जमाना माध्यमांचा आहे. माहितीच्या विस्फोटाचा, स्पर्धेचा आहे. सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावागावांतून निघालेल्या जथ्थ्यांचा आता गर्जणारा, उचंबळणारा भाविकांचा विराट ओघ बनला आहे. या आधुनिक युगात दुर्मिळ झालेली धोतर, लुगडी.., डोई, खांद्यावर हेलकावत निघालेली बोचकी.., निब्बर अनवाणी पावलं.., भाबडे चेहरे शूट होतायत. आभाळाकडं तोंड केलेल्या 'ओबी व्हॅन्स' काही सेकंदात त्यांना 'ऑन एअर' करतायत. टीव्हीवर हा 'लाईव्ह' सोहळा पाहताना घरोघरी भक्तीभाव दाटून येतोय. पाठीला सॅक अडकवून आपल्या इंडियन फ्रेन्डस् सोबत वारीत सहभागी झालेल्या फॉरीनर्ससाठी तर ही नवलाईच...
वारीबद्दल बोलताना कुणी म्हणतो, 'ही वर्षानुवर्षांची थोर परंपरा.'..'शेतातली कामं धामं सोडून निघाले पंढरीला'..कुणी टोमणा मारतो...नाही तर 'ही झाली रिकामटेकड्यांची महिनाभराची पोटापाण्याची सोय'...असे शेरे, मतमतांतरं, चर्चा. पण ती या चालणाऱ्यांच्या गावीही नसते. ते आपले चालतच असतात दरवर्षी. आषाढी-कार्तिकीला ते असे न चुकता येरझाऱ्या घालतात म्हणून त्यांना म्हणतात, वारकरी! कुणी रस्त्यात थांबवून प्रेमानं जेवू घातलं तर जेवतात. ओसरी दिली तर थांबतात. पहाट होताच चालू पडतात. हातात टाळ, वीणा असायलाच पाहिजे असं काही नाही. मुखी नाम आणि दोन्ही हातांची टाळी पुरे.
यांचा देवही तसाच. ओबडधोबड. काळा. कमरेवर हात ठेवून यांची वाट बघत उभा राहिलेला. वर्षानुवर्षे. या दोघांमध्ये देव-घेवीची भानगड नाही. म्हणजे भक्तानं देवाला भेटवस्तू अर्पण कराव्यात, नवस करावा आणि बदल्यात देवानं प्रसन्न होऊन यांच्या घरीदारी, शेताशिवारात समृद्धी आणावी, असलं काही नाही. बरं एवढे दिवस चालत गेल्यावर देवाची भेट व्हायलाच पाहिजे असंही नाही. मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी वारी पूर्ण! पुन्हा येऊन आपलं रोजचं आयुष्य जगू लागतात. शेताशिवारात राबू लागतात. ही माणसं वारी का करतात? त्यांना त्यातून काय मिळतं? त्यांचा देव त्यांना देतो तरी काय? असे प्रश्न विचारले जातातच.
फार शोधावं लागणार नाही. सोपं आहे. कुठल्याही संताचा एखादा अभंग वाचून पाहावा. उत्तर मिळतं. उदाहरणादाखल पुण्या-मुंबईजवळ असणाऱ्या देहूच्या तुकोबारायांचा एक अभंग पाहा-
उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।।
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।।
सजनकसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।।
नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।।
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित। ज्ञानियाची भिंत अंगी ओढी।।
अर्जुनाचे रथी होय हा सारथी। भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।
गौळीयांचे घरी गाई अंगे वळी। द्वारपाळ बळीद्वारीं झाला।।
यंकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबऋषीचे सोशी गर्भवास।।
मिराबाई साटीं घेतो विषप्याला। दामाजीचा जाला पाडेवार।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी।।
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत। तुका म्हणे मात धन्य याची।।
हा अभंग वारकऱ्यांच्या नित्यनेमाच्या भजनातला. अगदी पहाटे उठून दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरणातला हा अभंग टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर गावोगावी म्हटला जातो. या अभंगाचा भावार्थ असा की, कटेवर कर ठेवून उभा राहिलेला वारकऱ्यांचा देव विठोबा उच्च-नीच असा भेदभाव करत नाही. भक्त गरीब आहे की श्रीमंत, याच्याशी त्याला घेणे देणे नाही. भक्ताचा भाव शुद्ध आहे ना, बस्स. मग त्याच्याकडं फुटकी कवडी का नसेना. म्हणजे मार्क्सच्या अगोदर आपल्या संतांचे हे अभंग गरीबांच्या, श्रमिकांच्या बाजूने बोलत होते!
