टॉप ब्री़ड - घोटी

'डांगी'वर उमटणार भारताची मोहोर

ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
आपल्या कृषिप्रधान देशातील पशुधनाचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असतं. 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून जे संचित हाती लागलंय ते सरकारी योजनांसाठी बळकटी देणारंच ठरणार आहे. घोटीला (जि. नाशिक) झालेल्या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या 'टॉप ब्रीड'च्या रक्ताचे नमुने तपासून, त्यांचा जनुकीय अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतचा अहवाल सादर करून 'डांगी'सारखी दुर्मिळ जात जगात केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागातच आढळते, यावर शिक्कामोर्तब होईल.
 

 

स्पर्धेमागील व्यापक भूमिका

आपल्याकडील दुर्मिळ जातींचं संगोपन करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आपला पुर्वानुभव. काही वर्षांपूर्वी ब्राझील या देशानं आपल्याकडील गीर जातीचं जित्राब तिथं नेलं आणि तिकडल्या जातीशी त्याचा संकर केला. त्यातून भरपूर दूध देणाऱ्या झेबू या जातीची निर्मिती झाली. आता जर या जातीवर ब्राझीलनं आपला हक्क सांगितला, तर आपण काहीही करू शकत नाही, कारण गीरचं आपल्याकडे पेटंटच नाही. म्हणूनच डांगी, गावलाओ, लालकंधारी सारख्या जाती आपल्या आहेत, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठामपणं सिद्ध करण्याची गरज आहे. त्यासाठी मुळात सर्वप्रथम सर्व जातींच्या पशुधनाची तपासणी झाली पाहिजे. त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन आणि मग पेटंट मिळवण्याची कायदेशीर लढाई. नेमकी हीच गरज ओळखून या सर्व प्रक्रियेचा पाया असणारी तपासणी मोहीम 'भारत4इंडिया'नं या स्पर्धेच्या निमित्तानं हाती घेतलीय. त्यामुळं समाजाच्या सर्वच स्तरातून त्याचं अभिनंदन होतंय.

 


Dangi 12 bharat4india.comराज्यात आढळतात पाच जातींचे बैल

आपल्या राज्यात पाच प्रकारचे बैल आढळतात. डांगी, खिल्लार, देवनी, गावलाओ आणि लालकंधारी या त्या पाच जाती. याशिवाय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा गाई, म्हशीही आपल्याकडंच दिसतात. उदाहरणार्थ, लातूर इथं आढळणारी देवनी किंवा पंढरपुरातील पंढरपुरी जातीची म्हैस. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण जातींच्या बैलांवर आणि जनावरांवर आपला भारताचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. त्यासाठी मुंबईतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात याबाबतचा अभ्यास सुरू असल्याची माहिती इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद इथले पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी दिलीय. डॉ. भणगे हे जेनेटिक्स, मानवी आरोग्य आणि पशू आरोग्याविषयीचे अभ्यासक आहेत.

 

Dangi 4 bharat4india.comदुर्मिळ जातींचं संगोपन

डांगी ही जात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि नगर तालुक्यातील अकोले तालुक्यात विकसित झालेली आहे. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. भरपूर पावसात तग धरणारी आणि चांगली रोगप्रतिकारक क्षमता असलेली ही जात आहे. इगतपुरी आणि अकोलेशिवाय गुजरातच्या डांग जिल्ह्यातसुद्धा ही जात विकसित करण्याचा प्रयत्न झालाय.

 


सरकारचे विविध उपक्रम

तेलकट कातडी, विशिष्ट आकार, उभी राहण्याची विशिष्ट पद्धत असलेल्या डांगीचं संवर्धन करण्यासाठी सरकारनं काही उपक्रम हाती घेतलेत. पशुप्रदर्शन घेऊन लोकांना चांगल्या प्रकारच्या पशुपालनाविषयी आवड निर्माण करणं, डांगी जातीच्या जनावरांचं संगोपन करणं. ते संगोपन करत असताना शेतकऱ्यांना जे जे हवंय ते ते देणं. उदा. कृत्रिम रेतनाची सुविधा, काही निकृष्ट वळूंचं खच्चीकरण करणं आणि चांगल्या जातीची पैदास करून उत्कृष्ट वळू तयार करून त्यांना बाजारात चांगली किंमत मिळवून देणं इत्यादी उपक्रम सरकारनं हाती घेतलेत.

 


Dangi 8 bharat4india.comगुणसूत्रांचा अभ्यास

आपल्या देशात आढळणाऱ्या या दुर्मिळ जातींचं पेटंट घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेत. त्यानुसार आपल्याकडील जनावरांच्या जातींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायला सुरुवात झाली. मग वर्णनानुसार, गुणरूपानुसार म्हणजेच त्याच्यावर असलेले ठिपके, शिंगं, नाक, कातडी, डोळे, उभं राहण्याची पद्धत, शेपटीचा गोंडा, बीजांड या सर्व गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. ही सर्व बाहेरील गुणवैशिष्ट्यं झाली. मग शरीरातले काय? याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करण्यात आला. गेल्या वर्षी भारतात ज्या-ज्या भागात जी वैशिष्ट्यपूर्ण जनावरांची जात आढळते, त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, त्यांची चाचणी करून, त्यांच्या गुणसूत्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या जातींवर आपली मोहोर उमटवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. कारण ती जात फक्त आपल्या देशातच आढळते.

 


स्थानिक पातळीवरील प्रयत्न

त्यामुळंच या जातींच्या संगोपनासाठी आता स्थानिक पातळीवर 'टॉप ब्रीड'सारख्या स्पर्धांमधून जो टॉप ब्रीड ठरला. त्याचं रक्त गोळा करण्यात आलं. मग रक्तातली गुणसूत्रं वेगळी करून त्यांच्या रचनेचा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अभ्यास केला जातोय. या सर्व अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आलंय, जे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारलासुद्धा सादर करण्यात आलंय. त्यामुळं आता लक्ष आहे ते हा अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला जाऊन आपल्याकडील जनावरांच्या जातीचा हक्क आपल्याला कधी मिळतो याकडं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.