बाजारात करोडो रुपयांची उलाढाल
राज्यभरात ठिकठिकाणी जनावरांचे बाजार भरतात. काही ठिकाणी यात्राजत्रांच्या निमित्तानं बाजार भरतात. त्यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. परंतु, अजूनही त्याकडं व्यावसायिक दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन तयार झालेला नाही. शेतकरी सोडला तर त्याविषयी फारसं कुणालाच काही देणंघेणं नसतं. त्यामुळंच राज्यातील या पशुधनाचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. पण, हा शेतकऱ्याच्या अर्थकारणावर थेट प्रभाव टाकणारा कसा विषय आहे, हे या जनावरांच्या बाजारातून पहायला मिळतं.
घोटीच्या बाजारातही अनेक कारणांनी जित्राबांची खरेदी-विक्री होत होती. छोट्यामोठ्या शेतकऱ्यांची अनेक आर्थिक गणितं त्यावर कशी ठरलेली असतात, हेदेखील दिसलं. सध्या राज्यात पडलेल्या दुष्काळाचं सावट या बाजारावरही होतं. अनेकांनी दुष्काळामुळं हे लाखमोलाचं पशुधन विकून टाकलं. जगण्यासाठी पैसा मिळवणं याबरोबरच मुक्या जीवांच्या चारा-पाण्याची आबाळ होऊ नये, हा उदात्त दृष्टिकोनही त्यामागं होता. काही शेतकरी आपल्या जुन्या बैलाची विक्री करून नवीन बैल खरेदी करण्यासाठीही आले होते. त्यातच 'भारत4इंडिया'नं भरवलेल्या आगळ्यावेगळ्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेमुळं डांगी आणि खिल्लार जातीच्या जातिवंत बैलांचा भावही वधारत असल्याचं सुचिन्ह दिसलं.
आधुनिकीकरणातही पशुधनाला महत्त्व
शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिकीकरणाचा प्रभावही या बाजारावर जाणवला. एकीकडं झपाट्यानं यांत्रिकीकरण होत असताना आणि ते पारंपरिक शेतीपेक्षा सुलभ असताना जनावरं बाळगणं, त्यांची आनंदानं जोपासना करणं, हे हळूहळू कमी होत चाललंय. प्रामुख्यानं पशुधन जगवलंय ते लहान शेतकऱ्यांनी. हे छोटो छोटे शेतकरी आपलं पशुधन मुलाबाळाप्रमाणं जपत आहेत. त्यातही डांगी आणि खिल्लार या जातिवंत बैलांना आजही चांगली मागणी आहे.
बैलांच्या अनेक जाती उपलब्ध
या घोटीच्या जनावरांच्या बाजारामध्ये अगदी पाच-पंधरा हजाराच्या वासरापासून ते अगदी एक लाखापर्यंतची जनावरं विक्रीला आली होती. ज्याला जशी गरज, त्याप्रमाणं पूर्ण बाजार फिरून जनावरांची खरेदी किंवा विक्री जोमानं सुरू होती. प्रामुख्यानं डांगी, खिल्लार, जातीची धिप्पाड जनावरं सर्वांचच लक्ष वेधून घेत होती. जनावरांच्या जातीनुरूप किंवा ब्रीडनुसार आणि त्यांच्या तब्येतीवरून त्यांची किंमत ठरवली जात होती. अशा तऱ्हेनं अनेक बैलांमधून आपल्या आवडत्या बैलाची निवड केली जात होती.
सतरा हजारांत घेतला खिल्लार
कोण म्हणतं शेतकऱ्याला आर्थिक ज्ञान कमी असतं? बळीराजा गरजा गरजांना कशा जोडतो, हे इथं पाहायला मिळालं. हेच पाहा... इथं दोघा शेतकऱ्यांमध्ये बैलाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. सोमा बोहाडे यांनी आपला बैल विक्री करण्यासाठी बाजारात आणला होता, तर काशिनाथ जमदाडे यांच्याकडे घरी खिल्लार जातीचा एक बैल असल्यामुळं त्याच्या साथीला ते जोडीदार शोधत होते. संपूर्ण बाजार फिरून ते शेवटी बोहाडे यांच्या खिल्लाराकडं वळले. सुरुवातीला बोहाडे यांनी आपल्या बैलाची किंमत अठरा हजार रुपये सांगितली. त्यावर घासाघीस करून 17 हजारांवर सौदा झाला. पैशाची अडचण सोडवण्यासाठी बोहाडेंनी जित्राबाला बाजाराचा रस्ता दाखवला. पण दावणीचं जनावर जाताना त्यांच्याही काळजाला कुठंतरी रुतत होतं, हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं. जमदाडेंची गरज, त्यांच्या अपेक्षेप्रमाणं पूर्ण झाली. शेवटी ही जनावरं नेताना या व्यवहारातही जित्राबाच्या प्रेमाचा ओलावा होताचं. व्यवहार व्यवहाराच्या मार्गानं होतोचं हो... तो कुणाला चुकलाय? पण त्यातही असणारा मुक्या प्राण्यांविषयीचा ओलावा महत्त्वाचा. म्हणूनच करोडोंची उलाढाल होणारा या बाजाराचा अजून तरी धंदा झालेला नाही, आणि होणारही नाही.
Comments
- No comments found