अवघ्या 20 फुटांवर विहिरीला पाणी, तेही या रणरणत्या मार्च महिन्यात. गावात हापसा करायला एकच पंप. हापशाला अर्धी बादली पाणी, शेती बहरलीय, कांदाफुलं डवरलीत, पानाआडून चिकू डोलतोय आणि कधीही सहसा बघायलाही न मिळणारा असा मोहोर बदामावर घमघमलाय. हे दृश्य फाल्गुन-चैत्रातल्या वसंतातही शक्य झालंय ते अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावात. यासाठी त्यांनी सरकारकडून मिळालेल्या दुष्काळ निधीचं काटेकोर आणि अचूक नियोजन केलंय. पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच गावाचा विकास या निधीतून कसा करायचा याचंही योग्य नियोजन केलंय. यासाठी आवश्यक असलेला सहकाराचा हात इथल्या ग्रामस्थांनी दिलाय.
पाणलोट क्षेत्र विकास
गेल्या 20 वर्षांपासून या गावात अगदी तळमळीनं पाणलोटाचा कार्यक्रम राबवला जातोय. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता गावात किती पाऊस पडतो, गाव नक्की कुठं वसलंय याचा विचार करण्याबरोबरच, गावाचा भौगोलिक आकार, इथं समतल चर कसे खोदायचे याचा भरीव विचार इथल्या पोपटराव पवारांच्या ग्रामसंसदेनं केला.
यानुसार इथं रस्ता आणि घाटरस्त्याकडेच्या ओघोळी आणि डोंगर उतारातून 5,000 छोटे दगडाचे बांध बांधले. पावसाळ्यात यात पाणी साचतं आणि पाणी पुढं सरकतं. मग त्याला काटकोनात डोंगरात चिऱ्या भरल्यासारखे समतल असे 1 X 1 मीटर (रुंदी 1 आणि खोली 1 मीटर) आकाराचे समतल चर खोदले आहेत. त्यात हेक्टरी तब्बल 2.5 लाख लिटर पाण्याची साठवणूक होते. अशी पाण्याची मोठी साठवण क्षमता असल्यानं आणि त्यातून भूगर्भात मोठा पाझर होत असल्यानं कडेला भरपूर प्रमाणात गवत वाढतं. हे वाढलेलं गवत माती धरून ठेवते. त्यामुळं जमिनीची धूप होत नाही. शिवाय या गवतामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदतच झालीय. डोंगरउतारावरून येणारा हा पाझर थेट माती-बांधांपर्यंत जातो. मग तिथून ते पाणी पाझरत, छोट्या-छोट्या दगडी बांधांमधून उतरत साठवण तलावांमध्ये आणि तिथून थेट पाझर तलावांमध्ये जातं. यामुळं आजूबाजूच्या भागातल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालीय. शिवाय गावाच्या भूजलपातळीत प्रचंड वाढ झालीय.
पाणी वापराचे कोटेकोर नियम
भरपूर पाणी आहे म्हणून कोणालाही बोअर घेण्याची इथं परवानगी नाही. इथल्या ग्रामसभेनं त्यासाठी बोअरवेल बंदी मंजूर करून घेतलीय. त्यामुळं इथं कुणीही खाजगी वापरासाठी बोअरवेल काढू शकणार नाही, असा नियमच आहे. पोपटराव पवारांनी हे सगळं नियोजन हिवरे बाजारात लोकशाही पद्धतीनं राबवलंय. पाण्याच्या या काटेकोर नियोजनामुळं इथले गावकरीही जास्त पाण्याचा वापर होणारी पिकं घेण्यापेक्षा ठिबक सिंचनाद्वारे सहज येणारी पिकं घेत आहेत. त्यामुळंच संपूर्ण राज्य पाण्याच्या दुष्काळामुळं होरपळत असताना, बशीच्या आकाराचं हे हिवरे गाव अगदी हिरवंगार आहे.
सोयरिकीसाठी मुलीचा बाप तय्यार
आज पाणी नाही म्हणून राज्यातल्या कित्येक भागात ठरलेली लग्नं मोडली आहेत. कित्येक ठिकाणी तर ही लग्नं थेट पुढच्या सीझनपर्यंत ढकलण्यात आली आहेत. पण हिवरे गाव मात्र पाण्यानं समृद्ध असल्यामुळं या गावात सोयरीक जुळवायला पोरीचा बाप कांकू करत नाहीय. म्हणून या गावात सोयरिकी जुळवायला अडचण येत नाहीये.
“आज इतर ठिकाणी दुष्काळामुळं प्यायला पाणीच नाहीय. पण आमच्या गावात मात्र पाण्याची कुठलीच कमतरता जाणवत नाही. अगदी मार्च-एप्रिलपर्यंत आम्हाला भरपूर पाणी मिळतं,” असं इथली सासुरवाशीण भरभरून सांगते. "पोपटराव पवारांच्या पुढाकारानं आणि गावकऱ्यांच्या सहभागानं आज आम्हाला पंप मारल्यावर कधीही प्यायला पाणी मिळतं,” असं पाण्यानं स्वयंपूर्ण असलेल्या आपल्या गावाबाबत बोलताना इथले गावकरीही अभिमानानं सांगतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद सहज जाणवून येतो.
गावकऱ्यांचं योग्य नियोजन
पाणलोटक्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाची पंचसूत्री गावकऱ्यांनी एकदिलानं आचरणात आणली, म्हणून आज हे सुखाचे दिवस इथल्या गावकऱ्यांना दिसत आहेत. पाणी कसं आणि किती वापरायचं याची जलसाक्षरता त्यांनी जोपासलीय. बाजार, वातावरण आणि जमिनीची क्षमता याबाबत त्यांचा अभ्यास तयार आहे. बरं तहान लागल्यावर विहीर खोदली असंही नाही. आज दुष्काळ दोन वर्षांपासून जाणवतोय, पण पाणी हेच जीवन आहे हे हिवरे बाजारनं ओळखलं आणि 15-20 वर्षं आधीपासूनच या दुष्काळाला यशस्वीपणे तोंड देण्याची तयारी केली. आता इतर लोकही या गावाच्या विकासाची मेख जाणून घ्यायला लागले आहेत. त्यामुळंच आता बंधाऱ्यांचं स्ट्रक्टरल ऑडिट करा, अशी रास्त सूचना पोपटराव पवार सरकारला करत आहेत.
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल की नाही, माहीत नाही. पाण्याचं महत्त्व ओळखून हिवऱ्याच्या गावकऱ्यांनी मात्र प्रेमाचे झरे अखंड वाहते ठेवले आहेत. जन, जंगल आणि जमिनीच्या जपणुकीसाठी...!
Comments (2)
-
मी माझ्या गावात असाच उपक्रम राबविण्याचं ठरवलंय. आपण मार्गदर्शन कराल का? आपणाशी संपर्क कसा करता येईल हे कळवावं.
-