EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

जीवघेण्या व्यसनाचं नागमोडी वळण भाग- 2

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1358
  • 0 Comment

फुत्सेरो हे छोटेखानी शहर डिमापूरपासून तसं खूप दूर, उंचावर आहे. नागालँडमधलं सर्वात उंचावरचं ठिकाण म्हटलं तरी चालेल. वळणावळणांचे रस्ते पार करत फुत्सेरोला जावं लागतं. इथली भौगोलिक स्थिती हा उपचारासाठी आयडीयूंपर्यंत जाण्याच्या दृष्टीनं एक अडसरच आहे. ड्रग्जचा पुरवठा मात्र अशाही परिस्थितीत होत राहतो. इथल्या एकूणच वातावरणात भौगोलिक स्थितीची महत्त्वाची भूमिका आहे. दुर्गम अशा या भागात फुटीरतावादी चळवळ अनेक वर्षांपासून आहे.

 

भारताशी आपलं काय नातं, असं आजच्या तरुण पिढीलाही वाटतं. आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला भारतात परकं मानलं जातं ही जाणीव लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे असं जाणवलं. अशा मानसिकतेत वैफल्य पटकन येतं. त्यात ड्रग घेणं म्हणजे काहीतरी रोमहर्षक, आधुनिक, फॅशन असं काहीसं तरुणांना वाटत असतं. संपर्कास कठीण असा हा प्रदेश एकाकीपणा वाढवणारा आहे. त्याचीही भर पडते. फुत्सेरो दुर्गम असूनही इथे आयडीयूंचं प्रमाण वाढलं आहे. इथलं राजकीय वातावरणही अडथळे उत्पन्न करतं. सतत तिथं सामाजिक-राजकीय चळवळी आणि निदर्शनं, बंद हे चालू असतात. त्यामुळंही संपर्क दुष्कर बनतो. सपाट प्रदेशाप्रमाणे गावांची रचना नसल्यानं मुळातच इथं कुणाशी संपर्क साधणं हे सहज सोपं काम नाही. मग आयडीयूंना शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवण्यासाठी तर खूपच प्रयास करावे लागतात. दूरदूरच्या गावांमधून हे लोक राहत असल्यामुळे, रोज डीआयसीत येणंही त्यांना शक्य होत नाही. मग मधला मार्ग म्हणून समवयस्क कार्यकर्ते आणि प्रशिक्षक गावामधून जाऊन आयडीयूंना इंजेक्शन सीरिंज व सुया पुरवतात. त्यांना मार्गदर्शन करतात. समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात. ओएसटीसाठी मात्र आयडीयूला प्रत्यक्ष हजर राहावं लागतं. अगदीच कुणी आजारी असेल तर तीन दिवसांचा डोस घरातल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीकरवी दिल जातो. आयडीयूंवर बारीक लक्ष ठेवलं जातं आणि नियमितपणे त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तरी अलीकडे चर्चचा पाठिंबा मिळत असल्यामुळे लोकांपर्यंत जाणं तरी काहीसं सुलभ झालं आहे. ड्रग घेणारे हे एक तऱ्हेचे रुग्ण आहेत आणि त्यांना उपचारांची गरज आहे, ही गोष्ट सामान्यांच्या मनावर बिंबवण्याबाबत चर्चचीही मदत होते. 

 

डॅनियल या गेल्या पाच वर्षांपासून ओएसटीवर असलेल्या तरुणाची कहाणी एक प्रकारे प्रातिनिधिक आहे. डॅनियलने १९९४ मध्ये ड्रग घ्यायला सुरुवात केलीय. आधी तो कफ सीरप, ब्राऊन शुगर किंवा कधी हेरॉईन यांची नशा करत असे. तेव्हा १०० रुपये त्यासाठी लागत. आता हा खर्च दुपटीनं वाढला आहे. पूर्वी दिवसाला तो ४०० रुपये खर्च करत असे. लाकूडफाटा विकून तो हा खर्च भागवे. त्याच्या आईवडिलांना बराच काळ याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यांच्याकडं तो कधीच पैसेही मागत नसे. ओएसटी घ्यायला लागल्यापासून डॅनियलमध्ये खूपच सुधारणा झाली. सुरुवातील सहा मिलिग्रॅम डोस त्याला घ्यायला लागत असे, तो आता ०.८ मिलिग्रॅमवर आला आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. २००७ मध्ये डॅनियलनं वॉर्ड युथ प्रेसिडेंटची निवडणूक लढवली आणि तो निवडूनही आला. पण तो ड्रग घेतो म्हणून त्याला दबावामुळं राजीनामा द्यावा लागला. त्यानं तो भांडण न करता दिलाही. तो उपचार घेत होता, तर त्याच्या या स्थितीचा इतरांनी फायदा घेतला. तो आता इतरांना मार्गदर्शन करतो. त्याच्या हाताखाली चार जण काम करतात आणि २३६ आडीयूंची काळजी घेण्याची जबाबदारी आज तो पेलतो आहे. 

