जनावरांमुळं समाजाचं आरोग्य टिकेल!

ब्युरो रिपोर्ट, देवळी (वर्धा)
कृषीप्रधान भारतात अजूनही जनावरांकडं पशुधन म्हणून पाहिलं जात नाही. खरंतर जनावरं टिकली तरच शेती पिकेल आणि अशा शेतीतून (विषमुक्त) पिकलेल्या शेतमालामुळं समाजाचं आरोग्य टिकेल. त्यामुळंच सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात 'भारत4इंडिया' जनावरांच्या मूळ जाती वाचवण्यासाठी तसंच त्यांचं सवर्धन आणि विकास करण्यासाठी राबवत असलेला 'टॉप ब्रीड' उपक्रम स्त्युत्य आहे, असं प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी अर्थकारणाचे गाढे अभ्यासक विजय जावंधिया यांनी 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केलं.
 

 

मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या सहकार्यानं 'भारत4इंडिया'नं देवळी इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवारी सायंकाळी झोकात पार पडला. देवळीचे माजी आमदार, विदर्भ केसरी पैलवान रामदासभाऊ तडस, मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीजचे सहसंस्थापक विजय तावरे, उपाध्यक्ष गुरुदत्त शेणॉय, विभागीय अध्यक्ष रणजीत आमराज, अंकुर सिड्सचे शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश शुक्ला, 'भारत4इंडिया'चे सहकारी, पत्रकार विनोद राऊत, संपादक मंदार फणसे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Top Breed Eve

 

विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्याला ज्वारीच तारेल...
विदर्भात आज ज्वारीचं पिकचं कुणी घेत नाही. आपले बापजादे ज्वारीचं पीक घेत होते. त्यातून जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत होता. जनावरांमुळं शेणखत मिळत होतं. शिवाय दुधदुभत्यामुळं शेतकऱ्याच्या हाती पैसाही खेळत होता. ज्वारीचं पीकच आता बंद झाल्यानं पशुधनावर आणि शेती उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम झालाय. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर कोरडवाहूच्या शेतीचा विकास करुन ज्वारी पिकासाठी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्यासाठी सरकारनं ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला थेट अनुदान दिलं पाहिजे, याचा पुनरुच्चारही जावंधिया यांनी केला. ज्वारीपासून तयार होणाऱ्या दारूला प्रति लिटर १० रुपये याप्रमाणं सरकार अनुदान देतं. परंतु पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये ज्वारीसाठी अनुदान नाही, याकडं लक्ष वेधून कृषीमंत्री शरद पवार यांच्यामुळंच हे अनुदान दिलं गेलं नाही, असा आरोप जावंधिया यांनी केला. मुक्त अर्थव्यवस्थेतील शेतीच्या अर्थकारणाचा आढावा घेऊन, त्यांनी शेतमालाच्या अस्थिर बाजारपेठेचा विचार करता शेती करणं हे दिवसेंदिवस अवघड बनत चालल्याचं सांगितलं. शेतकरी आणि शेतमाल याकडं इंडियातील प्रगत लोकं चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतात, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं. सध्या विकासाचा डंका पिटला जातोय. इंडियाचा सुपर इंडिया होतोय, आणि भारताची वाटचाल इथोपियाच्या दिशेनं चाललीय. स्वतंत्र भारतातही शेतीची लूट सुरू आहे, असंही जावंधिया म्हणाले.

 Javandhiyaशेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान द्या

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व अनर्थ एका अविद्येनं होतो, असं सांगितलं. आता गावात विद्या आली पण विद्या आलेलं पोरग गावात राहतंच नाही. मग भारताचा विकास कसा होणार, असा कळीचा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही शेतकऱ्याला प्रचंड सबसिडी दिली जाते. मग आमच्या देशातील शेतकऱ्याला ती का दिली जात नाही? शेतमाल पिकवण्यासाठी जे श्रम करावे लागतात त्याचाही मोबदला सध्या मिळत नाही. शेतमालाला योग्य तो भाव मिळवून देता येत नाही तर मग अनुदान का देत नाही, असा रोकडा सवालही त्यांनी केला.

 

शेतकऱ्यांनो पुन्हा लढा द्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं, की माणसाला माणसासारखं जगण्यासाठी राजकारण. पण आज दुर्दैव्यानं माणसाला माणसारखं जगण्याचा अधिकार नाही. विकासाच्या गप्पा मारुन देशाचा गाडा हाकताना सत्ताधाऱ्यांचं शेती आणि शेतकऱ्यांकडं झालेलं अक्षम्य दुर्लक्षच याला जबाबदार आहे. महात्मा गांधी यांनी या देशात यंत्राचा वापर मर्यादित असला पाहिजे, असं सांगितलं होत. पण, प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. सध्या दुचाकी, ट्रॅक्टर आदी वाहनं घेण्यासाठी पटकन कर्ज मिळतं. परंतु शेतीसाठी तेवढ्या झटपट कर्ज मिळत नाही. आता वाहनं खपवून सरकार अप्रत्यक्षपणे परदेशी कंपन्याच चालवत असते. त्यांचा खजिना भरतो आणि मगं डॉलरचा भाव वाढत जातो. हे अर्थकारणाचं दुष्टचक्र भेदण्यासाठी किमान शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळायलाच हवा, त्यासाठी संघटित होऊन शेतकऱ्यांनी पुन्हा लढा उभारला पाहिजे, असंही जावंधिया म्हणाले.

 

नवीन तंत्रज्ञान बांधावर घेऊन जा
'अंकुर सिड्स'चे शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनीही सध्याच्या समाजाला जनावरांचं महत्त्व नव्यानं सांगण्याची गरज व्यक्त करुन त्यासाठी 'टॉप ब्रीड' सारखा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगितलं. भारतातील सुमारे 70 टक्के शेती ही कोरडवाहू असून 30 टक्के शेती ओलीताखाली किंवा बागायती आहे. सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या लहरी पावसावरचं शेतकरी शेती करतो. सध्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येतंय. माहितीही भरपूर आहे. परंतु हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी असे उपक्रम होणं गरजेच असल्याचंही डॉ. शुक्ला म्हणाले.

 

कपाशीच्या पेरणीत बदल करा
विदर्भातील शेतकऱ्यांनी आता कपाशीच्या पेरणी पद्धतीत  बदल करावा. दोन रोपातील अंतर कमी करुन जवळ-जवळ पेरणी करावी. एकरी 6 हजार झाडांऐवजी ही संख्या 15 ते 20 हजारांपर्यंत कशी नेता येईल, याचा विचार करावा. उपलब्ध शेणखत किंवा काडीकचरा कुजवून तो जमिनीत गाडावा. रासायनिक खतं वरून फेकण्यापेक्षा ते पिकाच्या मुळाशी पेरल्यास त्याची कार्य़क्षमता वाढते. विदर्भातील शेतकऱ्यांनी ज्वारी करणं सोडलं कारण खर्च परवडत नाही. परंतु त्यामुळं आता कडब्याचा प्रश्न भेडसावू लागलाय. आता एकट्यादुकट्या शेतकऱ्यानं ज्वारी लावून उपयोग नाही. पक्ष्यी ठेवणार नाहीत. 50 शेतकऱ्यांनी गट करुन ज्वारीची शेती करावी, असा सल्लाही डॉ. शुक्ला यांनी दिला.

मैत्रेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे विजय तावरे यांनी भाषणात ग्रुपतर्फे सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पशुधन वाढण्यासाठी 'टॉप ब्रीड' उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्यामुळंच या कार्यक्रमाला आम्ही सहकार्य केलंय, असंही त्यांनी आवर्जुन सांगितलं.

 

Top Breed Eve 1'अंकुर आशेचा' पुरस्काराचं वितरण
यावेळी शेतकरी पतीनं आत्महत्या केल्यानंतर खचून न जाता ज्या महिलांनी जिद्दीनं शेती करून संसार चालवलाय अशा सुनीता त्र्यंबक कोल्हे, गीताबाई अशोक खरकटे आणि लताबाई रमेश पाटील या महिलांना 'अंकुर आशेचा' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय यशस्वी शेती करणाऱ्या अन्य दहा महिलांना आपुलकी संस्थेतर्फे सौर दिवे देण्यात आले.

 

 

 

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.