अभंगातली दुसरी ओळ सांगते, महाभारतातली एक गोष्ट. एका दासीपुत्राची. कौरवांच्या दरबारात मंत्री असूनही सामाजिक स्थान नाकारले गेलेल्या विदुराची. त्यांच्या नेकीची, गरीबीची. कौरव पाडवांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी गेलेला द्वारकेचा राजा श्रीकृष्ण म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचा पूर्वावतार. त्या वैभवी राजवाड्यातली पंचपक्वान्नं नाकारून तो विदुराघरच्या कण्या खातो. या कण्या म्हणजे उकडलेलं धान्य. हाताशी शिजवायला काहीही नसताना एखाद्या मायमाऊलीनं दरिद्री संसारात साजरा केलेला स्वयंपाक. आपला गरीब ब्राम्हण मित्र सुदामा याच्या हातचे मूठभर पोहे श्रीकृष्ण मोठ्या आवडीने खातो. तुकोबाराय त्याचीही आठवण अभंगात पुढे करून देतात. अभंगांमधला विठोबा नेहमी असा गरीबांच्या पाठीशी उभा राहतो. त्यांना जगायला बळ देतो.
तुकोबारायांच्या वरील अभंगाच्या पुढच्या ओळीत येतात महाराष्ट्राबाहेरचे संत रोहीदास आणि कबीर. त्यांच्यासोबत त्यांची जात येते. जातीसोबत चिकटलेली कामं येतात. ती तर त्यांना करावीच लागणार होती. मग देव त्यांच्या मदतीला जातो. त्यांची काम हलकी करतो. रोहीदासाचं कातडं कमावण्याचं, रंगवण्याचं दुर्गंधीचं काम असो की कबीराचं तासन् तास बसून शेले विणण्याचं... अभंगात पुढं उल्लेख येतो एका विलक्षण संताचा. तो काही रुढ वारकरी पठडीतला नाही. तो आहे कसाई अर्थात खाटीक. त्याचं नाव सजन कसाई. तो आपला वाडवडलांपासून आलेला खाटकाचा व्यवसाय करतोय. मटणाचं दुकान चालवतोय. पण तो आहे विठोबाचा भक्त. मग काय सोवळ्या-ओवळ्याचे, चंदनादी अभिषेकाचे उपचार गुंडाळून, पंचपक्वान्नाच्या नैवद्याकडं दुर्लक्ष करून विठोबा थेट सजन कसायाचं दुकान गाठतो. त्याला कामात मदत करतो. त्याच्या दुकानातलं मांस विकू लागतो. सजन कसायानं दाखवलेल्या मटनाच्या नैवद्यालाही तो नाक मुरडत नाही.
अभंगातला पुढचा संतही जगावेगळा आहे. तो कधीही दहा मैलांवर असलेल्या पंढरीतल्या विठोबाच्या दर्शनाला गेलेला नाही. तो आपल्या शेतकामात दंग आहे. त्याचं नाव संत सावता माळी. तो म्हणतो, 'कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी...' मग विठोबा विरघळतो. भेटायला आलेल्या हजारो भक्तांना सोडून सावता माळ्याला भेटायला त्याच्या अरणी गावी जातो. त्याच्या मळ्यातला भाजीपाला खुरपत बसतो. त्याला शेतीतलं काम करू लागतो. अभंगात नंतर ज्याचा उल्लेख येतो तो संत नरहरी सोनार काही मूळचा विठ्ठलभक्त नव्हे. तो होता कट्टर महादेवभक्त. पण महादेव आणि विठ्ठल अर्थात शैव आणि वैष्णव काही वेगळे नव्हेत, असा साक्षात्कार त्याला झाला. नरहरी सोनाराचा देवावर आणि देवाचा नरहरीवर जीव जडला. देव त्याची भट्टी फुंकणे, दागिने घडवणे अशी कामं करू लागला.