 

फुत्सेरोत १ डिसेंबरला गेलो, तो आंतरराष्ट्रीय एड्स दिवस होता. रुकिझुमी वेल्फेअर सोसायटी (आरडब्ल्यूएस) या संघटनेनं या निमित्तानं एका जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रादेशिक बोलींमधून बहुतेकांनी आपले विचार मांडले, जेणेकरून उपस्थितांना प्रश्नांचं स्वरूप नीट समजावं. स्थानिक पातळीवर सामाजिक काम करणाऱ्या या संघटनेला समाजात ड्रग अॅडिक्ट्सबद्दल असलेली तिरस्काराची भावना कमी करण्याचं, या मंडळींकडे कलंकित म्हणून न बघण्याचं आवाहन करण्याचं काम ही संघटना करते. एकूणच व्यापक स्तरावर जाऊन समाजाचं प्रबोधन करण्याचं कार्य या संघटनेनं हाती घेतलं आहे. चॅकेसांग मदर्स असोसिएशन या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संघटनेची मदत त्यासाठी घेतली जाते. खंडणी उकळणं, स्त्रियांवर बलात्कार करणं असे अत्याचार फुटीर गटांकडून १९८४ नंतर होऊ लागले. बलात्कारित स्त्रियांपुढे समाजाला तोंड देणं हे एक कठीण आव्हान असे. अनेकदा बलात्कार करून स्त्रियांचा खून केला जाई. या प्रकारांविरुद्ध आवाज उठवण्याचं काम चॅकेसांग मदर्स असोसिएशननं केलं. स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यातही पुढाकार घेतला. नागालँडमध्ये विविध आदिवासी जमाती आहेत. त्यांच्यातही पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्रीला मुलगा नसेल, तर तिला सासरच्या संपत्तीत वाटा मिळत नाही. नवऱ्यामागे अशा स्त्रियांना जगणं कठीण होऊन जातं. अशा अनेक समस्यांमध्ये आयडीयू आणि संसर्गामुळे होणारा एचआयव्ही-एड्सचा प्रसार यांचीही भर पडली आहे. अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणारी ही असोसिएशन आयडीयूंसाठी काम करण्यातही उतरली आहे. 

 

फुत्सेरोमधल्या ड्रॉप इन सेंटर (डीआयसी)लाही भेट दिली. ऑर्किडच्या मदतीनं इथलं काम चालतं. तिथे आयडीयूंना उपचार व मार्गदर्शन यांचा लाभ घेता येतो. ओरल सबस्टिट्यूशन थेरपी (ओएसटी) योजून ड्रग युजर्सना सामान्य जीवन जगण्याकडं वळवण्यासाठी इथं प्रयत्न केले जातात. समाजानंही त्यांना आपल्यातलंच मानावं, त्यांचा तिरस्कार करू नये यासाठी उपक्रम राबवले जातात. इंजेक्टिंगसाठी एकदाच सुई वापरणं, वापरलेल्या सुया नष्ट करणं, वेळोवेळी ओएसटीसाठी हजर राहणं यामुळे अनेक आडीयू आता पूर्वीपेक्षा बऱ्या पद्धतीनं जीवन जगत आहेत. त्यांना एकत्र आणून, प्रबोधनाबरोबरच त्यांचं मनोरंजनही होईल, अशा पद्धतीनं इथे सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. या मंडळींना सर्वसामान्यांसारखीच वागणूक दिली जाते. आपणही याच समाजाचा हिस्सा आहोत, हे त्यांना जाणवावं यासाठी प्रयत्न केले जातात. या सर्व कामात स्थानिक पोलीस यंत्रणा, चर्च आणि सामाजिक संघटना यांचं साह्य घेतलं जातं. फुत्सेरोची लोकसंख्या आहे ३२,०००. इथं २०११ मध्ये ७०० आयडीयूंची नोंद झाली आहे. स्त्रियाही ड्रगसेवन करतात, पण इथल्या डीआयसीमध्ये केवळ दोन स्त्रियांची नोंद आहे. उघडपणे आपल्या व्यसनाचा स्वीकार करण्यास स्त्रिया पुढे येत नाहीत, कारण समाजाकडून अधिकच अवहेलना सोसावी लागेल हे भय त्यामागं असतं, असं सांगण्यात आलं. अशा स्त्रियांपर्यंत पोचण्याचं आव्हान सध्या इथल्या संघटनेपुढं उभं आहे. 

