टॉप ब्री़ड - घोटी

'टॉप ब्रीड'मध्ये घुमला जागर पाण्याचा!

ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं, तसंच  'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उद्घाटन झोकात झालं. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवून त्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आता आपल्यालाही इस्रायली तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. तसं केलं तरच इथून पुढं दुष्काळावर मात करता येईल, असं ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं. 'जागर पाण्याचा' या उपक्रमातील यशोगाथांमुळं दुष्काळाशी दोन हात करताना आता आम्हाला आणखी बळ येईल, अशा प्रतिक्रिया गावोगावच्या शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.
 

                    

 

हे सर्व आपणही करू शकतो...

प्रदीप पुरंदरे यांनी 'भारत4इंडिया'च्या या अभिनव उपक्रमाचं सुरुवातीलाच कौतुक केलं. 'जागर पाण्याचा' या उपक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या कडवंची गावकऱ्यांच्या यशोगाथेचा दाखला देत पाणी वाचवण्यासाठी जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना कडवंची पाणी राखू शकतं. शेत पिकवू शकतं तर मग आपण का नाही, असा अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न विचारून मनात आणलं तर हे सर्व आपण करू शकतो, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

 

intro image top breedगरज इस्रायली तंत्रज्ञानाची
इस्रायलमध्ये पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवला जातो. महत्त्वाचं म्हणजे अजिबात नासाडी न करता ते सर्व पाणी ते उपयोगात आणतात. आपल्याकडं साठवणुकीचं प्रमाण वाढवून गळतीचं प्रमाण कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी हेच इसायली तंत्रज्ञान उपयोगी पडेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. पाण्याच्या बाबतीत सरकार योजना राबवतंयच, पण 'मायबाप सरकार', म्हणजेच सर्व काही सरकार करेल, या मानसिकतेतून आपण बाहेर यायला पाहिजे. पाण्याच्या प्रश्नी एनजीओ आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था, संघटना यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सर्वांच्या सहकार्यातून आपणाला नक्कीच दुष्काळावर मात करता येईल, असाही विश्वास पुरंदरे यांनी बोलून दाखवला.

 

'भारत4इंडिया'ची भूमिका
'भारत4इंडिया'चे वृत्तसंपादक श्रीरंग गायकवाड यांनी स्वागतपर भाषणात 'टॉप ब्रीड' स्पर्धेमागील, तसंच 'जागर पाण्याचा' या अभिनव उपक्रमामागील भूमिका विषद केली. दुष्काळग्रस्त जनतेला सरकारचा आधार मिळतो आहेच. या मदतीच्या जोडीला त्यांना हवी आहे, परिस्थितीशी झगडण्यासाठीची मानसिक उभारी. दुष्काळाशी झुंजणारी, पाणी जपणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेतच. त्यांची ही धडपड आम्ही कॅमेऱ्यात टिपून त्यांच्या यशोगाथा 'भारत4इंडिया.कॉम' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केल्या आहेत, आणि त्या मालिकेला नाव दिलंय, 'जागर पाण्याचा'! आम्ही आमच्यापरीनं हा जागर बांधापर्यंत पोहोचवला आणि शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली, ती पाणी राखण्याची! साहजिकच समाजाच्या सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक झाल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.IMG-20130329-WA0014पाठबळाची हमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब धोंगडे, माजी आमदार शिवराम झोले, मुंडेचे सरपंच चंद्रकांत गतीर, मार्केट समितीचे सभापती संपतराव काळे, सुनील वाजी, हिरामण कवाटे, कैलास चौधरी, शिवा काळे, रघुनाथ टोकाडे, प्रल्हाद जाधव, केरू पाटील-देवकर आदी स्थानिक नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. अनेकांनी भाषणात 'भारत4इंडिया'च्या दोन्ही उपक्रमांचं तोंड भरून कौतुक करून पाठबळ देण्याची भूमिका जाहीर केली.

 

शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद
कार्यक्रमानंतर मान्यवर, उपस्थित मिळून सर्वांनीच पाण्याचा जागर घातला. जिथं जिथं दुष्काळाच्या नावावर गंभीर प्रश्न आहेत, त्याच परिसरात त्याची पूर्वांपार उत्तरं आहेत. या उत्तरांचा शोध आपण सर्वांनीच घ्यायला हवा. शेतकरी आपापल्यापरीनं जे अभिनव प्रयोग करीत आहेत, त्याकडं म्हणूनच डोळसपणं पाहण्याची गरज आहे. ही भूमिका घेऊन या प्रश्नाशी निगडित सर्वच घटकांनी एक मोठा जागर करण्याची गरज आहे. त्यासाठीच 'भारत4इंडिया'नं हा पाण्याचा जागर घालण्यास सुरुवात केलीय, असं सांगून सर्व यशोगाथा मोठ्या पडद्यावर शेतकऱ्यांना दाखवण्यात आल्या. त्या पाहिल्यानंतर मग काय बोलता राव... पाणी कसं राखता येईल, याशिवाय दुसरी बातच कुणाच्या तोंडात नव्हती. नेमक्या याचसाठी तर हा सगळा घाट घालण्यात आला होता.
आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती उद्या होणाऱ्या (३० मार्च) 'टॉप ब्रीड' स्पर्धेची... कुणाचं जित्राब बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.