EasyBlog

This is some blog description about this site

नवजागरण

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 3001
  • 0 Comment

जगातील कोणत्याही लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सशक्त प्रसारमाध्यमांची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच आपल्या लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ ठरवताना घटनाकारांनी प्रसारमाध्यमांना चारपैकी एका स्तंभाचा दर्जा बहाल केला, यातच सारं काही आलं. बदलत्या काळानुसार प्रसारमाध्यमांचं रूप आणि साधनंही बदलत गेली.

थोडक्यात, अपडेट होत गेली. साध्या कागदापासून सुरुवात करणार्‍या पत्रकारितेनं आज वर्च्युअल ई-पेपरपर्यंत यशस्वी मजल मारलेली आहे. याच प्रसारमाध्यमांनी मोठमोठी आंदोलनं उभी केली, आणि यशस्वी करताना समाजाचा इतिहासच बदलून टाकण्यात मोलाची भूमिका बजावलीय. आजच्या काळात सोशल नेटवर्किंग साईट्स आणि न्यू एज मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली सारी विचारमंच ही आधुनिक पद्धतीची प्रसारमाध्यमंच आहेत यात कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही, आणि त्यात आता नव्यानं भर पडलीयं वेबबेस्ड न्यूज मीडियमची.

काही दिवसांपूर्वी कॉमस्कोअर आणि पीईडब्ल्यू या अमेरिकेतील जागतिक शोध संस्थांनी इंटरनेटसंबंधी केलेल्या सर्वेक्षणात अगदी मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार १५ ते ३५ वयोगटातील लोक सर्वाधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. अर्थात, हा वापर सोशल नेटवर्किंग साईट आणि मोबाईल इंटरनेट कनेक्टिविटी, स्वस्त दरात झालेली उपलब्धता व माध्यम म्हणून वापरण्यात येणारा सुटसुटीतपणा यामुळे ही संख्या वाढल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातील इंटरनेटचा वापर ब्रिक देश त्याचबरोबर अमेरिका, जपान आणि युरोपीय देशांपेक्षाही अधिक असल्याचं निदर्शनास आलं आहे. जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात प्रथमच भारतानं एवढी मोठी आघाडी घेतल्याचं समोर आलं आहे. देशातील इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे तीन कोटी 50लाख लोक हे सायबर कॅफेमधून इंटरनेटचा वापर करतात, तर चार कोटी 30 लाख लोक घरामधून किंवा ऑफिसमधून इंटरनेटचा वापर करतात. मात्र प्रती व्यक्ती इंटरनेटचा वापर पाहायचं म्हटलं तर तो  साडेबारा तास होतो. हा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याचबरोबर देशात इंटरनेटचा वापर करण्यात पुरुष आघाडीवर असल्याचंही या संशोधनात समोर आलं आहे. मात्र 35 ते 44 या वयोगटातील वर्गात पुरुषांपेक्षा महिला सर्वाधिक इंटरनेटचा वापर करत असल्याची बाब यातून समोर आली आहे. या वयोगटातील दर 10 पुरुषांमागं 12 महिला इंटरनेटचा वापर करतात.

इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो, यासाठी केलेल्या विशेष सर्वेक्षणात 87 टक्के युजर्स सर्च इंजिनचा वापर करतात. 85 टक्के युजर्स सोशल नेटवर्किंग साईट, 78 टक्के ई-मेल्स, 58 टक्के बातम्यांसाठी आणि शिक्षणासाठी 41टक्के युजर्स इंटरनेटचा वापर करत असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. एका वर्षभरात सोशल नेटवर्किंग साईटच्या युजर संख्येमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाल्याची बाबही या संशोधनात समोर आली आहे. तर फेसबुकच्या युजर्सची संख्या 2010च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मात्र ई-मेल्ससाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण मात्र सारखंच राहिलं आहे.

