आपल्या राज्यात विविध भौगोलिक परिस्थितीत, हवामानात टिकलेल्या, रुळलेल्या जातिवंत जनावरांच्या या प्रजाती म्हणजे आपला दुर्मिळ ठेवा आहे. थोडक्यात काय, तर गुरंढोरं हे आपलं धन, पशुधन. हल्लीच्या संकरीत जमान्यात आपण हा ठेवा जपायला हवा, वाढवायला हवा, या उदात्त हेतूनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. अशा प्रकारची अभिनव स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्यानं तिची नवलाई सर्वांच्याच चेहऱ्यावर जाणवतेय. महत्त्वाचं म्हणजे जित्राबंही नव्या दमानं घुंगरांचा मंजूळ नाद करीत या सर्वांना प्रतिसाद देतायत.
जत्रेतून फेरफटका आणि स्टॉलवर गर्दी या स्पर्धेच्या ठिकाणापासूनच काही अंतरावर तलाव आहे. दुष्काळातही हा तलाव भरून पावलाय. सक्काळी, सक्काळी शेतकऱ्यांनी जित्रांबांसह आपल्या आंघोळी उरकल्या. मग चहा, नाष्टा घेण्यासाठी सहज जत्रेतून फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडले. या जत्रेत खाण्यापिण्याची, तसंच जनावरांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणाऱ्यांची रेलचेल आहे. कोण चामड्याचे घुंगरूपट्टे घेतोय, कोणं रंगीबेरंगी सापत्या, कोणी लोकरीचे, कापसाचे गोंडे घेतोय... आणि हे सर्व अर्थातच आपल्या लाडक्या जित्रांबांसाठी बरं का! हा खरेदीचा फेरफटका झाल्यानंतर जित्रांबांपुढं चाऱ्याची पेंढी टाकून शेतकऱ्यांची पावलं गर्दीतून वाट काढत 'भारत4इंडिया'च्या स्टॉलकडं वळली.
स्टॅालवर हीsss गर्दी...
शेतकऱ्यांना स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळालं. खरं तरं घोटी परिसरात आढळणाऱ्या डांगी आणि खिल्लार या दोन जातिवंत बैलांसाठी ही स्पर्धा आहे. पण इथं आलेले शेतकरी सोबत जातिवंत घोडे आणि शेळ्या-मेंढ्याही घेऊन आलेत. जातिवंत ब्रीड आहे... तर मग चला घेऊन. काय नाय तर यानिमित्तानं या जातीपण लोकांच्या डोळ्याखालून जातील, हा त्यामागचा खरं तरं उद्देश. स्टॉलवर नावनोंदणी केल्यानंतर जित्रांबांना क्रमांक देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्याला सुरुवात झालीय. या तपासणीच्या निमित्तानं जित्राबांची तब्येतपाणी समजत असल्यानं शेतकरी जाम खूश आहेत. आतापर्यंत एवढ्या बारकाईनं तपासणी कधीच झाली नव्हती, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत होत्या. आता इथं जित्राबांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे.
उत्सुकता उद्घाटनाची
जित्राबांची तपासणी आटोपलेले शेतकरी जेवण करण्यात व्यस्त आहेत. त्यानंतर काही जण जित्राबांशेजारीच हाताशी उशी करून पहुडलेत. काही जण इकडून तिकडून आलेल्या इतर शेतकऱ्यांबरोबर शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत. खरं तरं आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती... संध्याकाळी होणाऱ्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या उद्घाटनाची. नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर 'भारत4इंडिया'नं राबवलेल्या 'जागर पाण्याचा' या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभही होणार आहे. दुष्काळातही राज्यभरातील काही शेतकऱ्यांनी अभिनव कल्पना राबवून कसं पाणी राखलंय, याच्या यशोगाथा म्हणजे 'जागर पाण्याचा' आहे. त्यातून अनेकांना 'टॉप ब्रीड'बरोबरच पाणी राखण्याचीही नक्कीच प्रेरणा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
Comments
- No comments found