आंगणेवाडीची जत्रा...

मला भावलेली आंगणेवाडी

ऋषी देसाई, मालवण, सिंधुदुर्ग
निसर्गसमृद्ध कोकणातील विविध मंदिरं आणि त्याभोवतीचा परिसर विलोभनीय आहे. यातली अनेक मंदिरं वा देवस्थानं जागृत देवस्थानं म्हणूनही ओळखली जातात. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं मंदिर आणि तिथली जत्रा यासाठीच प्रसिद्ध आहे. या जत्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेची तारीख. ही तारीख सर्वांच्या संमतीनं ठरवली जाते आणि ती इतरांना कळवणं हा एक आगळा अनुभव आहे. दरवर्षी फेब्रुवारीत भरणाऱ्या या जत्रेसाठी लाखो भाविक येतात. यामध्ये राजकारणी, सिनेअभिनेते, देशी-विदेशी पर्यटक यांचाही विशेषत्वानं समावेश आहे.

 

 26880छायाचित्रातूनही न मावणारी माझ्या गावची जत्रा शब्दात कशी मांडायची हा प्रश्नच आहे... तुम्ही म्हणाल एवढं काय मोठं आहे त्यात? आम्हा मालवणवाल्यांसाठी आंगणेवाडी जत्रेची मजा काही औरच आहे... होय, काही गोष्ट शब्दांतही मांडता येत नाहीत अन् लाईव्ह कव्हरेज करूनही तो एक्सीपिरीयन्स नाही घेता येत.. त्यासाठी तुम्हाला तिथं हजर राहावंच लागतं. तुम्हाला वाटेल मी हे काय बोलतोय, पण नाही मला तसं ते पारंपरिक पद्धतीनं लिहिणं नाही जमत.. पण पारंपरिक जमत नसलं तरी श्रद्धेचा आयाम मात्र तसाच आहे, अगदी जसा की जणू वारीचे वारकरी.

 

आज आंगणेवाडीवर हा लेख लिहिताना खूप भरून येतंय. कारण समोर शब्द उभे आहेत, पण नजरेत मात्र एवढ्यातच तो पेट्रोमॅक्सचा प्रकाश अन् लक्ष लक्ष तोरणांनी सजलेली माझी आंगणेवाडी दिसतेय... कानात हेडफोन नसतानाही तोच पुन्हा आवाज घोंघावतोय.. पायाखाली कार्पेट असूनही शेतमळ्यातली माती असल्याचा फिल येतोय. ऑफिसात लिहिताना कोणीच नसतानाही प्रचंड गर्दी असल्यासारखं वाटतंय... आपसूक डोळे मिटले जातायत, हात जोडले जातायत आणि पाणावलेल्या नजरेच्या कडांतून समोर दिसतोय तो जत्रेच्या दिवशीचा रंगीबेरंगी प्रकाशात न्हालेला माझ्या भराडीदेवीचा फुलांनी सजवलेला गाभारा. तो नजारा या क्षणाला जरी आठवला ना तरी पुढचा जन्म माणसाचा नाही दिलास तरी चालेल, पण फुलाचा दे, आणि खुडलेल्या या फुलाला जत्रेच्या दिवशी गाभाऱ्यात स्थान मिळू दे एवढाच मोह होतो. देवीच्या गाभाऱ्यातील फुलाचाही माझ्या मनाला जर हेवा वाटतं असेल तर विचार करा, आईच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना देहाला कशी झपुर्झा अवस्था प्राप्त होत असेल.

 

पारधीची तारीखaanganwadi jatra
खरं तर जत्रा हा शब्द जरी कुणी उच्चारला तरी आम्हा मालवणकरांना फक्त एकच समानार्थी शब्द आठवतो तो म्हणजे आंगणेवाडीची यात्रा. एवढं भारूड आमच्या मनामनावर पडलंय. आंगणेवाडी मालवणपासून15-16 किलोमीटरवर असलेलं हे गाव. भौगोलिकदृष्ट्या आंगणेवाडीकडे जायचे तीन रस्ते असले तरी, यात्रेच्या दिवशी सारेच रस्ते फक्त आंगणेवाडीकडं जाणारे आहेत असाच भास होतो. गेल्या काही वर्षात या जत्रेचा व्याप एवढा वाढत चाललाय की मंदिराजवळ असणारी एसटीची शेड आता हळूहळू मैलावर येऊन पोहोचलीय. जत्रेला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढतच चाललीय, पण या साऱ्या गर्दीचं नियोजन मात्र अगदी व्यवस्थित असतं. गावात दहा माणसं जरी जास्त दिसली की नियोजन कोलमडतं, अशा स्थितीत दरवर्षी लाखालाखाच्या गर्दीला व्यवस्थित दर्शनयोग देणाऱ्या आंगणे ग्रामस्थांबद्दल काय आणि किती बोलावं. या ग्रामस्थांच्या नियोजनाला फक्त सलाम ठोकू शकतो बस्स... आंगणेवाडीच्या यात्रेची सुरुवात होते ती ग्रामस्थांच्या एक होण्यानं, सारे ग्रामस्थ देवळात एक होतात आणि पारधीची तारीख ठरते. पारध होते आणि देवीचा कौल होतो. आणि देवळाच्या गाभाऱ्यातून फक्त एका तारखेचा आवाज येतो. आणि मग काय वाऱ्यालाच वेड लागतं. बेभान झालेला वारा मालवणपासून देवगडपर्यंत आणि मुंबईपासून कर्नाटकापर्यंत सांगत सुटतो... जत्रा ठरली रे, जत्रा ठरली रे...

 

aanganvadiआंगणेवाडीचा स्कायवॉक लय भारी
महाराष्ट्रात आजघडीला असलेल्या जत्रेमध्ये या जत्रेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पाहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथं जागा मिळेल तिथं तिथं... प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख.. जशी तारीख जवळ येते, तसा सुरू होतो तो खरा जल्लोष.. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात येतो. पुण्यामुंबईच्या कुचकामी स्कायवॉकला नाकं मुरडणाऱ्यांना आंगणेवाडीचा मात्र स्कायवॉक लय भारी वाटतो. स्कायवॉकच्या इंजिनीअरना असे पूल लोकांच्या सोयीसाठी बांधायचे असतात याच्या जाणीवेसाठी एकदा तरी या लाकडी पुलावरून पाय मोकळे करून पुण्य मिळवावं. असो.. केवळ ग्रामस्थांचीच नाही तर, प्रशासनाची, एसटी महामंडळाची, सार्वजनिक बांधकाम खात्याची साऱ्यांचीच प्रचंड घाईगर्दी सुरू असते. कामाला तास कमी पडत असतात. नियोजन आणि मनुष्यसाठा जबरदस्त असतो. पण जत्रेत कसलीच कमतरता राहू नये यासाठी अधिकाऱ्याच्या मनातला आईचा भक्त सारखा धडपडत असतो. कधी विचार केलाय की जत्रेसाठी तीन दिवस राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना, पीडब्लूडी कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि यासारखे अनेक जण जे ड्युटीवर असतात त्यांना वाटत नसेल का, आपणही सुट्टी टाकून फॅमिलीसह जावं जत्रेला... पण नाही, इथंही जिंकतो त्या प्रत्येकाच्या मनातला भक्त. कारण जत्रेला येणाऱ्या भक्ताची सेवा करणं हीच खरी आई भराडीची सेवा.

 

जत्रेची सुरुवात होते ती रात्रीच, ओट्या भरायला रात्री सुरुवात झाल्यानंतर जत्रेचा अॅटमॉस्पिअर सर चढके बोलने लगता है.. आणि डोळ्यांचे पारणं फेडणारा खरा प्रसंग असतो तो आदिनारायण आणि आदिशक्तीच्या दर्शनाचा. सकाळची पहिली किरणं ही आईवर आरश्यानं परावर्तित करतात आणि मुळातच तेजोमय अशा आईच्या मुखवट्याचं तेज विलक्षण तेजाळतं, तर इकडं गावगावात सकाळपासूनच प्रत्येकाची लगबग सुरू झालेली असते.

 

तुम्ही श्रद्धाळू असा की सो कॉल्ड अंधश्रद्धाळू.. नो प्रॉब्लेम.. या गर्दीचं मानसशास्त्र नक्की तुम्हाला वेड लावेल एवढी माणसं एका विचारानं जमतात आणि त्या विचाराच्या पुढे साऱ्या असुविधा थिट्या पडतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, पण त्या दिवशी सहा सहा तास रांगेत राहून दर्शन घेऊन येणारा गाभाऱ्याबाहेरचा तो भक्त श्रीमंत झालेला असतो. तुम्ही कदाचित असाल फेमस तुमच्या एरियात, पण त्या दिवशी देवळासमोर पोलिसांच्या माईकवरून आपल्या नावाची अनाऊन्समेट होणं म्हणजे होल जत्रेत वर्ल्डफेमस असल्याचा आनंद मिळवणं. हा आनंद काही वेगळाच असतो. खोटं कशाला मी टीव्हीवर असतानाही मीही घेतोच की...एवढंच काय तुम्ही मोबाईलच्या गेममध्ये असाल मास्टर, पण जत्रेतल्या पाळण्यात बसल्यावर उडणाऱ्या भंबेरीची गंमत कुठंच नाही राव... आता ती प्रथा बंद झाली, पण शीत गोळा करण्याच्या आठवणी विचारा कुणाला तरी आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जॉबवाले असा की, बिझनेसवाले, जत्रेच्या दिवशी आमच्यासारखे पोरगे घरातल्या प्रत्येकाला सेप्रेट गाठून पन्नास रुपयाचं पॉस मागतात आणि त्या पैशाचा हिशेब लावताना मिळणारा आनंद फक्त आणि फक्त आईच्या जत्रेदिवशीच.


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.