या अभंगात तुकाराममहाराज अगदी आवर्जून संत चोखा मेळ्याचा उल्लेख करतात. चोखा मेळा खालच्या जातीतला म्हणून त्याला कधीही विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊ दिलं गेलं नाही. एवढंच नाही तर देवळाच्या आसपास फिरकला तरी त्याला प्रचंड मारहाण झाली. शेवटी तो चंद्रभागेच्या पलिकडच्या तीरावर जाऊन राहिला. विठुराया या चोखोबाला त्याची सगळी गावकीची कामं करू लागला. अगदी मेलेली ढोरंही ओढू लागला. त्याच्या घरी पोटभर जेवला. गावकुसू पडून चोखोबांचा अंत झाला तेव्हा त्याच्या अस्थि आपल्या महाद्वारासमोर पुरण्याचा आदेश देवानंच दिला. ज्या सवर्णांनी चोखोबाची सावलीही अंगावर पडल्यास विटाळ मानला त्यांना देवानं चोखोबाच्या मृत्यूनंतर अंगाला शिवू दिलं नाही. 'मला शिवू नका, मला चोखोबाचं सुतक आहे' असं त्यांना बजावलं.
तुकोबाराय अभंगात पुढचा आणि महत्त्वाचा उल्लेख करतात तो संत नामदेव आणि जनाबाईचा. जनाबाई ही अनाथ. तिला नामदेवांच्या कुटुंबानं सांभाळली. दिवसभर कामाचा रगाडा उपसणाऱ्या या जनाबाईची कामं देव करू लागला. अगदी रानात जाऊन शेण्याही वेचू लागला. ही जनाबाई साधीसुधी नव्हती. या अत्यंत प्रतिभाशाली कवयत्रीनं सर्व जातीच्या संतांचं कर्तृत्व आपल्या अभंगांतून अजरामर करून ठेवलंय. नामदेव तर देवाचा लाडका भक्त. तत्कालीन समाजव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या या संतानेच वारकरी पंथाच्या उभारणीचं, प्रसाराचं राष्ट्रीय कार्य करून ठेवलं. खुद्द तुकाराम महाराजच विनम्रपणे म्हणतात, माझं अभंग लेखन म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संतशिरोमणी नामदेवरायांचं राहिलेलं अर्धं काम आहे. नामदेवरायांचं ते काम म्हणजे वारकरी पंथाच्या समतेच्या, बंधुभावाच्या प्रचाराचं. आपण विविध जातीपातींत, विविध स्तरांमध्ये विभागलो गेलो असलो तरी आपण एक आहोत. एकमेकांना प्रेमानं मदत करत आपण सुखी आयुष्य जगलं पाहिजे, ही साधीसोपी शिकवण देत नामदेवराय देशभर फिरले. अठरापगड जातींतून संत तयार केले. त्यांना आत्मभान दिलं. लिहायला वाचायला शिकवलं. पंढरपुरात वीटेवर उभ्या राहिलेल्या देवाला नामदेवरायांनीच चालतं बोलतं केलं. त्याला समतेचा, समन्वयाचा प्रतिक बनवलं. त्याला समोर ठेवून सामाजिक संदेश देणारे अभंग लिहिले.
विविध संतांनी नामदेवरायांचा हाच वारसा पुढं चालवला. तशाच प्रकारचे अभंग लिहिले. तुम्ही कुठल्याही वारकऱ्याला विचारा, कोणत्याही संताचा आशयगर्भ असा एखादा तरी अभंग तो घडाघडा म्हणून दाखवेल. हे अभंग म्हणजे अलौकीक प्रतिभाशक्ती, प्रखर सामाजिक जाणीव आणि विठुरायाच्या माध्यमातून दिला जाणारा एकोप्याचा, समतेचा संदेश आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर तो संदेश जागवतच वारकरी पंढरीची वाट चालत राहतात. युरोपातल्या साहित्यिक, सामाजिक क्रांत्यांच्या अगोदर आपल्या संतांनी ही सामाजिक, वैचारीक घुसळण घडवून आणली होती. तिच्या लाटा अजूनही इथं उचंबळत आहेत. वारी म्हणजे तरी दुसरं तिसरं काय आहे? वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या वारीची चंद्रभागा वाहती का आहे? याचं उत्तर 'ती सर्वांना सोबत घेऊन जाते!', असंच आहे. नव्या पिढीनेच नव्हे तर धर्म, जातीच्या आधारावर राजकारण करू पाहणाऱ्यांनीही ते नीट लक्षात घेतलं पाहिजे.
Comments
- No comments found