EasyBlog

This is some blog description about this site

माझी टिवटिव!

युग सोशल मीडियाचं

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1167
  • 0 Comment

पूर्वी एक वाक्य आपण सहज म्हणून जायचो, `ए चल, तुझी टिवटिव ऐकायला मला वेळ नाही!` पण आजकालच्या जगात व्टिट वाचायला मात्र सगळ्यांकडे हल्ली वेळ आहे. पु.ल. म्हणून गेलेत तसं `'काय बोललं यापेक्षा कोण बोललं'` याला अधिक महत्त्व आलं आहे. ...आणि हीच व्टिटरवरची टिवटिव ऐकायला लोक उड्या मारत आहेत. कसं घडलं हे?

सोशल मीडियानं जे जग बदललं आहे ते स्तिमित करणारं आहे. त्याविषयी अधिक सांगताना मी काही उद्बोधक माहिती इथं ठेवत आहे.

सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते 2003 पर्यंत जितका डाटा गोळा झाला होता, तितका डाटा 2004 या एका वर्षात गोळा झाला आणि 2012मध्ये तेवढाच डाटा दर 48 तासांमध्ये गोळा होतो,  असं आयबीएम या कंपनीनं घेतलेल्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे.

तर हे जे डिजिटायझेशनचं विश्व जितक्या झपाट्यानं बदललं आहे, त्याचा आपल्या जीवनमानावर परिणाम होणार आहे. तो कसा आणि किती प्रमाणात होईल, आणि आपण त्याबाबतीत काय करू शकतो, याचा आता विचार करणं गरजेचं झालं आहे.

तंत्रज्ञान हे सर्व समाजाला जोडणारं माध्यम आहे. गरीब - श्रीमंत, ग्रामीण - शहरी या सगळ्यांना जोडणारं माध्यम एकच संदेश देत आहे, जे सर्वश्रुत आहे. बदल... जीवनात बदल हा अविभाज्य घटक आहे आणि तो अंगीकारणं हेच आपल्या हाती आहे. जो लवकर बदलेल तोच पुढे जाईल. या तंत्रज्ञानाचा माहिती जमवणं, पुरवणं यासाठी जितका परिणामकारक उपयोग होईल तितक्या झपाट्यानं आपली प्रगती होईल.

स्मार्ट फोन्स, ब्रॉडबॅण्ड यांचा आता झपाट्यानं प्रसार होत आहे. भारत सरकारतर्फे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष श्री. माँटेकसिंग अहलुवालिया यांनी नुकतंच तीस हजार कोटी रुपयांचं ब्राँडबॅण्डमधील इन्व्हेस्टमेंटचं वेळापत्रक दिलं आहे.

पुढच्या निवडणुकांचा निकाल कदाचित सोशल मीडियावर झालेल्या चर्चाच ठरवतील. जगभरात सोशल मीडिया, इंटरनेटवरच्या चर्चा आणि मेसेजेसनं क्रांती घडवली. इजिप्त, लिबिया आणि इतर आखाती देशात एक चळवळ उभी केली. एवढंच नाही तर, आपले अण्णा, केजरीवालसुध्दा या माध्यमांमधून आपली ताकद दाखवू शकले. 

इंडियाकडे ही ताकद आली आहे. पण भारताचं काय? मला वाटतं पुढच्या दहा वर्षांत हे चित्र पूर्ण बदललेलं असेल. दहा वर्षांपूर्वी घरकामाला न सांगता दांडी मारणारी बाई फोनवरून घरकामाला येत नाही असं सांगते, ती उद्या फेसबुकवर स्टेटस् अपडेट करून सांगेल!  हा गमतीचा भाग असला तरी हे अवघड नाही!

आपापसात भांडणारे राजकारणी, उद्योगपती याची दखल घेतील? कदाचित उद्या हा प्रश्नच राहणार नाही, कारण बेदखल करण्याचं त्यांना कारणच असणार नाही, त्यातून ते बेदखल होण्याचीच शक्यता जास्त आहे.

एक नवं युग या माध्यमातून उभं करताना सामाजिक आणि राजकीय भान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  'भारत4इंडिया'  हे काळाची गरज ओळखून टाकलेलं एक मोठं पाऊल आहे, असं मला वाटतं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ. सोशल मीडिया हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय.