिकाणी मोठमोठे डोह म्हणजेच वॉटर स्टोअरेज टँक तयार होताहेत. आज या उपक्रमाचं कौतुक होतंय. मात्र सरकारकडून कसलीही मदत होत नसल्याची खंत पिंपळे यांनी व्यक्त केली. हा उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेतो, त्यातून खोदकाम करणाऱ्या जेसीबीचा खर्च भागवला जातोय. तसंच अमरावती जिल्ह्यातील सामदा धरणासाठी या उपक्रमातून मुरुम नेला जातोय. यामुळं रस्ते, धरण, शेतीसाठी गाळ आणि मुरुम मिळतोय. सोबतच नदी खोल होतेय, रुंद होतेय.
शेतकऱ्यांचं हिरवं स्वप्न साकार
पाण्याचं मोल कळल्यामुळं पाणी वाचवण्याची, साठवण्याची चळवळ उभी झाली. पाण्याच्या प्रश्नावर जात-धर्म-पंथ-पक्ष यांचा अभिनिवेश विसरून लोक एका ठिकाणी आलेत. यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील हिरवं स्वप्न शिवारात साकार होताना याचि देही याचि डोळा पाहायला मिळतंय. हा प्रकल्प इतरही जिल्ह्यात राबवला गेला तर पाणी वाचवण्याच्या निमित्तानं नामशेष होणाऱ्या नद्या वाचतील. पाण्याच्या जागरासाठी लोक एकत्र येतील.
Comments (1)
-
एकदम मस्त उपक्रम राबला आहे ह्या गावांनी. एकीकडे दुष्काळ पडला आहे. आणि इथे दुष्काळावर मात करून त्यांनी नदीचे खोल पत्रात खणन करून पाणी अडवले ही खरंच वाखण्याजोगी बाब आहे. तुमची ही स्टोरी मस्तच आहे.