 

 नागालँडमध्ये स्थानिक आणि उपरे असा भेद जाणवतो. हा भेद इथल्या वेश्याव्यवसायातही झिरपला आहे. डिमापूरमधल्या फीमेल सेक्स वर्कर्ससाठी असलेल्या अकिंबो डीआयसीमध्ये शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांशी बातचीत केली तेव्हा त्यांच्या तोंडून याबद्दल ऐकायला मिळालं. शहरातल्या मध्यवस्तीतल्या बाजारपेठेजवळच हे केंद्र आहे. इथल्या स्त्रिया प्रामुख्यानं आसामी होत्या. त्यांचे ग्राहकही परप्रांतीयच असतात, कारण स्थानिक लोकांकडून फसवणूक होण्याची, दबाव येण्याची त्यांना भीती वाटते. विशेषतः पोलीस आपल्याला त्रास देतात, पैसे किंवा शरीर उपभोगाची किंमत चुकवावी लागते, अशी त्यांची तक्रार होती. त्यांच्या आरोग्यासाठी इथं क्लिनिक चालवलं जातं आणि लैंगिक संसर्गाच्या आजारापासून इतर सामान्य दुखण्यांवरही इथे इलाज केला जातो. नियमित आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, नियमित होणारं कंडोमचं वाटप अशा सुविधांचा लाभ या स्त्रिया घेत असतात. कंडोमशिवाय आम्ही कोणाही पुरुषाशी संबंध ठेवत नाही, असं साऱ्या जणींनी आग्रहानं सांगितलं. गरिबी, नवऱ्याची बेकारी, नवऱ्यानं वाऱ्यावर सोडून देणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या महिला शरीरविक्रीच्या व्यवसायात उतरल्या. शिक्षण किंवा इतर व्यावसायिक कौशल्यांच्या अभावी आमच्यापुढं दुसरा पर्यायही नव्हता असं त्यांचं सांगणं होतं. नागालँडमध्ये साक्षरतेचं प्रमाण चांगलं असलं तरी या स्त्रिया बाहेरून आलेल्या आहेत. याच कारणानं अशिक्षित आणि ग्रामीण भागात शिकलेल्या स्त्रिया या व्यवसायात आढळून येतात. सुरक्षित लैंगिक संबंधांची माहिती नसल्यानं एचआयव्हीची लागण होते हे समजल्यामुळं आता त्या काळजी घेऊ लागल्या आहेत. या केंद्रात त्यांना भावनिक आधारही मिळतो, जो त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. या अकिंबो केंद्रात आतापर्यंत ९३६ स्त्रियांनी नाव नोंदवलं आहे. इथं त्यांना कलाकौशल्याची कामंही शिकवली जातात. 

 

आज नागालँडमध्ये ऑर्किडच्या पुढाकारानं नर्सचं मार्गदर्शन उपलब्ध असलेली एकूण १८ क्लिनिक्स आहेत. तिथं २० नर्सेस व १५ समुपदेशक काम करतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांपैकी २५ टक्क्यांहून जास्त स्त्रिया आज या क्लिनिकचा लाभ घेत आहेत. हा आकडा वाढायला हवा. आयडीयूंपैकी ६० टक्के तरी क्लिनिकचा लाभ वर्षातून एकदा घेतात. ओएसटी घेणारे अनेक जण इतरांना यातून बाहेर काढण्याचं कामही करतात, हे खूप महत्त्वाचं आहे. 

 

या नागालँड भेटीला आता वर्ष उलटून गेलं आहे. मनात येतं, आज तिथली परिस्थिती कितीशी बदलली असेल? हे ठीक आहे की, नागमोडी वळणाच्या रस्त्यांवर दबा धरून बसलेलं नागालँडचं विखारी वातावरण निवळायला वेळ लागेल. कदाचित ते पूर्णपणं बदलणारही नाही. पण चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम असंच चालू राहायला हवं. कारण हे मानवी चेहऱ्याचा स्पर्श असलेलं काम आहे. सीफार, ऑर्किड, आवाहन यांनी स्थानिकांच्या मदतीनं चालवलेले प्रयत्न नक्कीच मोलाचे आहेत. संजीवक आहेत.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.