EasyBlog
This is some blog description about this site
मार्ग यशाचा
हवंहवंसं वाटणारं यश!
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,
आज प्रथमच ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मराठी व्याकरण आणि मी, हा पक्का छत्तीसचा आकडा असल्यानं शुद्धलेखनाच्या अनेक चुका प्रत्येक वाक्यात नव्हे, शब्दात असणार याची खात्री आहे. पण गोड मानून घ्याल ही खात्री आहे.
गेल्या दहा वर्षांत जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधायचा मला योग आला. त्यातून मिळालेल्या उर्जेतून या ब्लॉगला खाद्य मिळालं आहे. नमनाला घडीभर तेल न घालता विषयाला सरळ हात घालायचा म्हटलं तर विषय तसा सोपा आहे, पण वाटतो तेवढा सोपा देखील नाही. बघूया, मनातलं कितपत इथं ब्लॉगवर आणण्यात यशस्वी ठरतोय ते. वरच्या वाक्यातच आपल्या ब्लॉगचा विषय दडलेला आहे.
होय, यश !
जे सर्वांनाच हवं असतं ते यश. या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हटलंच आहे, `प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.` त्याचप्रमाणं आपणही म्हणूया की, यश म्हणजे यश म्हणजे यश असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!
मला माहिती आहे की, कोणीच याच्याशी सहमत होणार नाही, बरोबर ना?
येस, या वाक्याशी कोणीही सहमत होणार नाही, कारण प्रेम ही भावना जरी सर्वांसाठी भले सारखी असेल, पण यश या शब्दाची व्याख्या मात्र नक्कीच प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते.
यश, या शब्दाचा अर्थ सांगायची गरज नाही, पण यश म्हणजे नक्की काय, हा प्रश्न जर मी विचारला, तर प्रत्येक माणूस त्याच्या कुवतीप्रमाणं उत्तर देतो की यश म्हणजे, मला हे हवं, ते हवं. सुख पाहिजे, समाधान पाहिजे. पण बरेच जण एक अत्यंत साधं आणि सोपं उत्तर देतात, आणि ते म्हणजे, यश म्हणजे भरपूर पैसा!
कोणी म्हणतं परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर ते यश, कोणी म्हणतं एम.बी.ए.ला प्रवेश मिळाला ते यश, अजून कोणी- चांगली नोकरी मिळाली तर ते यश म्हणतं. मग ती नोकरी खाजगी असो वा सरकारी. कोणी म्हणेल जीवनात लग्नानंतर चांगला जोडीदार मिळाला ते यश, कोणी म्हणेल आजारातून बरा झालो ते यश... व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळीच. त्यामुळं यश हे व्यक्तीसापेक्ष असणार हे नक्की आणि प्रत्येकाची यशाची व्याख्याही तेवढीच वेगळी असणार. फार कठीण आहे हो या शब्दाचा खरा अर्थ समजावून घ्यायला.
एवढ्या वर्षांनंतर मलाही अजून यश म्हणजे नक्की काय हे फारसं समजलेलं नाहीये. जेवढा विचार करू, तेवढा एखादा नवीनच अर्थ पटकन समोर येतो आणि जुना अर्थ, व्याख्या बदलली जाते. कारण जसं आठवतंय तसं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अजून काही नवं आणि काही अधिक पाहिजेच होतं हे आठवतंय. म्हणजे एक नक्की की, आजचं यश हे उद्या यश ठरेलच याची काही खात्री नाही. शेवटी मनुष्यस्वभाव. थोडक्यात समाधान मानेल तो माणूस कसला?
बघा, बहुतांशी विद्यार्थी दशेत असताना, एक स्वप्न असतं की चांगली नोकरी मिळावी. ते पूर्ण झालं. सुरुवातीला पगार होता रु. ९००/- ! आज सांगून खरं वाटणार नाही, पण तेव्हा (१९८६) ९०० रुपयांत महिना अगदी मस्त जायचा (आज दिवसाला ९०० रुपये कमी पडतात!). त्यानंतर वाटलं, अजून चांगली नोकरी पाहिजे, प्रमोशन मिळालं पाहिजे, कंपनीनं बाईक दिली पाहिजे, कंपनीनं गाडी दिली पाहिजे, बाकी कंपन्यांच्या मानानं पगार फारच कमी आहे.
लग्न झालं की स्वत:चं घर हवं, मोठं घर हवं, मोठी गाडी हवी, लेटेस्ट टी.व्ही., फ्रीज, मोबाईल, कॉम्प्युटर, ब्रँडेड कपडे, सर्व काही उत्तम ते पाहिजे. सहकुटुंब परदेश प्रवास हवा.
मारुतीच्या शेपटाप्रमाणे न संपणारी यादी आहे मला काय हवंय त्याची. मग यात यश आलं कुठं? कारण समाधान तर मिळत नाहीच. कदाचित सुख आहे, पण समाधानाचं काय?
"भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे?" हा भाव जोपर्यंत आहे, आणि आज जो भाव नव्या नव्या उत्पादनांना आणि स्पर्धेला जन्म देतोय. त्याच्यावर पूर्ण मात करणं कदाचित आपल्या साधुसंतांनाच जमलं असतं. त्यातून आपली तर पूर्ण सुटका होणं कठीणच आहे आणि त्यात खूप काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही. कारण जर स्पर्धा, इर्ष्या नसेल, तर जीवन कसं बेचव होऊन जाईल. `अति तिथं माती` ही म्हण आपण शाळेत शिकलो होतो. ती सातत्यानं लक्षात ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे.
आपण जगातल्या अत्यंत यशस्वी व्यक्तींकडं जर नजर टाकली आणि त्यांच्या आयुष्याचा जर थोडासा अभ्यास केला तर एक सामाईक गोष्ट आपल्या लक्ष्यात येईल आणि ती म्हणजे, ही माणसं न कधी भूतकाळात रमली, ना वर्तमानात गुंतून पडली. त्यांची नजर फक्त भविष्याकडं होती आणि सातत्यानं विचार एकाच गोष्टीचा, पुढे जाऊन काय करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे.
या यशस्वी माणसांकडे बघताना काही गोष्टी अजून आपल्याला विचार करायला लावतात. त्या म्हणजे, आचार, विचार आणि कर्म. सर्व बाबतीत आपल्या मूल्यांशी ठाम राहून, निष्ठेनं आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवून, समाजाशी बांधिलकी जपूनच ही माणसं यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेली आहेत.
त्यांना यश मिळालं, कारण त्यांना यश म्हणजे काय ते कळलं होतं आणि त्यांनी ते आचरणातही आणलं होतं. अगदी सोपी व्याख्या आहे यशाची. `योग्य कारणांसाठी, योग्य वेळी, योग्य मार्गानं केलेली योग्य कामं. स्वत:ला नेमून दिलेलं ध्येय साध्य होईपर्यंत न थकता, न थांबता निष्ठेनं केलेलं काम म्हणजेच यश!`
आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल की, यश हा एक न संपणारा प्रवास आहे, ज्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी आपण काही वेळ थांबणार आहोत, पण काही काळासाठीच... पण पुन्हा पुढे जातच राहणार आहोत, कारण अगदी सोपं आहे, थांबला तो संपला.
(क्रमश:)