जागर पाण्याचा

दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'

विवेक राजूरकर, औरंगाबाद
दुष्काळामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा गळा पाणी पाणी करतोय. पाणीटंचाईनं परिसीमाच गाठल्यामुळं गावागावांत टॅंकरच्या संख्येत तिपटीनं वाढ करण्यात आलीय. आई जेवण देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झालीय. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.
 

महाराष्ट्रात सर्वात भीषण दुष्काळ जाणवणारा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा होय. याच जालना तालुक्यातील अवघ्या २५ कि.मी अंतरावर असलेलं हे कडवंची गाव. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही (१८० मि.मी.) या गावातील पिकं, फळबागा आजही दिमाखानं डोलत आहेत. यामागं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन. या गावानं इंडो-जर्मन तंत्रज्ञान आणि शासनाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यानं एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबवला आणि गावाचा कायापालट झाला. जल, जंगल, जनावरं, जमीन आणि जन म्हणजे लोकसहभाग या सर्वांची योग्य सांगड घातल्यानंतरच खऱ्या अर्थानं पाणलोट क्षेत्र विकसित होतं. यामधील एकही कडी जर कमकुवत असेल तर ते पाणलोट क्षेत्र फेल जातं, अयशस्वी होतं. आज अनेक गावांत पाणलोट क्षेत्राचा विकास होऊनही त्या ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळ जाणवतो, कारण पाणलोट क्षेत्राच्या विकासाबरोबरच या पाणलोट क्षेत्राची देखभाल आणि पाण्याचं योग्य नियोजन होणं तितकीच महत्त्वाची बाब ठरते.

 

kadvanchi 1सुरुवातीपासून योग्य नियोजन
अनेक भागांत पाणलोट प्रकल्पात, ठरवून दिलेली रक्कम वाढत जाते. त्याचा कालावधीसुद्धा वाढत जातो. मात्र या गावात प्रकल्पाचा खर्च हा १ कोटी १९ लाख इतका असताना प्रत्यक्षात हा प्रकल्प १ कोटी ७ लाख  इतक्या कमी रुपयांमध्ये वेळेआधी पूर्ण झाला आणि तेही अगदी गुणवत्तेच्या अटींसहित, हे या कडवंची गावाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. १९९६ मध्ये सुरू झालेलं हे पाणलोट विकासाचं मॉडेल २००१ मध्ये पूर्ण झालं. २२०० लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांनी आपल्या एकोप्यातून १६ लाख रुपयांचं श्रमदान करून हे विकासाचं मॉडेल उभं केलं. या प्रकल्पामुळं गावात अनेकांना रोजगार मिळाला आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा शेतात निर्माण झालेल्या कामांमुळं आजही येथील तरुण बेरोजगार नाही. याच श्रमदानातूनच नरेगामधून या गावातील लोकांनी तब्बल ४१ किलोमीटरचे रस्ते बांधले.

 

ठिबक सिंचनासोबत जलशोषक माध्यमांचा वापर
या गावातील जमीन हलक्या स्वरूपाची आहे, यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून घेतलं. त्यानुसार शेतात पीक घेण्यास सुरुवात केली. १०० टक्के ठिंबक सिंचनासोबत जलशोषक माध्यमाचा वापर केला, डोंगराच्या उतारावर सलग समतल चर खोदण्यात आले, वहिती जमिनीवर बांधबंदिस्ती करण्यात आली, डोंगरावर घळ्या असलेल्या ठिकाणी घळबंदिस्ती करण्यात आली, नंतर टप्प्याटप्प्यानं अनेक सिंमेट बंधारे बांधण्यात आले, गावशिवारामध्ये जलशोषक चर, चिबड चर अशी कामं पूर्ण करण्यात आली. या सर्वांमुळं जमिनीची धूप थांबली, पाण्याचा वेग कमी करण्यात आला आणि त्यामुळं शेतात, बांधबंदिस्तीत, सिंमेट बंधाऱ्यात पाणी साचू लागलं आणि त्याच्या झिरपण्याचा वेगही वाढला. यामुळं गावातील विहिरीतील पाण्याची पातळी सहा ते आठ मीटरनं वाढली, अनेक शेतकऱ्यांनी पाणी बचतीसाठी शेततळी घेतली, विहिरीतील आणि नाल्यातील पाणी वापरून शेततळी भरून घेतली. आता याच दुष्काळी परिस्थितीत हीच शेततळी या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देणारी ठरली.

 

vlcsnap-2013-03-09-20h17m02s142पाणलोट प्रकल्प ठरले विकासाचं मॉडेल
कडवंची गावात १९९६-९७ मध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागत असे. उपलब्ध पाण्याचा वापर करून पारंपरिक पिकं ज्वारी, कापूस, बाजरी इत्यादी पिकं घेतली जात होती. गावातील भूजल पातळीही १५ मीटर खोलवर गेली होती. एकूण गावातील लोकांचं वर्षभरातील उत्पादन हे जवळपास ७५ ते ८० लाखांपर्यंतच मर्यादित असायचं. सुरुवातीला गावात फक्त एकच ट्रॅक्टर आणि १० मोटरसायकली होत्या. मात्र पाणलोट विकासाच्या मॉडेलमुळं गावाचा कायापालट झाला. यात अनेक शेतकऱ्यांनी शेततळी घेतली, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली, ७०५ सिंमेट बंधारे घेतले, ७०० समतल चर घेण्यात आले. आज गावात ४० ट्रॅक्टर, तर प्रत्येक घरात मोटरसायकली आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी शहरात आहेत, गावातील शेतकऱ्यांचं उत्पन्न हे आज जवळपास ११ कोटींपर्यंत पोहोचलं आहे. गावातील रोजगार हा सरकारच्या रोजगार हमीपेक्षा जास्त आश्वासक आणि फायदेशीर ठरला आहे.

 

पाण्याचं आणि पिकांचं योग्य व्यवस्थापन
पारंपरिक पिकं घेण्यामुळं शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होत नव्हता. अनेक शेतकऱ्याकडं मोसंबीच्या फळबागा होत्या. मात्र यासाठी पाणी जास्त लागायचं. कृषी विज्ञान केंद्राचे पाणलोट तज्ज्ञ पंडित वासरे यांच्या मार्गदर्शनानुसार गावातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल केला. कमी पाण्यात येणारी पिकं घेतली जाऊ लागली. मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरातील या गावातून मोसंबी हद्दपार होऊन कमी पाण्यात येणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंब पिकांकडं शेतकरी वळला. विशेष म्हणजे या गावातील द्राक्षांना विदर्भात मोठी मागणी आहे.

 

जागेवरच शेतमालाची खरेदी
नागपूर, वणी, पुसद, बल्लारपूर, यवतमाळसारख्या ठिकाणी येथील शेतकऱ्यांचा माल जातो. येथील शेतकरी माल विक्रीसाठी बाजारात जात नाहीत, तर बागवान, व्यापारी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल घेऊन जातो. या नगदी पिकामुळं शेतकऱ्यांच्या हातात आता मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागलाय.

 

vlcsnap-2013-03-09-20h41m35s248पाण्याचा वापर १०० टक्के ठिबक सिंचनातून
शेतात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलं तरी पाण्याचा वापर १०० टक्के ठिंबक सिंचनातून काटेकोरपणं केला जातो. शेतात पाटपाणी देण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली गेलीय. गावातील उपलब्ध पाणी, उपलब्ध जमीन यांचा ताळमेळ बसवत पिण्याच्या पाण्याच्या, जनावरांच्याही पाण्याला प्राधान्य देत शेतीसाठी पाणी दिलं जातं. पाण्याच्या योग्य नियोजनामुळं गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत नाही. पाण्याचा काटकसरीनं वापर करून शेतकरी शेडनेट आणि मल्चिंगचा वापर करत आधुनिक शेतीकडं वळलाय. गावात दहा शेतकऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या उभारलेली दहा शेडनेट इथं पाहता येतात.

 

पाणलोट विकास समितीचं महत्त्व
पाणलोट विकासाचं मॉडेल यशस्वी होण्यामागं या समितीचा फार मोठा वाट आहे. ज्या पाणलोट विकासाची फळं येथील गावकरी चाखताहेत, त्यामागं या समितीचा आधार आहे. गावात सात सदस्यीय समितीचं गठण केलेली आहे. पाणलोट विकास अध्यक्ष भगवान क्षीरसागर हे स्वतः एक अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांनी सर्वात प्रथम गावातील लोकांना लोकांच्या सहभागातूनच हा पाणलोट विकास प्रकल्प यशस्वी होऊ शकतो हे सांगितलं. समितीद्वारे शेतकऱ्यांना देखभालीचं महत्त्व समजावून सांगितलं गेलं. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना बंदी, कमी खर्चात, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्नाचं गणित मांडण्यासंबंधीचं मार्गदर्शन ही समिती शेतकऱ्यांना करते.

 

आर्थिक ताळेबंद
समितीला प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीचा वापर (प्रकल्प देखभालीसाठी नाबार्डकडून सहा लाख, प्रकल्प वेळेआधी पूर्ण केल्यामुळं शासनाचा एक लाखांचा पुरस्कार, आणि इतर दीड लाख रुपये) समितीतील ग्रामस्थांनी मोठ्या हुशारीनं केलाय. उपलब्ध निधीचा एकदम वापर न करता तो टप्प्याटप्प्यानं उपयोगात आणला. आणि उर्वरित रक्कम बॅंकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकली. या एफडीच्या व्याजावर इतर जलसंधारणाची कामं पूर्ण केली. आज या समितीचे साडेआठ लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा आहेत आणि या रकमेच्या व्याजातून आजही जलसंधारणाची, विकासाची कामं पूर्ण केली जाताहेत. लोकसहभागातून, एकोप्यातून काय साधता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील कडवंची हे गाव. पाण्याचा ताळेबंद मांडून, पाण्याच्या वापराचे काटेकोर नियंत्रण पाळून, पाणलोट क्षेत्राची यशस्वी देखभाल करून ऐन दुष्काळातही शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना एक आधारस्तंभ देणाऱ्या या गावानं समाजापुढं एक आदर्शच निर्माण केलाय, आणि भविष्यात पाणलोट क्षेत्र विकास हीच काळाची गरज बनत चालली आहे, असा संदेशही दिलाय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.