विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात

ब्युरो रिपोर्ट, देवळी (जि. वर्धा)
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पशुधनाकडं दुर्लक्ष होतंय. सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात 'क्रॉस ब्रिडींग'मुळं विदर्भातील गौळाऊ गाई-बैलांच्या मूळ जाती नामशेष होत चालल्यात. विदर्भातील शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर आता दुर्मिळ झालेलं हे गौळाऊ पशुधन शोधून त्यांचा वंश वाढण्यासाठी सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेली ही 'टॉप ब्रीड' स्पर्धा ही त्याची नांदी ठरेल, अशा शब्दात विविध  क्षेत्रातील मान्यवरांनी 'टॉप-ब्रीड' स्पर्धेचं कौतुक केलं.
 

 

'भारत4इंडिया.कॉम'नं 'मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीज'च्या सहकार्यानं देवळीत (जि. वर्धा) 25 आणि 26 जानेवारीला 'टॉप ब्रीड' या गौळाऊ जातीच्या गाई-बैलांच्या स्पर्धाचं आयोजन केलं होत. आपल्या दावणीची लाडकी जनावरं घेऊन विदर्भातील शेकडो कास्तकरी स्पर्धेत सहभागी झाले होते.


मान्यवरांची उपस्थिती...

IMG 6748

 मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा सत्पाळकर, पूर्ती उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक सुधाकर दिवे, देवळीचे माजी आमदार, विदर्भ केसरी पैलवान रामदासभाऊ तडस, या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर आयुर्वेद तज्ज्ञ स्वामी वाल्मिकी, मैत्रेम रुरल ग्रोथ व्हेंचरचे उपाध्यक्ष गुरुदत्त शेणॉय, विभागीय अध्यक्ष रणजीत आमराज, मैत्रेय प्रकाशनच्या संपादक जयश्री देसाई, बांधकाम व्यावसायिक प्रमोद राऊत, 'भारत4इंडिया'चे संपादक मंदार फणसे व्यासपीठावर उपस्थित होते. 

 

गौळाऊला पर्याय नाही

पूर्ती उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक सुधाकर दिवे यांनी भाषणात 'टॉप ब्रीड' स्पर्धेचं कौतुक केलं. विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास हेच पूर्ती उद्योग समूहाचं वैशिष्ट आहे. आम्ही इथल्या ५० शेतकऱ्यांना बरोबर घेऊन इस्त्रायलचा दौरा केला. तिथलं पशुधन पाहिलं. ते सर्व लांबून चांगलं वाटतं. परंतु विदर्भात उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सियसच्या पुढं तापमान जातं तर हिवाळ्यात ७ ते ९ अंशापर्यंत ते खाली घसरलेलं असतं. बाहेरचं कुठलंही पशुधन एवढ्या विषम तापमानाला नैसर्गिकरित्या तोंड देऊन टिकून राहत नाही. त्यामुळं इथलं मूळ गौळाऊ हे गाई-बैलांचं वाण टिकवणं आणि त्याचा विकास करणं, हेच इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचं माध्यम राहणार आहे. त्यादृष्टीनं 'भारत४इंडिया'चा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. गाईंच्या पैदाशीसह सांड निर्माण करण्याचा प्रकल्प विदर्भात राबवण्याचा प्रयत्न केल्यास पूर्ती उद्योग समूह त्याला पूर्णपणे सहकार्य करील, असंही दिवे यांनी सांगितलं.

 

'मैत्रेय'चा सामाजिक बांधिलकीचा वसाIMG 6788

मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा सत्पाळकर यांनी मैत्रेय उद्योग समूहाच्या कार्याचा आढावा घेऊन या स्पर्धा आयोजनात सहभाग घेण्यामागची भूमिका मांडली. सामाजिक बांधिलकी हाच मैत्रेय उद्योग समूहाचा पाया आहे. 'टॉप ब्रीड' स्पर्धेमुळं मूळ गवळाऊ जातीची गाई-बैलांबाबत जागरुकता निर्माण होऊन भविष्यात त्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. पशुधन संवर्धनाच्या क्षेत्रात होणारं हे उल्लेखनीय काम लक्षात घेऊनच आम्ही या कार्य़क्रमात सहभागी झालोय, असंही त्यांनी आवर्जुन सांगितलं. जयश्री देसाई यांनी भाषणात मैत्रेय ग्रुपतर्फे केल्या जाणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली.

 

 

आमदार बच्चू कडू, अशोक शिदेंची भेट

दोन दिवसांच्या स्पर्धेदरम्यान अचलपूरचे आमदार बच्चू कडू, हिंगणघाटचे शिवसेनेचे आमदार अशोक शिंदे यांनी कार्य़क्रमस्थळी भेट देऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या कास्तकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पशुवंश शास्त्रज्ञ डॉ. अरुण सिरोथीया यांचंही व्याख्यान झालं. त्यांनी गौळाऊ जातीच्या गाई-बैलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संवर्धनासाठी शुद्ध संकराची कास धरा, असा सल्ला कासतकऱ्यांना दिला.

   

IMG 6632

 

विजयी घोषीत झालेल्या जनावरांना अनुक्रमे 5,555, 3,333, 2,222 आणि 1,111 रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

Untitled-1स्पर्धेचा निकाल

 

गौळाऊ बैल- गट 1 (अदात ते दोन दात)

प्रथम क्रमांक - राजू उंबरकार (विसापूर, देवळी)
दुसरा क्रमांक – सागर काळे
तिसरा क्रमांक – गजानान तळमळे (देवळी, वर्धा)

 

गौळाऊ बैल – गट 2 (चार दात ते सहा दात)
प्रथम क्रमांत - हरिभाऊ जुगनाके (डिगडोह - देवळी)
दुसरा क्रमांक – किसनाजी झाडे - (देवळी)
तिसरा क्रमांक – प्रकाश धेशमुख, (देवळी)

 

इतर बैलांचा गट
पहिला क्रमांक – विजय मानकर (तळागाव दशासर, अमरावती)
दुसरा क्रमांक – सचिन तायवडे (देवळी)
तिसरा क्रमांक – महेंद्र धोपटे - (सोनेगाव बाई, देवळी)

 

गौळाऊ गाय
प्रथम क्रमांक (क्वीन ऑफ काऊ) – रमेश काळे (दानापूर, देवळी)
दुसरा क्रमांक – अंकुश निखाडे (विसापूर, देवळी)
तिसरा क्रमांक – महादेव कांबळे

 

इतर गायींचा गट -
प्रथम क्रमांक – लक्ष्मणराव फटींग (देवळी)
दुसरा क्रमांक – राजु मानकर (विसापूर, देवळी)
तिसरा क्रमांक – अशोक डाखोरे (देवळी)

  

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.