कास्तकऱ्याच्या हस्ते झेंडावंदन!

ब्युरो रिपोर्ट, वर्धा
भारतीय प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सगळीकडं सुरू आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या लष्कराच्या ऐतिहासिक परेडपासून ते गावागावांतील शाळांमध्ये होणाऱ्या झेंडावंदनासाठीची लगबग सुरू झालीय. 'भारत4इंडिया' आणि 'मैत्रेय ग्रुप'तर्फे देवळी (जि. वर्धा) इथं मात्र अन्नदाताअसणाऱ्या कास्तकऱ्याच्या हस्ते झेंडावंदन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. 'टॉप ब्रीड'ही अभिनव स्पर्धा तसंच त्याला जोडून होणाऱ्या कास्तकरी मेळाव्याची जय्यत तयारीही झालीय.

 


zenda vandan

 


गवळाऊ गायी आणि बैलं ही विदर्भातील कास्तकऱ्याची खरी संपत्ती. अनंत अडचणींवर मात करीत काळ्या मातीतुन पांढरं सोनं पिकवणारा हा शेतकरी पशुधन जीवापाड जपतो. जनावरं हीच आपली खरी संपत्ती असल्याची त्याला पुरेपूर जाणीव असली तरी त्यासाठी त्याला आजपर्यंत सामाजिक स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळालं नव्हतं. या स्पर्धेमुळं व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळंच पंधरा दिवसांपूर्वी 'टॉप ब्रीड म्हणजे काय रे भाऊ'? असं म्हणणारा इथला कास्तकरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोबाईल उचलून नावनोंदणी करू लागलाय. कारभारणीसहित गायी, बैलांना स्पर्धेत उतरवण्याची इच्छा आता तो बोलून दाखवतोय.
 

कास्तकरी मेळावा आणि जागर पाण्याचा
यवतमाळ रस्त्यावरील आयटीआय कॉलेजच्या मैदानावर आता भव्य मंडप उभा राहतोय. इथंच 25 जानेवारीला सकाळी स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नावनोंदणीचा कार्यक्रम होईल. जनावरांचे डॉक्टर स्पर्धेचं स्वरुप समजाऊन सांगतील. त्यानंतर विदर्भभरातून आपली जनावरं घेऊन आलेल्या कास्तकऱ्यांना संध्याकाळी 'जागर पाण्याचा' हा मान्यवरांनी गौरविलेला विशेष माहितीपट दाखवण्यात येणार आहे. 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशी 'टॉप ब्रीड' स्पर्धांना सुरवात होईल. तत्पूर्वी कास्तकऱ्याच्या हस्ते झेंडावंदन होईल. स्पर्धेसाठी जनावरांना घेऊन आलेले सर्व कास्तकरी बांधवही झेंडावंदनात सहभागी होतील.
 

मान्यवरांचं मार्गदर्शन
'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या निमित्तानं 'कास्तकार मेळावा' देखील आयोजित करण्यात आलाय. त्यामुळं स्पर्धेच्या ठिकाणी जणू शेतकऱ्यांचा महामेळावाच भरणार आहे. शेतीविषयक आधुनिक माहिती लोकांना व्हावी, या उद्देशानं मेळाव्यात विविध मान्यवरांची व्याख्यानं ठेवण्यात आलीत. स्लाईड-शोदेखील दाखवण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया हे 'विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय' या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करतील. तर नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पशुवंश शास्त्र आणि प्रजनन विभागाचे प्रमुख डॉ. अरुण सिरोथिया हे 'गवळाऊ गाईची काळजी आणि संगोपन' या विषयावर शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. याशिवाय 'अंकुर सीड्स' चे डॉ. शुक्ला हे बियाणं कसं निवडावं याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
 
'आशेचा अंकुर' पुरस्कार
बक्षीस वितरण समारंभात 'टॉप ब्रीड' ठरलेल्या गवळाऊ गायी-बैलांबरोबरच 'आशेचा अंकुर' या पुरस्कारानं खालील तीन महिलांना सन्मानित केलं जाणारंय.
1)सुनीता त्र्यंबक कोल्हे, मु. पो. टाकळी (किटे), ता. सेलू, जि. वर्धा.
2)गीता अशोक खारकाटे, मु. पो.शिरसगाव, ता. देवळी, जि. वर्धा आणि
3) लताबाई रमेश पाटील, मु. पो. हळदगाव, जि. वर्धा.


कर्जाच्या बोज्याखाली खचून शेतकरी असणाऱ्या पतीनं आत्महत्या केल्यानंतर न डगमगता या रणरागिणी पदर खोचून उभ्या राहिल्या. आज त्यांनी दाखवलेल्या हिंमतीमुळंच त्यांचं कुटुंब सुखासमाधानात नांदतंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळं देशभरात चर्चा झालेला विदर्भाच्या भूमीत या लढाऊ बाण्याच्या मायभगिणीच खऱ्या अर्थानं आशेचा अंकुर आहेत. त्यामुळंच तमाम कास्तकर बांधवांच्या उपस्थित त्यांना 'आशेचा अंकुर' पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणारंय.
 
स्पर्धेचं उद्घाटन अचलपूरचे आमदार बच्चू कडू, यांच्या हस्ते होणारंय. शिवसेनेचे हिंगणघाटचे आमदार अशोक शिंदे, माजी आमदार रामदास तडस, 'शेतकरी मित्र' चंद्रकांत वानखेडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होईल.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.