पण त्यापेक्षा धक्कादायक वाटणारी माहिती अशी की, इंटरनेटवरील विविध साधनं आणि मोबाईलवरील साधनं (मोबाइल अप्लिकेशन) वापरात आणून जास्तीत जास्त वेब कंटेंट निर्माण करण्यात जगातील कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक वंशाचे लोक अग्रस्थानी आहेत. वरकरणी पाहता ही बाब केवळ सर्वेक्षणातून समोर आलेला निकाल आहे असं जरी वाटत असलं तरी यामागं एका मोठ्या सामाजिक व्यवस्थेची खोल दरी असल्याचा निर्वाळा मिळतो. कृष्णवर्णीयच किंवा हिस्पॅनिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा कंटेट जनरेशनमध्ये अग्रक्रम का आहे?

या प्रश्नावर चर्चा करताना नेमकं असं उत्तर देता येणं कठीण आहे. परंतु त्यावर चर्चा होणं जरुरीचं आहे. प्रसारमाध्यमं ही प्रत्येकाची आवश्यकता आहे. `प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा निसर्गतः जन्मसिद्ध हक्क आहे.` परंतु व्यक्त होण्यासाठी लागणारं माध्यम मात्र संकुचित असल्यानं त्याला एक मर्यादा होती. पण ती कसरही आता इंटरनेटनं भरून काढली. आजही अमेरिकेतील वंशवाद आणि वर्णभेद हा पूर्णतः संपलेला नाही. भारतातील जातीयवादही संपलेला नाही. जग आजही `आहे रे` आणि `नाही रे` गटांत विभागलेलं आहे. मूठभरांनी नेहमीच बहुजनांचं कधी वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, प्रांतभेद तर कधी धर्मभेदाच्या जहाल कारणांखाली दमन करत स्वतःचं वर्चस्व अबाधित राखलं. प्रसारमाध्यमंसुद्धा याला अपवाद नव्हती. प्रत्येक ठिकाणी अगदी प्रिंटपासून ते इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत सुसाट धावणार्‍या सेन्सॉरशीपनं समाजात माध्यमहीन वर्गाला जन्म दिला. हाच एक वर्ग स्वतःसाठी एका सशक्त माध्यमाचा शोध घेत होता, आणि ते माध्यम त्याला इंटरनेट आणि त्यावरील सोशल नेटवर्किंग साईट्सच्या रूपानं मिळालं. ज्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मनोनीत स्वातंत्र्य होतं, असं हक्काचं ठिकाण मिळणं ही खरं तर इतिहासातील एक मह्त्त्वपूर्ण घटनाच मानावी लागेल. गेल्या वर्षी आखाती देशांतील हुकूमशाही विरोधातील उठाव केवळ आणि केवळ वेब मीडियामुळे घडून आला. आखातातील स्थानिकांना लोकशाही राज्यव्यवस्थेच्या कल्याणकारी संकल्पनेची जी महाद्वारं उघडून दिली त्याचाच तो परिपाक होता.

आज भारतापुरतं बोलायचं झालंच तर एक गोष्ट प्रामुख्यानं विचारात घ्यायला हवी, ती म्हणजे भारतातील प्रसारमाध्यमं, त्यांची पोहोच, वापर, उपयुक्तता, प्रभाव आणि त्यांची मालकी. भारतातील जवळपास ९० टक्के प्रसारमाध्यमं ही अभिजनांच्या मालकीची आहेत. ज्या ठिकाणी उर्वरित बहुजनांना काहीच स्थान नाही, कोणतंही प्राधान्य नाही. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करून उठणार्‍या अभिजन लेखकांनाही वाळीत टाकण्याची संस्कृती जोपासणारी ही प्रसारमाध्यमं आहेत. पण काळानुरूप परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलत्या काळात मानवी बुद्धीला अधिक प्रगल्भ होण्याची संधी मिळवून देत असते. आज एखादं चांगल्या दर्जाचं व उच्च प्रतीचा कागद वापरणारं वृत्तपत्र सुरू करायचं असेल, तर किमान २० कोटींच्या आकड्याएवढी द्रव्यसंपत्ती असायला हवी. एखादी वृत्तवाहिनी किंवा कोणतीही मनोरंजनात्मक वाहिनी (एलेक्ट्रॉनिक चॅनेल) सुरू करायचं असलं तर हाच आकडा दहाच्या पटीत मोजायला हवा. पण इंटरनेटचं तसं नाही. स्वतःची अनलिमिटेड स्पेसची वेबसाईट डेव्हलप आणि होस्ट करण्याचा खर्च हा अगदी पाच ते दहा हजार रुपयांत होऊन जातो. जे तुमच्या स्वतःच्या मालकीचं असतं. खिशात मोबाईल असला तर अवघ्या पाच रुपयांत आणि जरी नसला तरी विशेष असा फरक पडत नाही. केवळ १५ रु. प्रती तास कोणत्याही सायबरमध्ये साध्यातली साधी व्यक्ती ही महाजालावर स्वतःचं मत अगदी परखडपणं, कोणाचीही भीती न बाळगता व्यक्त करू शकते. जर तुम्ही मांडलेल्या मतामध्ये खरंच दम असेल तर जगातल्या करोडो वाचकांपर्यंत तुम्ही सहजच पोहोचू शकता.

