EasyBlog
This is some blog description about this site
सिरोंचा ते सीरिया...
भूमिका ब्लॉगमागची
जग धुमसतंय... ट्यूनिशियापासून सुरू झालेली लोकशाहीची लढाई आता सीरियापर्यंत येऊन ठेपली आहे.
ट्यूनिशियातील २६ वर्षीय फळ दुकानदारानं सरकारी दडपशाहीविरुद्ध आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुरू झाला लोकशाहीचा लढा.
या लढ्यानं आतापर्यंत चार देशांतील हुकूमशहांची सत्ता संपुष्टात आणली, तर एक देश लोकशाहीच्या उंबरठ्य़ावर उभा आहे.
सीरियामध्ये लोकशाहीची हाक दाबण्यासाठी असाद राजवटीनं नागरिकांच्या क्रूर कत्तली सुरू केल्यात, हवाई हल्ले चढवून आपल्याच शहराचं मलब्यात रूपांतर करणं सुरू आहे. मात्र जग या सर्व घडामोंडीकडं नुसतंच मूकपणं बघत आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या देशात नक्षलग्रस्त भागातला रक्तपात अजूनही सुरूच आहे. नक्षलवादी आणि पोलिसांच्या या लढाईत विजय कुणाचा होईल हे माहिती नाही. मात्र मूळ निवासी गरीब आदिवासी मात्र साफ पराभूत झालेत. या घटनांशी माझा काय संबंध, असाच विचार आपल्यातले अनेक जण करतात.
एका बाजूला आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाला मोठ खेडं बनवून टाकलंय, फेसबुक आणि टि्वटरच्या माध्यमातून सर्व जण जगाशी कायम जोडलेलो असतो. मग जग एवढं छोटं झालेलं असताना जगातील लोकशाहीसाठीचे लढे, मानवी हक्कांच्या चळवळी, त्यात हकनाक मारली जाणारी माणसं बघून आपलं मन का दुखत नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे? मुंबई दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांसाठी आपल्याला अतीव दुःख होतं, मात्र गडचिरोलीत आपल्याच बांधवांशी लढून मरणाऱ्या पोलिसांसाठी, आदिवासींसाठी आपण कधीतरी मेणबत्त्या लावणार आहोत काय? हक्काची लढाई लढणाऱ्या मावळ ते यवतमाळच्या शेतकऱ्यांसाठी आपण कधीतरी अश्रू ढाळणार आहोत का? सिंरोचा ते सीरियापर्यंतच्या जगाचं दु:ख, अनेक प्रश्न या ब्लॉगच्या माध्यमातून मी सातत्यानं उपस्थित करणार आहे.