जगायला शिकवणारा देव

श्रीरंग गायकवाड
वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.

Pandharpur Wari 7चैत्र-वैशाखी उन्हाच्या रणरणत्या लाह्या रानभर फुटत असतात. आभाळाकडं तोंड करून तापत पडलेल्या रानाची तगमग-तगमग होत असते. एका दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गोल गोल फिरत आभाळात जातो. कुठल्याशा कोपऱ्यातून एकेक ढग जमा होतो. त्यांचं क्षणात पांढऱ्यातून काळ्यात रुपांतर होत राहातं. चकीत होऊन पाहणाऱ्या रानाच्या अंगाखांद्यावर टप् टप् करत वळवाचे टप्पोरे थेंब पडतात. त्या थंड स्पर्शानं रान शहारतं. धारा नेम धरून बरसू लागतात. बघता बघता ढेकळांचं लोणी होतं. शेता-बांधातून लाल-तांबडं पाणी खळाळू लागतं. झाडं झडझडून अंगावरचं पाणी झटकतात. अन् सृष्टी ताजीतवानी होऊन जाते...हळू-हळू कड्या-कपारीच्या आडून पोपटी कोंब डोकावू लागतात. ज्येष्ठ-आषाढाची हिरवाई रानावर दिसू लागते. अशा वेळी या हिरव्या रानात दूरवर एक पांढरा ठिपका दिसतो. एका ठिपक्याचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे दहा ठिपके होत होत ठिपक्यांची लांबच लांब रांग हळू हळू जवळ येते. टाळ-मृदुंगाचा आवाज मोठा होत जातो. कपारीआडून बाहेर डोकावू लागलेली कोवळी पानं टाळ्यांचा ताल धरतात. मृदुंगाच्या धुमाळीवर रस्त्याकडेची झुडपं अंग घुसळू लागतात. ''वारी आली..माऊली आली..पालखी आली...'' वाटेवरच्या गावात चैतन्य जागतं. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला झुंबड उडते...
विठुरायाच्या पंढरीला निघालेली ही आषाढी वारी! साऱ्या मऱ्हाटी मुलुखाचा भावसोहळा. मराठी माणूस जगभर जिथं आहे तिथून तो काया, वाचा, मनानं या चैतन्य-सोहळ्याला जोडला जातो. 'ज्ञानबा-तुकाराम'च्या ठेक्यावर दुडक्या चालीनं पंढरीची वाट चालू लागतो.
images vari11दरवर्षी न चुकता लाखो भाविक संताच्या पादुका पालखीत ठेवून नाचत गात पंढरपूरला जातात. ते नित्यनेमाने अशा येरझारा घालतात म्हणून त्यांना म्हणतात, वारकरी. खेडोपाड्यांतून आलेल्या असंख्य वारकऱ्यांची मिळून होते पंढरीची वारी! ती कधीपासून सुरू आहे कुणास ठावूक? ज्ञानदेव-नामदेवांच्या आधीपासून ती सुरू आहे म्हणतात. संत तुकाराममहाराज 1400 टाळकऱ्यांसह देहूहून आषाढी वारीला पंढरपूरला जायचे. त्यांच्यानंतर त्यांचे धाकटे सुपुत्र नारायणमहाराज यांनी सध्याचा पालखी सोहळा सुरू केला. तुकोबाराय आणि ज्ञानदेवांच्या पादुका एका पालखीत घालून 'ज्ञानबा-तुकाराम' या भजनाच्या तालावर नाचत शेकडो वारकरी नारायणमहाराजांसोबत पंढरीला जाऊ लागले. म्हणजे 1680 ते 1835 पर्यंत हा उपक्रम अव्याहत सुरू होता. 1835मध्ये या दोन पालख्या स्वतंत्र झाल्या. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीहून सुरू झाली. मराठेशाहीतील शिंद्यांचे एक सरदार हैबतराव बाबा आरफळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
