EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1695
  • 0 Comment

प्रसारमाध्यमांचा उपयोग अन्यायाला वाचा फोडण्यासाठी होतो, अशी समजूत सर्वसाधारणपणे बाळगली जाते. पण आधी अत्याचार करायचा आणि त्याचं दर्शन घराघरात पोचणाऱ्या छोट्या पडद्यावर घडवून सनसनीखेज बातमी उजेडात आणल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, असंही घडू शकतं; हे गेल्या वर्षी गुवाहाटीत घडलेल्या तरुणीच्या विनयभंग प्रकरणावरून पूर्णपणं स्पष्ट झालं होतं. अलीकडेच संबंधित खटल्याचा निकाल लागून 11 जणांना दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा आसाममधील कामरूप जिल्ह्यातील न्यायालयानं ठोठावली आहे. त्यातल्या त्यात लवकर निकाल लागला एवढंच काय ते समाधान या खटल्यानं दिलं. अशा घटना भारतात सर्वत्र वारंवार घडताना दिसत आहेत, त्या कधी थांबणार, हा खरा प्रश्न आहे.

 

स्त्रियांना या देशात नेहमीच छेडछाड, विनयभंग, लैंगिक छळ अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं ही बाब लपून राहिलेली नाही. एक स्त्री म्हणून या तऱ्हेचा अनुभव न आलेली कुणी एखादी शोधूनही सापडणार नाही याबद्दल शंकाच नको. गुवाहाटी शहरात जो प्रकार घडला त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. तेथील क्लब मिंट या बारमध्ये आपल्या मित्रांसोबत गेलेल्या या तरुणीबद्दल केलेल्या शेरेबाजीला तिनं जाब विचारला म्हणून तिच्याबाबत हा प्रकार घडला, असं या एकूण घटनेतून समोर आलं.

 

घटनेचं चित्रीकरण टीव्ही चॅनेलवर झळकल्यामुळं मोठंच वादळ उठलं आणि वेगवेगळे कंगोरे घेऊन ही घटना समाजापुढे आली. अशा तऱ्हेची घटना घडत असेल तर कॅमेरा घेऊन तिचं चित्रीकरण करावं की रोखण्याचा प्रयत्न करावा इथपासून, नेमकं सत्य उलगडलं नसताना अशी दृश्यं चॅनेलवरून प्रसारित करावी काय, अशा अनेक सवालांचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तब्बल 45 मिनिटं हा सारा प्रकार चालला होता ही गोष्ट तर अधिकच सुन्न करणारी आहे. घटनास्थळाजवळून जाणाऱ्या मुकुल कालिटा या एका आसामी दैनिकाच्या संपादकानं या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना फोन केला. पण पोलीस येईपर्यंत त्यालाही गुंडांकडून बुक्के खावे लागले. पोलीस आल्यावरही गुंडांच्या तावडीतून त्या मुलीची सुटका सहजपणं झाली नाही. 

 

घटनेला राष्ट्रीय स्तरावर वाचा फुटल्यानंतरही चीड आणि शरमही वाटावी, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्याप्रकारे मिळत राहिल्या, ते अधिकच निषेधार्ह होतं. तेथील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यानं, ‘ताबडतोब हजर व्हायला हे खातं म्हणजे काही एटीएम मशीन नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे, हा भाग वेगळा. पण या तऱ्हेची असंवेदनशीलता तेथील राज्य सरकारनंही दाखवली आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा व या आयोगानं नेमलेल्या सत्यशोधन पथकाच्या एक सदस्य अलका लांबा यांनीही. अलका पांडे यांनी पत्रकार परिषदेत अत्याचारपीडित तरुणीचं नावच जाहीर करून टाकलं आणि मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या कार्यालयानं तिचं छायाचित्र माध्यमांसमोर आणून तीच चूक केली. अगदी अलीकडं ममता बॅनर्जींनीही कोलकातातील धनिक मुलंमुली प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करतात, त्यामुळे असं सुख न मिळवू शकणाऱ्या वंचित तरुणांमध्ये वैफल्य वाढतं आणि त्यातून छेडछाड व हिंसा होते, असा अजब तर्क मांडणारं वक्तव्य केलं होतं. तर मुलींची लग्नं 16व्या वर्षी झाली पाहिजेत, नाहीतर समाजात बलात्कार वाढतात, असे अकलेचे तारे खाप पंचायतीनं तोडल्यावर एकेकाळ मुख्यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौताला त्यास पाठिंबा दर्शवतात... जबाबदार पदांवरील व्यक्तींनी तरी अशा तऱ्हेची विधानं करणं टाळलं पाहिजे, पण ऐकतो कोण? 

