देवळीत कामधेनुच्या लेकरांची अभिनव स्पर्धा!

ब्युरो रिपोर्ट, देवळी
प्रत्येक मातीची आपली म्हणून काही वैशिष्ट्यं असतात. त्यात मराठी मातीचा गंध न्याराच... इथं अभंगही आहे आणि लावणीही. इथल्या मातीत अक्षरक्ष: सोनं पिकतं. ते पिकवण्यात बळीराजाला हातभार लागतो तो ढवळ्यापवळ्याचा. त्यामुळंच कामधेनुची लेकरं ही मराठी मातीची शान. हे नक्षत्रांचं देणं सध्याच्या पिढीला समजावं, त्यांचं संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'भारत4इंडिया'नं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं शिवधनुष्य हाती घेतलंय. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात या स्पर्धा घेण्यात येतात. येत्या 25 आणि 26 जानेवारीला वर्धा जिल्ह्यातल्या देवळी इथं या स्पर्धा होतायत.

   

Top Breed 03

 

स्पर्धा कशासाठी?

भारत हा कृषिप्रधान देश असून त्यात आपला महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळं अन्नदाता असणारी कृषिसंस्कृती आपल्या मातीत भरून पावलीय. इथले सगळे सणवार हे शेतीशी साधर्म्य सांगणारे. इथं दिवाळीही होते आणि बैलपोळाही तेवढ्याच धूमधडाक्यात साजरा होतो. इथलं अवघं जगणं असं कृषिसंस्कृतीला व्यापून राहिलंय. एक काळ होता. घरात पैलवान अन् दारात जातिवंत बैलजोडी असली की ती शेतकऱ्याची शान समजली जायची. आपल्या राज्यात विविध भौगोलिक परिस्थितीत, हवामानात टिकलेल्या, रुळलेल्या जातिवंत जनावरांच्या या प्रजाती म्हणजे आपला दुर्मिळ ठेवा आहे. थोडक्यात काय, तर गुरंढोरं हे आपलं धन. हल्लीच्या संकरीत जमान्यात आपण हा पशुधनचा ठेवा जपायला हवा, वाढवायला हवा. या उदात्त हेतूनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 25आणि 26 जानेवारी असे दोन दिवस या स्पर्धा होणार असून त्यासाठी शेतकरी प्रामुख्यानं गवळाऊ जातीचे आपले जातिवंत बैल घेऊन उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमागचा सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपणारा 'मैत्रेय ग्रुप' हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

 

विदर्भात स्पर्धा घेण्यामागचा उद्देश
महाराष्ट्रात जनावरांच्या अनेक जाती बघायला मिळातात. या जाती हेच महाराष्ट्राचं खरं वैभव आणि वैशिष्ट्य आहे, शेतकऱ्यांचा अभिमान आहे. शेतकऱ्यांचा हाच अभिमान वाढवण्याचा, तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न भारत4इंडिया करतंय. विदर्भात गवळाऊ नावाचं एक अत्यंत दुर्मिळ जात सापडते. तिथल्या नंदा गवळी समाजातील शेतकरी त्यांचं पालणपोषण करतात. म्हणुन त्या जातीला गवळाऊ असं नाव पडलं असं म्हणतात. गवळाऊ जात ही दिवसेंदिवस कमी होत चाललीये. ती पुर्णत: नष्ट होऊ नये, शेतकऱ्यांनी या जातीला जपावं ती जगासमोर यावी, यासाठी ही स्पर्धा या वेळी वर्धा जिल्ह्यातल्या देवळी इथं घेण्यात येणार आहे.

 

मान्यवरांचं मार्गदर्शन 

'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या निमित्तानं 'कास्तकार मेळावा' देखील आयोजित करण्यात आलाय. त्यामुळं स्पर्धेच्याठिकाणी जणू शेतकऱ्यांचा महामेळावच भरणार आहे. शेतीविषयक आधुनिक माहिती लोकांना व्हावी, या उद्देशानं मेळाव्यात विविध मान्यवरांची व्याख्यानं ठेवण्यात आलीत. स्लाईड-शोदेखील दाखवण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया हे 'विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय' या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करतील. तरनागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पशुवंश शास्त्र आणि प्रजनन विभागाचे प्रमुख डॉ. अरुण सिरोथिया हे 'गवळाऊ गाईची काळजी आणि संगोपन' या विषयावर शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत.

 

काय आहे टॉप ब्रीड?
'टॉप ब्रीड' स्पर्धा म्हणजे काही शंकरपट अथवा बैलगाड्यांची शर्यत नव्हे. तर बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी जसे बैलांना सजवून-धजवून गावातून मिरवतात, त्याचप्रमाणे या स्पर्धेत राज्यभरातून आलेले बैल मांडवात मिरवत येतील. पशुतज्ज्ञ आणि परीक्षक या बैलांची योग्य पारख करतील. त्यांच्या खुरापासून ते दातापर्यंत आणि वशिंडापासून शेपटीच्या लांबीपर्यंत सर्व गोष्टींची पारख करून त्यातूनच 'टॉप ब्रीड' निवडलं जाणार आहे. सोनार जसा सोन्याचा कस लावतो, अगदी तसाच कस लावून जातिवंत बेणं कोणतं ते ठरवलं जाईल. यातील सुदृढ, सुलक्षणी बैलांना पारितोषिकं दिली जातील. त्यांच्या मालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे सव्वालाखांची रोख बक्षिसं दिली जातील. या बक्षिसांतील तपशील पुढीलप्रमाणे-

 

टॉप ब्रीड 

गवळाऊ बैल - रु. 11 हजार 111, ढाल आणि प्रशस्तिपत्र

पहिला क्रमांक – रु 5 हजार 555, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

दुसरा क्रमांक - रु. 3 हजार 333, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

तिसरा क्रमांक – रु. 2 हजार 222, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

उत्तेजनार्थ – रु 1 हजार 111


गवळाऊ गाय
क्वीन ऑफ काऊ - रु. 11 हजार 111, ढाल आणि प्रशस्तिपत्र

पहिला क्रमांक – रु 5 हजार 555, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

दुसरा क्रमांक - रु. 3 हजार 333, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

तिसरा क्रमांक – रु. 2 हजार 222, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र

उत्तेजनार्थ – रु 1 हजार 111

या माध्यमातून आपल्याकडच्या सुदृढ जित्राबांचा शेतकऱ्यांना अभिमान वाटेल. महाराष्ट्रातील जातिवंत जनावरांची जपणूक होईल, त्याचप्रमाणं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.

आपल्या तुकोबांनी सांगितल्याप्रमाणं 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' याप्रमाणं हे 'टॉप ब्रीड' पुढं चौखूर उधळावं आणि मराठी माती समृद्ध व्हावी, यासाठीच हा घाट घातलाय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.