न्यायमूर्ती रानडेंच्या निरिक्षणानुसार 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रभरातून 18 संतांच्या पालख्या पंढरपुराला जात. त्यात काशीहून कबीर आणि कर्नाटकातून विठ्ठल पुरंदर, बोरवणकरबाबा या पालख्यांचाही समावेश होता. त्यासोबत शंभरावर दिंड्या असल्याची नोंदही त्यांनी केलीय. सध्या तुकोबारायांच्या पालखीसोहळ्यासोबतच्या सुमारे साडेतीनशे दिंड्यांमध्ये साडेतीन लाखांवर वारकरी चालतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात सुमारे 400 दिंड्या सहभागी होतात. आळंदीला दोन-अडीच लाखांपर्यंत असणारा जनसमूह पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत आठ लाखांवर जातो. वारीसंबंधी पहिली लिखित नोंद म्हणजे पंढरपुरातला 1237मधला होयसळ राजाचा शिलालेख.
शेकडो वर्षे झाली. काळ बदलला. यंत्रातंत्राचं आधुनिक युग आलं. पण आषाढी वारी सुरु आहे. एका पिढीची जागा दुसरी पिढी घेते. दर आषाढीला वारीची वाट संतप्रेमानं उचंबळून येते. विठुनामाचा गजर टीपेला पोहोचतो...
भल्या-भल्यांना प्रश्न पडतो, याचं गुपीत काय आहे? हे काही फार मोठं वगैरे गुपीत नाही. समाजातल्या सर्व घटकांना आपल्यात सामावून घेतल्यानंच हा वारीचा ओघ आटला नाही, आटणार नाही हे त्यातलं उघडं सत्य. जातपात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव वारकरी करत नाहीत.
या वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ आहे. तो लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.
हिंदू धर्मात अधिकृत देवांची संख्या 33 कोटी तर अनधिकृत देव अगणित. मधल्या काळात देवांचा, त्यांच्यासाठीच्या व्रतवैकल्यांचा आणि त्यांच्या दलालांचा सुळसुळाट झाला होता. कुणीही उठावं, देवाच्या नावानं सामान्य माणसाला गंडवावं. त्याला देवाच्या कोपाची भीती घालावी. सोवळ्या-ओवळ्याच्या नावाखाली जाती-पातींची कुंपणं उंच करावीत, असा उद्योग. बाराव्या-तेराव्या शतकात या देवबाजीला उधाण आलं होतं. यात भरडून निघालेल्या बहुजन समाजानं मग त्यांचा स्वत:चा साधासोपा देव शोधला. जो रंगानं त्यांच्यासारखाच काळा, शांत, सात्वीक भावमुद्रेचा, शस्त्रं टाकून कमरेवर हात ठेवलेला, पूजाविधीचं, भक्तीचं कुठलंही अवडंबर नसलेला देव, पंढरीचा श्री विठ्ठल! विटेवर स्थिर उभ्या राहिलेल्या या देवामुळं शेंदऱ्या-हेंदऱ्या दैवतांचा बाजार कमी झाला. सर्वसामान्यांच्या मनाला गोंधळही दूर झाला. अनेक विद्वान म्हणतात, या देवावर भगवान बुद्धांचा प्रभाव आहे, कुणी म्हणतं जैनांचा प्रभाव आहे तर कुणाच्या मते यावर एकेश्वरवादी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे. म्हणोत बापडे. ज्या धर्मात, ज्या देवात जे जे काही चांगलं आहे, ते या श्रीविठ्ठलात सामावलं गेलंय, असं आपण खुश्शाल समजावं. या अहिंसावादी, शाकाहारी, दया, क्षमा, शांती सांगणाऱ्या देवानं दीनदुबळ्यांना आधार दिला. त्यांचं आत्मभान जागं केलं. त्यांना आत्मविश्वासानं जगायला शिकवलं. पिढ्यान पिढ्या सामाजिक स्थान नाकारलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा विठोबा आधार झाला.

आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता।
प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता।।
धर्म गा जागो तुझा। तूचिं कृपाळू राजा।
जाणसी जीवीचे गा न सांगता सहजा।।


असं भोळ्या भक्ताचं गुज जाणून घेणारा हा देव समाजाच्या सर्व थरांत मान्यता पावला. त्याला असा चालता बोलता करण्याचं काम केलं, त्याच्या लाडक्या भक्तानं भक्तानं, संतशिरोमणी नामदेवरायानं. त्यानं या देवाची पताका महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत संपूर्ण भारतभर फडकवली.

'सकळांसी येथे आहे अधिकार' असं सांगत त्यांनी अधिकारहिनांना भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. या देवाला प्राप्त करण्यासाठी जपतप, यज्ञयाग, करावे लागत नाहीत. व्रत, अनुष्ठानं करायला लागत नाहीत. हिमालयात, काशी-उत्तराखंडात जावं लागत नाही.

Pandharpur Wari 5न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।।
ठायीच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आळवावा।।
अशी साधीसोपी 'नाम' भक्ती ज्ञानदेव-नामदेवांनी समाजाला सांगितली. म्हणजे आपण जे काम करतो आहोत, त्यातच राम मानायचा किंवा जिथं आहोत तिथंच बसून मनापासून देवाचं नाव घ्यायचं की देव पावतो, याची प्रचिती त्यांना येऊ लागली. त्यामुळं
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम। आणिकांचे काम नाही आता।
असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.
याच शूद्रातीशूद्र समाजातून मग संत तयार झाले. आपल्या कामातलीच रुपकं वापरून अभंग लिहू लागले. त्यांच्या कामाचा विठोबा त्यांना प्रसन्न होऊ लागला. 'देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार', असं सोनारकीचं काम करता करता संत नरहरी सोनार म्हणू लागले. 'आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक', असं संत सेना न्हावी म्हणू लागले. 'दळिता कांडिता तुज गाईन अनंता' असं संत जनाबाई म्हणू लागल्या. संत सावतामाळी तर याहून पुढं गेले. 'कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी' म्हणत त्यांनी आपल्या हिरव्या शेतमळ्यातच श्री विठ्ठल पाहिला. त्याच्या दर्शनासाठी त्यांना पंढरपूरला जाण्याचीही गरज वाटली नाही.
हा देव केवळ निर्मळ, भोळा भक्तीभाव पाहतो बरं.
उंच नींच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनिया।।
असं संत त्याच्याविषयी म्हणतात. त्यांनीच त्याबाबतच्या असंख्य कथा लिहून ठेवल्यात.
हा देव संत रोहिदासाला चपलांचं चामडं रंगवू लागला. कबिराला शेले विणू लागला. सावता माळ्याला खुरपू लागला, नरहरी सोनाराला दागिने घडवू लागला. गोरा कुंभाराला मडकी बनवण्यासाठी चिखल तुडवू लागला. चोखोबाला मेलेली ढोरे ओढू लागला. सजन कसायाला त्याच्या मटनाच्या दुकानात बसून मांस विकू लागला...या कथा म्हणजे संतांची अलौकीक प्रतिभाशक्ती. ती जागृत केली नामदेवरायांनीच. केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतातही. संत कबीर, कमाल, रोहिदास, नरसी मेहता, मीराबाई असे किती तरी थोर संत नामदेवांच्या या शिकवणुकीतून उभे राहिले. याच तत्त्वज्ञानातून शीख धर्माचा पाया घातला गेला.
पुरुषांसोबत स्त्रियाही वारीच्या या ओघात सहज सहभागी झाल्या. नामदेव, चोखोबाच्या कटुंबातील स्त्रिया अभंग लिहू लागल्या. आजही हजारो स्त्रिया संत जनाबाईच्या ओव्या गात पंढरीची वाटचाल करतात. जनाबाईसारखी दासी, कान्होपात्रेसारखी वेश्या विठ्ठलाच्या लाडक्या भक्त होऊ शकल्या. भागू महारीण, संताबाई, वत्सला संतपदाला पोहचू शकल्या.
स्त्रीशूद्रांना असा समान अधिकार देण्याचा प्रयत्न वारकऱ्यांआधी झाला नव्हता असे नाही.
त्यापूर्वी इथं लिंगायत होते. महानुभव होते. बौद्ध होते. जैन होते. नाथपंथीय होते. त्यांनीच या सामाजिक मंथनाची सुरुवात, मशागत करून ठेवली होती. पण वारकरी पंथ वाढण्याचं आणि टिकण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या पंथाची सर्वसमावेशकता आणि विनम्रता. अजूनही वारकरी सोबत चालणाऱ्याचं ज्ञान, वय, अधिकार तपासत नाहीत. तर ते विनम्र भावनेनं एकमेकांच्या पाया पडतात. प्रेमभरानं आलिंगन देतात. वारकरी परंपरा वर्षानवर्षे चालत राहण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं लिखित साहित्य अर्थात अभंग. प्रत्येक वारकरी संताला हलाखी, अवहेलना सोसावी लागूनही या संतांनी आपलं अभंगलेखन थांबवलं नाही. नामदेवांनी शोधलेला हा अभंग छंद एवढा सोपा की अशिक्षित माणसाचाही तो सहज पाठ व्हावा. त्यामुळं काळाच्या ओघात हे अभंग आणि त्यातलं जगण्याचं सोपं तत्त्वज्ञान 'अभंग' राहिलं. आजही गावोगावच्या मंदिरांमधून सकाळ संध्याकाळ हे अभंग मोठ्या प्रेमानं आणि भक्तिभावानं गायले जातात. बऱ्या-वाईटाचा, नीती-अनितीचा निर्वाळा देताना या अभंगांचे दाखले दिले जातात.
बरं भक्ती करण्यासाठी फार काही सायास करावे लागत नाहीत. कडक आचरण,नियमनियमावल्या पाळाव्या लागत नाहीत. वर नमूद केल्याप्रमाणे आपलं काम करता करता केवळ भावभक्तीनं देवाचं नाव घ्यायचं.
तुकोबारायांनी तर त्यासाठी क्वालिफिकेशनच सांगून ठेवलं आहे,
वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ। त्याच्या गळा माळ, असो नसो।।
कोणाचं वाईट करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांचं भलं व्हावं अशी इच्छा मनात असणारा माणूस खरा माळकरीच समजावा, असं हे मानवतेचं तत्वज्ञान.

