EasyBlog

This is some blog description about this site

ठोकपाल

अश्रूंची होतील का फुले? (भाग-1)

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1104
  • 0 Comment

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पंचवीस लाखांच्या जनसमुदायानं अखेरची सलामी दिली, तेव्हा कट्टर शिवसेनाविरोधकही भारावून गेले. मी स्वत: बराच वेळ चालत बाळासाहेबांची अंत्ययात्रा पाहण्यास गेलो, कित्येक शिवसैनिकांशी बोललो आणि राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्यांचे चेहरे वाचले, सेनापती गेल्यानंतर सैनिकांची जी अवस्था होते, तशीच त्यांची स्थिती झाली होती...

शिवसेनेचा पासष्टी ओलांडून गेलेला एक जुना सैनिक म्हणाला, “आम्ही होतो कोण?” कुणीच नाही! साहेबांनी आम्हाला घडवलं, त्यांच्या हाकेला ‘ओ’ देत आम्ही रस्त्यावर लढलो. त्यामुळं आयुष्याचं सार्थक झालं. नाहीतर आम्हाला कुणी विचारलं असतं ? आमची ओळख ती काय होती!

विजय जयराम परब नावाचा दुसरा ज्येष्ठ सैनिक म्हणाला, “माझी ही बॉडी बघा. सामान्य प्रकृतीचा मी, पण अजूनही शिवसेनेसाठी लढण्याची तयारी आहे. परवा लोकलमध्ये चौथ्या सीटवरून भांडण झालं, तेव्हा मी त्या परप्रांतीयाला आवाज दिला – ‘ज्यादा शानपट्टी केलीस, दादागिरी केलीस, तर मी लढेनच, पण एका सेकंदात शंभर मावळे गोळा करीन. या महाराष्ट्रात तुमची मस्ती चालू देणार नाही.`` त्यांनी आपल्याबरोबर ‘मार्मिक’मध्ये प्रसिध्द झालेली एक कवितादेखील मला दिली. (ती पुढे देत आहोत) 'वाली ! मवाली' ही कविता सेनेच्या सळसळणाऱ्या रक्ताची कहाणी सांगतानाच नेभळटांचा धिक्कारही करते.

साहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना अनेक धिप्पाडदेही शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपनेते, गटनेते ढसढसा रडत होते. विनायक राऊतांच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा बांध थांबता थांबत नव्हता. राज ठाकरेंच्या मुद्रेवरचे एरवीचे उर्मट भाव लुप्त होऊन, त्यांचा चेहरा दु:खार्त झाला होता. रश्मी व शर्मिलाताईंना अश्रू दडवणं जेमतेम जमलं होतं आणि उध्दव तर पूर्णत: खचून गेले होते.

 उध्दव आणि आदित्य हे दोघे एकमेंकांना कसाबसा आधार देत होते. दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कवर अस्थी गोळा करून घेऊन जाण्यासाठी उध्दव गेले असताना, पुन्हा एकदा त्यांना शोक अनावर झाला. ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींनी सांगितले की, उध्दव अक्षरश: शोकसागरात बुडाले आहेत.

मात्र उध्दवजींनीच बाळासाहेब मृत्यूशी झुंज देत असताना, सैनिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले होते. 'अंत्ययात्रेच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार नको' असे आदेश दिले होते. त्याचे पालन शिवसैनिकांनी तंतोतंतपणे केले.

परंतु त्याच वेळी 'सेनेच्या मुखपत्राच्या कार्यकारी संपादकांचं वागणं-बोलणं म्हणजे परिस्थितीची जाणीव नसल्यासारखं भासत होतं' अशी टीकाही झाली. “ साहेबांची प्रकृती सुधारत आहे, ते लवकरच तुमच्या समोर येतील,” अशी आशा लावण्याचं कामही या `कार्यकारी`ने केलं. वास्तविक बाळासाहेब मरणाच्या दारात पोहोचले असताना खोटी आशा लावण्याचं कारण नव्हतं. शिवाय हे गृहस्थ आपण कोणीतरी बडे नेते आहोत, अशा थाटात बोलत होते. तसंच बाळासाहेबांबद्दल नाटकीपणानं बोलणाऱ्या सेनेच्या काही छोट्या-मोठ्या नेत्यांनी, गेली काही वर्षं पक्षकार्य करताना मात्र हात आखडता घेतला होता. मनोहर जोशी आपल्या लाचारीबद्दल सुप्रसिध्द आहेत. कोणी कितीही पाणउतारा केला, तरीही न चिडणारे हे गृहस्थ सेनेतले नव्हे, तर काँग्रेसमधलेच वाटतात! बाळासाहेबांनी आपल्याला सर्व मानाची पदं दिली याबद्दलची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. पण त्या प्रमाणात आपण पक्षसंघटनेला काय दिलं, याचा विचार त्यांनी मनातल्या मनात तरी केला का? त्यामुळे साहेबांनी त्यांची तसंच प्रमोद नवलकरांची जाहीरपणे व सार्थपणे भरपूर टिंगल केली आहे. बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं, अशी प्रथम मागणी करणाऱ्या पंतांना, लगेच 'हे' स्मारक तुमच्या कोहिनूर मिलमध्ये करा की, असं उत्तर मिळालं! जोशींच्या या वक्तव्यामुळे उध्दव रास्तपणे संतापले आणि त्यांनी स्मारकाचा वाद थांबविण्याचं आवाहन केलं. 

खरं तर नसते वाद उकरून काढणाऱ्या मनोहर जोशींना, त्यांनी पक्षाची सेवा जितकी केली, त्यापेक्षा पक्षानेत्यांची सेवा जास्त केली आहे. त्यामुळे आता घरी बसून 'डायरी' लिहा, नातवंडांना खेळवा अथवा कोहिनूर सेनेचं काम करा, पण सेनेच्या कामात ढवळाढवळ करू नका, अशी कळकळीची विनंती करण्याची वेळ आली आहे.


  • hemant desai kavita.jpg

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.