EasyBlog

This is some blog description about this site

विकास प्रवाह

विकासप्रवाह आदिवासींपर्यंत (भाग- 2)

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1813
  • 1 Comment

4 ऑगस्ट 1987चा दिवस. नेहमीप्रमाणं सकाळी दहा वाजताची वेळ. मी कार्यालयात नक्षलवाद्यांच्या हालचाली व आदिवासी समस्यांचा अहवाल तयार करत असतानाच एटापल्लीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा फोन आला... कसनपूर भागातील महत्त्वाच्या रस्त्यांचं काम अडलं असल्यामुळं डीएफओबरोबर संयुक्त पाहणीसाठी मी यावं. नुकताच मी या भागात जाऊन आलो होतो आणि नक्षल हालचालींचा अहवाल पाठविणं महत्त्वाचं असल्यामुळं प्रथम मी नाही म्हटलं.

अतिक्रमण केलेल्या वन जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आदिवासींना द्यावा, ही आग्रही मागणी आदिवासी व कार्यकर्ते सारखी करत होते. या आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी नक्षलवाद्यांकडून ही मागणी होणं स्वाभाविक होतं. तलाठ्याकडील माहितीच्या आधारे आदिवासींना अतिक्रमण जमिनीचे पट्टे स्वतःच वितरित करण्याचा विचार नक्षलवादी करत असल्याचंसुद्धा कळलं. शिवाय नक्षलवादी समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप होत असल्यानं मिळालेल्या माहितीची योग्य दखल घेणं आवश्यक होतं. त्या दृष्टीनं अहवाल तयार करून टायपिंगला दिला. तितक्यात भामरागड विभागाच्या डीएफओंचा फोन आला, जमिनीबाबतचा महसूल व वन विभागाकडील रेकॉर्ड तपासून प्रश्न मार्गी लावण्यासाठी संयुक्त भेट आवश्यक असल्यानं दुपारी एक वाजता एटापल्लीकडे निघायचं आहे. 

एटापल्ली तालुक्यातील कानसूरजवळील चोखेवाडा हे एक छोटसं आदिवासी गाव. जेमतेम 40 कुटुंबांची वस्ती. सभोवती जंगलाचा परिसर. मी स्वतः डीएफओ, कार्यकारी अभियंता व चार-पाच इंजिनीयर एवढे लोक सायंकाळी पाचच्या दरम्यान चोखेवाडाला पोहोचलो. एसडीओ येणार याची अजिबात कल्पना नसतानासुद्धा तलाठी हजर असणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. नंतर समजलं की, तलाठी कुटुंबासह गावातच राहतो. चावडीसमोरील रस्त्यालगतच्या जागेत टाकलेल्या खाटांवर आम्ही बसलो. एवढ्यात एक जंगल ठेकेदार वनाधिकाऱ्यांशी बोलला. गावात दोन-तीन चकरा केल्यावर ठेकेदाराची जीप निघून गेली. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. आम्ही तलाठ्याकडील गाव, नकाशा, अधिकार अभिलेखातील नोंदी तपासून पाहात होतो. त्यावेळी तलाठ्याला अस्वस्थ अवस्थेत पाहून त्याला त्याचं कारण विचारलं. त्यानं भीतभीतच दुपारी दोन वाजल्यापासून नक्षलवाद्यांची टोळी गावात आहे, असं सांगितलं. आधी सांगितलं का नाही म्हणून मी त्याच्यावर रागावलो. पण आता उपाय नव्हता. दहा बंदूकधारी नक्षलवादी गावातील शेवटच्या घरी बसले होते. जंगल ठेकेदाराच्या येरझारा व निघून जाणं आता लक्षात आलं. बंदूकधारी नक्षलवादी आणि अधिकारी एकाच गावात होते, त्यामुळं अप्रिय घटना घडण्यास वाव होता आणि आम्हाला नेमकं तेच नको होतं. 

वन अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याशी सल्लामसलत करून सर्वांना जीपमध्ये बसायला सांगितलं. आता निघणार तेवढ्यात दोन बंदूकधारी नक्षलवादी जीपकडं धावत येताना दिसले. नक्षलवादी सशस्त्र व आम्ही निशस्त्र असल्यामुळं मनात भीती व चिंता वाटणं साहजिक होतं. काही अप्रिय घडलं असतं तर बदनामी आमचीच होणार होती. शिवाय सरकारला जाब द्यावा लागणार होता. आम्हा अधिकाऱ्यांना धैर्यानं सामोरं जाण्याचे प्रसंग अनेक, परंतु हा प्रसंग वेगळाच. आज आमची कसोटीच लागणार होती. चांगल्या अधिकाऱ्यांना नक्षलवादी त्रास देत नाहीत, असं ऎकलं होतं. परिस्थितीचा सामना करण्याचा निश्चय झाला. एवढ्यात दोन बंदूकधारी नक्षलवादी जीपजवळ आले. त्यातील एक जण हिंदीत म्हणाला, ``हमारा बॉस आप लोगोसे बात करना चाहता है.`` मी म्हटलं, ``अभी टाईम नही. जल्दीसे कही और जाना है.`` तितक्यात दुसरा म्हणाला, ``फिर कब बात करेंगे, अभी आ ही गये हो, तो बात कर ही लो, अच्छा रहेगा.`` भेट घेतलेलीच बरी असं ठरवून, आपके बॉस को यहीपर भेज दो असं म्हटलं. बोलके देखता हूँ, असं सागून ते निघून गेले.                 