सोशल नेटवर्किंग साईट्सपुरताच विचार केला, तर एक गोष्ट निश्चितपणं सांगता येईल की, हो, येणार्‍या काळात समाजातील कायम उपेक्षित राहिलेल्या घटकाला याचा खूप फायदा होणार आहे. थोडासा का होईना एक कनिष्ठ मध्यमवर्ग हा उपेक्षितांमध्येसुद्धा उदयाला आला आहे. तोच आत्ता उर्वरित समाजाला या जोखडातून सोडवण्याची मनीषा बाळगून आहे. ज्यांना सध्याच्या प्रसारमाध्यमांत कोणतंही प्रतिनिधित्व नाही तोच मध्यमवर्ग सोशल नेटवर्किंग आणि वेबबेस्ड न्यूज पोर्टल्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. याआधी कोणालाही एखाद्या बड्या संपादकांवर टीका करण्यासाठी कोणतीही सोय नव्हती, पण ती या माध्यमानं पुरी केली. भारतातील एकूण एक जाती-संप्रदाय, त्यांचं होणारं दमन, त्यांची सद्यस्थिती जगभरात पोहोचू लागली आहे. याआधी लेखक माध्यमांमधून वाचकांशी संवाद साधण्याचं काम करीत असत. कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं ही केवळ `वन वे कम्युनिकेशन`ची सोय पुरवितात. परंतु वेब मीडिया लेखकांचा वाचकांशी आणि वाचकांचा लेखकांशी संवाद घडवून आणण्याची किमया साधतात तेही अगदी कमी वेळात, कोणतंही अतिरिक्त कष्ट न घेता, किंवा कोणताही अतिरिक्त खर्च न करता, अगदी आपल्या सोयीच्या ठिकाणी. वर्तमानपत्रं ही केवळ वर्तमानातच वाचली जातात. परंतु सोशल नेटवर्किंग साईट्सवरील हरेक प्रकारचं कंटेंट केवळ एका सर्चवर आपल्यासाठी उपलब्ध होतं. यात महत्त्वाचं असं की, वेब न्यूज मीडियातील वाचक आणि दर्शक हा निष्क्रिय खरेदीदार मुळीच नसतो. त्याला आवडलेल्या आणि नावडलेल्या दोन्ही उत्पादनांवर धडक, थेट आणि तत्काळ प्रतिक्रिया देण्याची तयारी ठेवून असतो. त्यामुळं एकेकाळी केवळ मनोरंजनासाठी असलेलं हे माध्यम आता सामाजिकदृष्ट्या अधिक गंभीर बनलं आहे. कारण या माध्यमामुळं ओपिनियन मेकर्सचं राज्य संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागलीय.

न्यू एज मीडियानं माध्यमं खर्‍या अर्थानं बदलण्यास सुरुवात केली आहे. आपण या बदलाचे साक्षीदार आहोत आणि लाभार्थीसुद्धा.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठी ई जगतातला लोकप्रिय ब्लॉगर. मुक्त पत्रकार आणि कट्टर आंबेडकरवादी युवक. सोशल मीडियातून लोक किती प्रभावीपणे जोडले जाऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण वैभव आणि त्याच्या मित्रांनी घालून दिलंय. आंबेडकरी विचारांनी भारलेला याचा फेसबुक ग्रुप केवळ फेसबुकवरच नाही तर प्रत्यक्षात एकत्र आलाय. त्यांनी चैत्यभूमीवर उभारलेली फेसबुक वॉल चर्चेचा विषय झाली होती.