EasyBlog

This is some blog description about this site

कडाणपाणी

सामान्यांचं जगणं सुखकर होणार का?

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1104
  • 0 Comment

'कडाण पाणी' हे ब्लागचं नाव घ्यायच्या मागं एक भूमिका आहे...खरं तर सामान्य माणसाच्या वाट्याला नेहमीचं सत्व कमी झालेलं किंवा जे खरं सत्वं आहे... त्याच्यातला अर्क आहे तो वाट्याला येत नाही.. मग आपला वाटा मिळण्याचं असो...किंवा कष्ट करून त्याचा मोबदला मिळण्याची वेळ असो.. ऐनवेळी सत्व दुस-याच्याच वाट्याला जातं.. ग्रामीण भागात देवाला बोकड कापण्याची परंपरा आहे. बोकड कापल्यानंतर रात्री सगळ्या गावाला जेवायला बोलावलं जातं. एक बोकड आणि मोठं तपेलंभर रस्सा जेवायला शंभर दिडशे लोक... असा तो सगळा कार्यक्रम असतो..

अशा वेळी प्रत्येकाच्या ताटात पितळीभर रस्सा तर पडतो पण मटणाचा त्यातला हाडकाचा तुकडा मात्र येत नाही..फक्त मटणाच्या कडाणावर एक दोन भाक-या हाणाव्या लागतात. भले त्यात मटणाचा तुकडा नसू दे, पण मटणाचं कालवण खातोय याचं समाधान कडाणपाणी वरपणा-या सामान्य माणसाला असतं. मात्र त्या गावातले प्रतिष्ठित समजले जाणारे, थोडी जास्त शेतीवाडी असणारे, ज्यांच्या शब्दाला गावात किंमत आहे, असे काही जण मात्र जेव्हा त्या पंगतीला बसतात त्यावेळी मात्र त्यांच्या वाट्याला कडाणपाण्यासोबत मटणाचे तुकडे आपोआपच येतात.

खरं तर त्या कार्यक्रमात त्यांचं काही योगदान वगैरे नसतं..पण त्यांच्या वाट्याला मात्र खरं मटणाचं जेवण येतं. त्यात मटणाच्या कालवणाचा कट ही येतो.. सामान्य माणसाच्या वाट्याला मात्र हे काही येत नाही. त्यांच्या वाट्याला फक्त कडाणपाणी आलं त्यांना त्याचं काही दु:ख नसतं. उलट त्या कडाणपाण्यावरच ते खूष असतात. कारण त्यांचं रोजचं जगणंच एवढं निरस असतं. बेचव जगण्यात हे कडाणपाणीही त्याच्यासाठी मोठी गोष्ट असते...हीच बाब रोजच्या जगण्यातली आहे. सामान्य माणसाला सगळ्याच दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असते. तर दुस-या बाजूला काही लोकांच्या साठी इथली व्यवस्था पायघड्या अंथरून असते. हे का होतंय? 

कुठल्याही व्यस्थेत नेहमीच कडाणपाणी वाट्याला येणाऱ्यांची संख्या का वाढते? याचाच शोध या ब्लॉग मध्ये घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेली १५-१६ वर्षे पत्रकार म्हणून मुंबईत काम केल्यानंतर तर एका वर्गाला सतत दुय्यम स्थानावरचं जगणंच कसं भाग पडत आहे, हे खूप जवळून पाहता आलं. त्यामुळंच अस्तित्वात असणा-या व्यवस्थेत आणि येऊ घातलेल्या व्यवस्थेतही सामान्य माणसाचं स्थान तसंच राहणार आहे की त्यात काही बदल होणार आहेत, याचाही शोध घेण्याचा माझा प्रयत्न असेल. मला अपेक्षा आहे की यातून आपलंच म्हणणं मांडलं जातंय, सामान्य माणसाच्या दुखण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न होतोय, असं आपणास वाटेल. त्यात अधिक भर टाकणा-या आपल्या प्रतिक्रिया मला मोलाची मदत करणार आहेतच. तर भेटूया पुढच्या आठवड्यात...

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

1995 पासून पत्रकारितेत. चित्रलेखा, लोकप्रभा, नवशक्ति, अक्षर भारत यांमध्ये लेखन. ई टीव्ही मध्ये राजकीय रिपोर्टिंग. 'झी न्यूज'मध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून चार वर्षे काम. लोकसभा, विधानसभा निवडणुका तसंच विधीमंडळ अधिवेशनाचं रिपोर्टिंग. 'आयबीएन लोकमत'मध्ये डेप्युटी न्यूज एडिटर, 'सहारा समय'चे इनपूट एडिटर म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या `भारत 4इंडिया`मध्ये पॉलिटिकल एडिटर म्हणून कार्यरत.