 

अशा प्रकारचे अत्याचार झाले असल्यास संबंधित स्त्रीचं नाव उघड केलं जाऊ नये, असा संकेतच नव्हे तर नियम आहे. आता याबद्दल माफी मागण्यात आली असली, तरीही या संदर्भात सारवासारव करताना, तरुणीचं छायाचित्र जरी आम्ही उघड केलं असलं, तरी तिचं खरं नाव दिलेलं नसल्यानं तिची ओळख जाहीर केली असं म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष ममता शर्मा यांनी तर कळसच केला आहे. अलका लांबा यांनी जर चूक केली असेल असं आढळलं तरच महिला आयोग अध्यक्ष या नात्याने मी माफी मागते, अशी अटवजा दिलगिरी त्यांनी व्यक्त केली होती. शिवाय आता स्त्रियांनी कपडे परिधान करताना दक्षता बाळगावी, असा ‘वैधानिक इशारा’च त्यांनी समस्त स्त्रीवर्गाला देऊ केला आहे. पश्चिमी कपडे घातल्यामुळं या तऱ्हेचे प्रसंग ओढवतात असं त्यांनी म्हटलं आहे. संस्कृतिरक्षकाच्या भूमिकेत शिरलेल्या याच ममता शर्मांनी गेल्या वर्षी, ‘मुलींना कुणी सेक्सी म्हणून छेडलं, तर गैर मानता कामा नये, कारण या शब्दाचा अर्थ सुंदर व आकर्षक असा होतो,’ असा बहुमोल सल्ला देऊ केला होता. जे काही घडलं, त्यावरून, अजूनही कुणीच आपली जबाबदारी ओळखून वागायला तयार नाही असं जाणवलं. संबंधित न्यूज चॅनेल आसाम सरकारचे आरोग्यमंत्री शर्मा यांच्या पत्नी रिंकी शर्मा चालवतात. शर्मा यांना मुख्यमंत्री व्हायचं असून, त्यासाठीच हा सारा बनाव घडवून मुख्यमंत्री गोगोई यांना बदनाम करण्याचा डाव रचण्यात आला आहे, असा आरोप करत संपूर्ण प्रकारास राजकीय चढाओढीचं वळण देण्याचा प्रयत्नही होताना दिसला.

 

देशातील व विशेषतः ईशान्येकडील भागामध्ये (जिथे हुंडाबळी नाहीत, स्त्रियांचा छळ होत नाही असं मानतात) सातत्यानं अत्याचार घडत आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं स्त्रियांच्या संदर्भात होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारी सादर केली, त्यानुसार, बलात्कार, छळ, विनयभंग अशा पद्धतीचे वेगवेगळे 2,28,650 गुन्हे 2011 साली नोंदवले गेले. न नोंदवलेल्या प्रकरणांबाबत काय सांगावं? स्त्रियांच्या सुरक्षिततेवर बोट ठेवणारी गुवाहाटीतील ही आणखी एक घटना आहे, इतकेच. गेल्या 30 जूनला गुवाहाटीत आमदार रूमी नाथ आणि त्यांच्या व्दितीय पतीवर जमावानं हल्ला केल्याची घटना ताजीच आहे. या महिलेनं पहिल्या पतीला रीतसर सोडचिठ्ठी न देता एका अल्पसंख्याक समाजातील पुरुषासोबत विवाह केल्याचा राग स्थानिक लोकांनी या पद्धतीनं कायदा हातात घेऊन व्यक्त केला होता. समाजाविरुद्ध स्त्रीनं काहीही केलं किंवा एखादं पाऊल उचललं तर तिला आपण हवं ते शासन करू शकतो, असं मानण्याची पद्धतच आहे. विशेषतः जातपंचायती किंवा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना या पद्धतीनं वागताना दिसतात, मग त्यांचा धर्म कोणताही असो. जाट समाजाप्रमाणं उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीही स्त्रियांनी काय करावं वा करू नये, याबाबतची मतं व विचार आग्रहानं मांडतात. अलीकडेच उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीनं स्त्री-भ्रूणहत्येविरोधात मतप्रदर्शन करून एक चांगलं पाऊल टाकतानाच, आपल्या समाजातील स्त्रियांनी विशिष्ट कपडे घालावेत, घराबाहेर फार वावरू नये, मोबाईल वापरू नये असे निर्बंध लादणारे फतवे काढले. फतवा काढण्याचा मक्ता सर्वच धर्मीयांमधील जुनाट पंथींकडे असतो हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. 

 

स्त्रियांवर अनेक तऱ्हेचे निर्बंध घातले जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे छळलं जातं याच्या कहाण्या नित्याच्याच झाल्या आहेत आणि तरीही त्यातील क्रौर्य व त्याची परिसीमा मनाला चीड आणते व थक्कही करून सोडते. इंदूरला घडलेली एक घटना अशीच सुन्न करणारी आहे. तीस वर्षांपूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी विवाह झालेल्या एका स्त्रीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा ती उघड झाली. गेल्या पाच वर्षांपासून या महिलेचा पती तिच्या गुप्तांगाला चक्क एक छोटेसं कुलूप लावून घराबाहेर पडत होता व किल्ली सोबत नेत होता. कुलूप अडकवता यावं म्हणून त्यानं ती जागा बधिर करून तिथं ड्रिलिंग मशीननं दोन भोकं पाडली होती. तर बंगालमध्ये एका तरुणीला धाकानं अश्लील व्हिडिओत सामील होण्यास भाग पाडलं गेलं. हे चित्रण एमएमएसच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर 10 जुलैपासून ही तरुणी बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार घरच्यांनी केली आहे. नऊ वर्षांपूर्वी बिहारमधल्या (झाडखंड) सोनाली मुखर्जी या शिकणाऱ्या तरुणीला गुंड तरुण त्रास देत असत, म्हणून तिनं त्यांना समज दिली व पोलिसात जाण्याची धमकी दिली, तर तिच्यावर अॅसिड टाकून तिला अंध व विरूप करून तिलाच त्या गुंडांनी शिक्षा केली. आज ही तरुणी त्याची फळं भोगते आहे. तिच्या कुटुंबीयांना अजूनही धमक्या दिल्या जात आहेत. शिक्षणाची आवड असूनही सोनाली त्यापासून वंचित राहिली आणि सामान्य जगणंही तिला मुश्किल बनलं. तेही तिनं आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून! या प्रकारच्या घटनांना अंतच नाही असं वाटावं; इतक्या सातत्यानं स्त्रीच्या सुरक्षिततेचे व अब्रूचे धिंडवडे काढल्याच्या घटना वारंवार व सर्वत्र घडत आहेत. शासन व पोलीस यंत्रणेतील संवेदनशीलतेच्या अभावापासून राजकीय स्वार्थापायी कोणतंही टोक गाठण्याच्या प्रवृत्तीपर्यंत अनेक गोष्टींची प्रश्नचिन्हं गुवाहाटीच्या घटनेनंतर समोर आली. माध्यमांमधील चढाओढ व टीआरपी स्पर्धा यामुळं संबंधित व्हिडिओ क्लिप न दाखवण्याचा निर्णय घेण्याचा विचारही संबंधितांना शिवला नाही हेही लक्षात घेण्यासारखं आहे. फोटोग्राफर किंवा पत्रकार म्हणून काम करताना औचित्य पाळण्याची आवश्यकता असते हेही हळूहळू विसरलं जात आहे. ग्लॅमर व फॅशनच्या नावाखाली आणि सनसनीखेज निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी माध्यमांमधून अश्लाघ्य पद्धतीनं दर्शन घडवलं जातं हेही नाकारता येत नाही. म्हणूनच कुणी एक मॉडेल आपण अंतर्वस्त्रं घालत नाही, असं सांगते किंवा पूनम पांडे नावाची तरुणी भारतीय संघ क्रिकेटमध्ये जिंकला तर आपण विवस्त्र होऊन मैदानावर येऊ, असं जाहीर करते तेव्हा त्याला प्रसिद्धी दिली जाते. स्त्रीदेहाच्या व्यापाराला हा जो हातभार लागतो, त्याबद्दल कुणी बोलायचं? 

 

गाव असो की शहर, आज स्त्रियांबाबतचे अत्याचार वाढत आहेत. तसंच सामूहिक पद्धतीनं स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अगदी महाराष्ट्रातही असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. मध्यंतरी डोंबिवलीला छेडछाडीविरुद्ध तरुणांना जाब विचारणाऱ्या संतोष विच्चिव्होराला चक्क भोसकून मारण्यात आलं आणि जिची छेडछाड झाली होती, ती मुलगी त्याबद्दल पोलिसांना काहीच सांगायला तयार नाही असं घडले. दोन वर्षांपूर्वी मुंबईत अंबोली येथेही किनन सँटोस आणि रुबेन फर्नांडिस अशा तऱ्हेच्या हल्ल्याला बळी पडले होते. त्यांनीही मैत्रिणीचा विनयभंग करू पाहणाऱ्याला जाब विचारला होता. नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी सांगते की, महिलांवरील हल्ले आणि गुन्हे वाढले आहेत. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीच दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी छेडछाडीची 1000 प्रकरणे त्यांच्या विभागात नोंदवली गेली आहेत. या तऱ्हेच्या घटना का घडतात याचा समाजशास्त्रीय व मनोवैज्ञानिक शोधही घ्यायला हवा. विशेषतः अलीकडे 14-15 वर्षांची मुलंही या प्रकारच्या वर्तनाकडं वळताना दिसतात आणि हिंसा करायला मागेपुढे पाहत नाहीत, हे चिंताजनक आहे. 

 

जमावानं अत्याचार वा छेडछाड केली, तर कुणी मनात असलं तरी प्रतिकारासाठी पुढं येत नाही, ही मानसिकता गुंड प्रवृत्तीला पोषकच ठरत असते. ...आणि स्त्रीबाबत एखादा मनुष्य जरी अत्याचार वा मारहाण करताना आढळला तरी बघणारे बघतच राहतात, असंही कैकदा घडलं आहे. रस्त्यांवर पुरेसा उजेड असणं, पोलीस बंदोबस्त योग्य पद्धतीनं ठेवणं, गुंडगिरीस किंवा नशापाणी करून वाहनं चालवण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं रात्रीच्या वेळी रस्त्यांवर गस्त घालणं अशा गोष्टींचा अवलंब केल्यास घटनांना आळा बसू शकेल अथवा घटना घडलीच, तर त्यावर तातडीनं कारवाई तरी शक्य होईल. विशेषतः बलात्कार, विनयभंगासारख्या प्रसंगांची हाताळणी नीट होण्यासाठी पोलीस सेवेत महिला पोलिसांची आवश्यकता हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. 

 

गेल्या वर्षीच्या घटनेत, सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी गंभीरपणं पेलण्याबाबत आसामची पोलीस यंत्रणा कमी पडली हे स्पष्टच आहे. परिस्थिती हाताळण्यात पोलीस अयशस्वी ठरल्याची कबुली देण्याऐवजी आसामचे पोलीस प्रमुख नारायण चौधरींनी सारा प्रकार गुंडाळण्याचा प्रयत्न केला. ‘पोलीस म्हणजे काही एटीएम मशीन नाहीत, की त्यांनी तातडीनं सेवा उपलब्ध करावी,’ हे त्यांचे वक्तव्य निश्चितच आक्षेपार्ह व निषेधार्ह होतं. अशा पद्धतीच्या प्रवृत्तीमुळंच स्त्रियांसंबंधीचे गुन्हे वाढत असून ते करणाऱ्यांचा निगरगट्टपणा अधिकच दृढ बनत चालला आहे. संबंधित खटल्याचा निकाल लागला असला तरी गुन्हेगारांना मिळालेली शिक्षा जरब वाटावी अशी नाही. आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही ही शिक्षा समाधानकारक वाटलेली नाही. पोलीस हे एटीएमप्रमाणे उपलब्ध नसल्यामुळं गुन्हेगार जर ‘एटीएम’ म्हणजे ‘एनी टाइम मोलेस्टेशन’ अशी बेफाम भूमिका घेत बिनदिक्कतपणं वावरत आहेत, त्याचं काय करायचं?  

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.