बॉस म्हणजे टोळी प्रमुख, दलम लीडर. टोळीप्रमुख आमच्याकडं आला नाही तर आम्हाला त्याच्याकडं जावं लागणार होतं. सगळ्यांच्या नजरा नक्षलवादी बसले होते त्या घराकडं होत्या. काही वेळानं एक तरुण युवक, अंदाजे 32 वर्षं वयाचा, युनिफॉर्ममध्ये दुर्बिण-बंदुकीसह आमच्याकडं येताना दिसला. मला त्याच्याकडं जावं लागणार नव्हतं म्हणून बरं वाटलं. 

"आय एम रामन्ना, दलम लीडर," अशी आपली ओळख करून देत रामन्नानं कार्यकारी अभियंता, डीएफओ आणि शेवटी माझ्याशी हस्तांदोलन केलं. यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या काही प्रमुख नक्षलवाद्यांशी माझी चर्चा झाली असल्यामुळं त्यांच्या मुद्द्यांचा बऱ्यापैकी अंदाज मला होताच. रामन्नानं नक्षल चळवळीचा इतिहास व ध्येयधोरणं सांगायला सुरुवात करून आदिवासींच्या पिळवणुकीला सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे. आदिवासींच्या मुक्तीसाठी सशस्त्र क्रांतीची आवश्यकता आहे, असं सरळ समीकरणच मांडलं. काही स्थानिक प्रश्न व समस्या असल्यास आपण चर्चा करू, असं मी त्याला सुचवलं. तेवढ्यात रामन्नाच्या सहकाऱ्यांनी दोन डायऱ्या आणल्या व चर्चेला सुरुवात झाली. सर्व संभाषण इंग्रजीतून झालं.

माझ्या आणि दलम लीडर रामन्नाशी झालेल्या संभाषणा दरम्यान आदिवासी भागातील बऱ्याच समस्यांवर चर्चा झाली. जवळजवळ तीन तास आमची चर्चा चालली होती. त्यात त्याने विविध समस्या माझ्या निदर्शनात आणून दिल्या. एटापल्ली तालुक्यातील एका गावात 19 कुटुंबांना रेशनकार्ड मिळाली नसल्याबाबत, स्वस्त धान्य दुकानदारांविषयी तक्रार, आदिवासींच्या कब्जातील वनजमिनीचे पट्टे दिले नसल्याची खंत, त्याचबरोबर चराई व निस्तारासाठी त्यांना अडविलं जाऊ नये, एसआरपीएफच्या छावण्या ठेवल्याबद्दल असमाधान, अशा विविध समस्यांचा त्यानं पाढाच वाचला. यावेळी त्याच्या टोळीतील आणखी नऊ सशस्त्र नक्षलवादी तिथं आले. भीतीचं सावट होतंच. पण या झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही त्यांची पिळवणूक न करता मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याबाबत त्यानं समाधान व्यक्त केलं. सरकार आदिवासींच्या हिताच्या बऱ्याच योजना राबवत आहे. आपणही बंदुका टाकून आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करावा, असं मी त्यांना आवाहन केलं. परंतु यातून नक्षलवाद्यांचा फक्त सशस्त्र क्रांतीवरच विश्वास असल्याचं मला जाणवलं. शेवटी उठता उठता मी रामन्नाकडे त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत विचारणा केली.

रामन्ना आपल्याबाबत बोलताना माझ्याजवळ अगदी मोकळेपणं बोलत होता. त्यानं वरंगल विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केलं होतं. या नक्षलवादी चळवळीत बऱ्याच बुद्धिजीवी लोकांचा सहभाग आहे आणि त्यातील काही डॉक्टर, वकील, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आहेत, असं तो म्हणाला. आदिवासींचे प्रश्न घेऊन मोर्चा काढणारे, लोकशाही हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून परिषद भरविणारी मंडळी आमची हितचिंतक आहेत, असं रामन्ना पुढे म्हणाला. यातून आलापल्ली येथील पर्यावरण परिषद ही नक्षलप्रणीत होती असं स्पष्ट झालं. चांगल्या वातावरणात रामन्नाशी झालेल्या चर्चेतून काही माहिती आणि संकेत घेऊन आम्ही एकमेकांना धन्यवाद देऊन एटापल्ली अहेरीसाठी निघालो. तात्त्विक व काही अडचणींच्या मुद्द्यांवर तीन तास झालेली चर्चा कोणताही अनुचित प्रकार न घडता सहिसलामत पार पडली होती. गडचिरोली जिल्ह्यातील पाच वर्षं पाच महिने आणि अहेरी येथील चार वर्षं सात महिन्यांच्या वास्तव्यातला हा पहिला व शेवटचाच प्रसंग ठरला. 

 

 

 

People in this conversation

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

माजी आयएएस ऑफिसर. भारतीय प्रशासकीय सेवेत विविध पदांवर काम. कार्यकाळात प्रशासनात अनेक प्रयोग करून ते यशस्वी केले. धडाडीचे, कार्यक्षम अधिकारी म्हणून लौकिक. निवृत्तीनंतर विविध सामाजिक कार्यात सक्रिय.