EasyBlog
This is some blog description about this site
सिरोंचा ते सीरिया...
पहिली भेट...
बाळासाहेबांचं व्यक्तित्व अफाट होतं. बाळासाहेबांना पहिल्यांदा ज्यांनी बघितलं, पहिली भेट घेतली, ते त्यांना उभ्या आय़ुष्य़ात कधीच विसरु शकले नाहीत. हेच लक्षात घेऊन आम्ही 'बाळासाहेबांची पहिली भेट' या विषयावर सर्व जुन्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, आठवणी जागवायच्या असं ठरवलं. मातोश्रीवर सर्व नेत्यांची, शिवसैनिकांची गर्दी असल्यामुळं मनोरा आमदार निवासात पोहोचलो.
एरवी कार्यकर्ते, नेत्यांनी कायम लाईव्ह असणारं आमदार निवास शांत होतं. बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी काळजी वाटणारे सर्व शिवसैनिक मात्र झाडून आमदार निवासात जमले होते. कुणी बांद्र्याला गेलेलं, कुणी शिवसेना भवन गाठलेलं...
आमदार निवासात पहिल्यांदा भेटला वर्ध्याचा युवा सेना प्रमुख आशीष वैरागडे. त्याच्यासोबत तीन तरुण होते. हे तरुण तसे बाळासाहेबांना कधीच भेटले नव्हते. मात्र श्रध्देपोटी ते मुंबईला आले. मातोश्रीला पोहोचता आलं नाही म्हणून काय झालं, मात्र आम्ही मातोश्रीपासून काही किलोमीटर अंतरावर आहोत, एवढंच समाधान त्यांना होतं. त्यातील एक जण म्हणाला, एकच इच्छा आहे, मातोश्रीच्या गेटला तरी हात लावून यायचं आहे...
या तरुणांची भेट घेतल्यानंतर मी गाठलं ते विदर्भातील सर्वात जुने शिवसैनिक आणि हिंगणघाटचे आमदार अशोक शिंदे यांना. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. युतीचं सरकार आलं त्यावेळी शिंदे पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी एकवीरा देवीकडे सर्व आमदारांना नेण्यात आलं. बाळासाहेब आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी हेलिकॉप्टरनं आले. या सर्व आमदारांना एकवीरा देवीपुढं शपथ द्यायची होती. मात्र अचानक साबीर शेख यांच्या लक्षात आलं, की फेटेवाला आलाच नाही. बाळासाहेबांना फेटा बांधायचा होता. अशोक शिंदे पुढे आले आणि साबीर भाईंना म्हणाले, साहेब मला फेटा बांधता येतो. मी बांधतो. फेटा बांधताना शिंदेंनी बाळासाहेंबाना पहिल्य़ांदा जवळून पाहिलं. बाळासाहेब त्यांना म्हणाले, 'फेटा नीट बांध, माझे केस अत्यंत मोलाचे आहेत. मला फेटा बांधालस, मात्र इतरांना टोप्या घालू नकोस. एवढं बोलून शिंदेना रडू कोसळलं. ते उठून आतल्या रुममध्ये गेले. थोड्या वेळानं बाहेर आले, आणि म्हणाले ''या गाद्या, उशा सर्व बाळासाहेबांमुळं, मी काय फकीर माणूस....''
शिंदेसारखी प्रतिक्रिया सर्वांचीच आहे....गोंदियाचे वयोवृध्द माजी आमदार रमेश कुथे यांच्या रुमवर गेलो...ते म्हणाले, 'पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख माझ्या प्रचारासाठी गोंदियाला आले, सभा सुरु झाली, आणि बाळासाहेब मराठीतून बोलायला लागले. लोकांकडून एकच हाक आली, हिंदीतून बोला, मग मी उठलो, आणि माईकवर म्हणालो, 'ज्यांना ऐकायचा असेल त्यांनी ऐकावं..नाहीतर सभेतून खुशाल उठून जावं...' त्यांनतर कुथे आठवणी सांगू लागले....'विदर्भात त्यावेळी शिवसेना हा गुंडाचा आणि टुकार मुलांचा पक्ष असल्याचं म्हटलं जायचं. पोलीस कायम कार्यकर्त्यांच्या याद्या मागायचे, मात्र मी कधीच द्यायचो नाही. त्यावेळी शिवसेनेच्या प्रचारासाठी जीप घेतली होती. जीपमध्ये हनुमान गियर होता, गोंदियासारख्या जिल्ह्यात फिरताना चिखलात फसलं, तर हाच गियर जीपला बाहेर काढायचा...''
रामटेक मतदारसंघाचे तरुण आमदार आशिष जयस्वाल भेटले. ते म्हणाले, 'पहिल्यांदा जेव्हा आमदारकी हरलो, तेव्हा साहेबांनी मला बोलावून घेतलं आणि लढा, पराभवानं खचू नका'...एवढंच म्हटलं. त्यानंतर आशिष जयस्वाल कधीच पराभूत झाले नाहीत..!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. मुनगंटीवारांचा आवाजाची पोत ऐकून बाळासाहेबांनी हा कोण आहे, अशी विचारणा प्रमोद महाजनांकडे केली. मंत्री झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेले तेव्हा बाळासाहेब म्हणाले, 'मुनगंटीवार जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मानगुटीवर बसून काम करा...' बाळासाहेबांनी शब्दाची फोड करत सरळ मुनगंटीवारच्या हृदयालाच हात घातला...
नागपूरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख पिल्ले 16 वर्षांचे असताना त्यांना मातोश्रीवर जाण्याचा संधी मिळाली. मातोश्रीवर बैठक सुरु असताना पिल्ले शांत बसले होते. अचानक बाळासाहेबांनी पिल्लेकडे बघून म्हटले 'तू साउथ इंडीयन आहे का?'...अचानक आलेल्या प्रश्नामुऴे माझी ताराबंळ उडाली. मी कसाबसा उठून बोललो, 'होय साहेब...' अजूनही पिल्लेंना बाऴासाहेबांचा तो आवाज आठवतो...
बाळासाहेबांच्या जाण्यानं जुन्या शिवसैनिकांच्या या भावना उचंबळून आल्यात. आता कोणताही संपर्कप्रमुख बाळासाहेबांशी आपल्याला जोडू शकणार नाही, अशी खिन्न भावना त्यांच्या मनात दाटून राहिलीय...