ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशांमध्ये वाईन फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकनं 'वाईन फेस्टिव्हल-2013' चं आयोजन करून जागतिक बाजारपेठेत मुसंडी मारण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय.
वाईन पर्यटनासाठी प्रयत्नशील - भुजबळ
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ज्युपिटर इथं ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन आणि इंडियन ग्रेप्स प्रोसेसिंग बोर्डच्यावतीनं सुरू असलेल्या या वाईन फेस्टिव्हलचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आलं.
अनेक देशांमध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या वाईन फेस्टिव्हलमधून कोट्यवधींची उलाढाल होते. यामुळं देशाची आर्थिक उलाढाल तर वाढतेच, पण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही चांगली भर पडते. त्यामुळंच आपल्या राज्यात वाईन पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री, तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उद्घाटनपर भाषणात दिलं.
नाशकातलं वाईन पार्क
वाईन ही शेतीशी निगडित असून, द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना त्यामुळं आर्थिक सुबत्ता लाभली आहे. अलीकडच्या काळात दिवसेंदिवस पर्यटनाचं स्वरूप बदललं असून, परदेशात इतर पर्यटनाप्रमाणंच वाईन पर्यटन वाढीस लागलंय. पण आपला वाईनकडं दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं हा व्यवसाय म्हणावा तसा आकाराला आलेला नाही. त्यामुळं वाईनकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
नाशिक - भारताची वाईन कॅपिटल
भारतात 70 टक्के वाईनचं उत्पादन होतं. त्यातलं महाराष्ट्रातलं एकट्या नाशिक जिल्ह्यात 40 टक्के उत्पादन होतं. नाशिकच्या वाईनसाठी विंचूर इथं वाईन पार्क समृद्ध केलंय. शिवाय इथं उत्पादकांनी एकत्र येत नाशिक ब्रॅण्डसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासनही भुजबळांनी दिलं. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात येणार्या पर्यटकांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मेडिकल टुरिझम, धार्मिक पर्यटन, बॉलीवूड याप्रमाणं आता वाईनकडंही पर्यटन म्हणून पाहिलं जात आहे. याचा फायदा जसा उत्पादकांना होतो आहे, त्याचप्रमाणं शेतकर्यांनाही होणार आहे. त्यामुळं शेतकर्यांनी याकडं उद्योग म्हणून पाहावं आणि आपला आर्थिक स्तर उंचवावा, असं आवाहनही भुजबळांनी केलं.
वाईनमध्ये नाशिक ब्रँड
वाईन उद्योगासाठी नाशिकचा ब्रॅँड म्हणून विकास करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, अशी मागणी इंडियन ग्रेप्स प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी केली. वाईनबाबत अधिक जागृती होण्यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. फेस्टिव्हलच्या माध्यमातून वाईऩ लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचेल, असा विश्वासही होळकर यांनी व्यक्त केला.
देशभरातले वाईन उत्पादक सहभागी
फेस्टिव्हलमध्ये देशभरातील वाईन उत्पादक सहभागी झाले होते. विविध प्रकारच्या वाईन्स, त्यासाठी लागणारी अॅक्सेसरीज आदींचे स्टॉल्सही लावले होते. तसंच रविवारी या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विनयार्ड भेटीसह वाईन टेस्टिंगचाही समावेश होता. वाईन उद्योगाला मोठी गती आणि दिशा या फेस्टिव्हलमधून लाभेल, अशी अपेक्षा आयोजकांनी यावेळी व्यक्त केलीय.
Comments
- No comments found