Pandharpur Wari 4अजूनही विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी, वारकरी होण्यासाठी फार काही सायास करावे लागत नाहीत. त्यासाठी अमूकच प्रकारचे कपडे परिधान करावेत असा आग्रह नाही. अभंग गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असण्याची सक्ती नाही. गाणाऱ्याच्या मागे म्हटलं तरी पुरे. टाळ वाजवणंही फार सोपं. एका टाळांनं दुसऱ्या टाळावर तीनच ठोके द्यायचे. एका लयीत. पखवाजही तसाच वाजणार. त्याला म्हणायचं भजनी ठेका. लहान पोरालाही तो वाजवता येतो. टाळ वगैरे नसले तर दोन्ही हातांनी टाळी वाजवायची.
नामदेवांनी सांगितलेलं 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' हे उद्दीष्ट वारकरी अजूनही जपतात. कीर्तनकार आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर टीका करतो. चांगुलपणानं वागण्याचं आवाहन करतो. हे कीर्तन कोठेही होऊ शकतं. त्याला बंदिस्त मंदिरच पाहिजे असं नाही. मोकळ्या पटांगणात, नदीच्या वाळवंटात, वारीच्या वाटेवर, झाडाच्या खालीही कीर्तन रंगतं.
कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ, काकडआरती, पालखी, दिंड्यांनी वारकरी समुहाला, समाजाला वर्षानुवर्षे एकत्र ठेवलं आहे. एकीची, बंधुभावाची भावना बळकट केली आहे.
इथले डावे विचार असोत की समाजवादी, ते इथं रुजण्यापूर्वीची मशागत वारकरी संतांनीच तर करून ठेवली आहे.
सध्या देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत. त्यामुळं जातीधर्माच्या नावावर आपल्या राजकारणाची पोळी भाजू पाहणाऱ्यांनी आपापल्या शेगड्या पेटवल्यात. समाजा-समाजांमध्ये कलह लावण्याचा मसाला तयार होतोय. या विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी एकदा तरी हा आषाढी वारीचा समताबंधुभावाचा निव्वळशंख प्रवाह पाहावा. त्यांची गढूळ दृष्टी स्वच्छ होईल. विठुरायाच्या कृपेनं त्यांची डोकी ठिकाणावर येतील.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.