EasyBlog

This is some blog description about this site

माती आणि माणसं

माणूस माझे नाव

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 3606
  • 3 Comments

दिवस नाताळाचे आहेत. हवेत गारठा आहे. खिडकीतून कोवळी उन्हं आलीयेत. टीव्हीला चिकटलेला पोरगा काही तरी खाता खाता भरभर चॅनेल्स बदलतोय. लाल डगला घातलेला, पांढऱ्या दाढीवाला सांताक्लॉज, माणसांचं जग सुखी करायला स्वर्गातून आलेले देवदूत, हॉलीवूड सिनेमांचे कॉपी केलेले हिंदी सिनेमे तुकड्या तुकड्यांनी टीव्ही स्क्रीनवरून सरकतायत. मी खिडकीतून बाहेर बघू लागतो. शाळेच्या पुस्तकातल्या नाताळाच्या गोष्टी आठवू लागतात. त्यात रशियन, जपानी, युरोपियन... सगळे देवदूत गरिबांच्या जीवनात आनंद फुलवायला आलेले असतात...

मग मी ऑफिसात येतो. माझं ऑफिस म्हणजे 'नव्या युगातलं नवं माध्यम' आहे. 'भारत4इंडिया'. टीव्ही आणि प्रिंट यांचं फ्युजन असलेलं वेबपोर्टल. शहरं आणि खेड्यांना जोडणारा मीडिया. 'एडिट बे'मधून मला वाद्यांचा फडफडाट ऐकू येतो. 'संडे शो'चं एडिटिंग सुरू असतं. मी आत डोकावतो. तो कडकडाट ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. विदर्भातले सत्यपाल महाराज दोन गुडघ्यांवर तीन, दोन हातांत दोन, आजूबाजूला दोन अशा सात खंजिरी एकाच वेळी वाजवत असतात. कौशल्य असं की, सिनेमातल्या रजनीकांतनंही कडक सॅल्यूट ठोकावा! आमचे इनपुट एडिटर विनोद राऊत विदर्भातले आहेत. ते याला 'फडफडा' भजन म्हणतात...वाजवता वाजवता बाबा थांबतात. हातातल्या खंजिऱ्या खाली ठेवतात. एक फोटो उंचावतात. मुच्छड पहिलवानी शरीराच्या माणसाचा. हे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. ते कोण होते, काय सांगत होते, हे सांगतात. पुन्हा खंजिऱ्या हातात घेतात आणि 'माणूस द्या मज माणूस द्या..'चा कल्लोळ उठवून देतात. बघता बघता तुकडोजी महाराज अंगात घुमू लागतात. त्यांच्या खंजिरी भजनाचा ठेका हृदयाच्या ठोक्यांची लय पकडतो. भजनाचा एकेक शब्द मन, मेंदूची पकड घेत जातो...

''माणूस द्या मज माणूस द्या 

ही भीक मागता प्रभू दिसला 

लोक दर्शना जाती देव दिसावा म्हणूनिया

तर देव बोले मज माणूस न दिसे

अजब तमाशा हा कसला

माणूस द्या मज...

हृदयाचा जो सरळ असे

सर्वांवरी जो प्रेम करी

कुटील नको असला तसला

माणूस द्या मज...

सगळी माणसं देवाच्या शोधात आहेत. पण महाराजांना एकदा देवच दिसला. भीक मागणारा. तो माणसांच्या जगात माणसांचीच भीक मागत होता. कारण त्यानं निर्माण केलेला, दुसऱ्याला मदत करणारा, बंधुभावानं राहणारा माणूस आता त्याला सापडतच नव्हता. 

४०च्या दशकात विदर्भातल्या अमरावतीत बसून हा राष्ट्रसंत असा माणसाचा शोध घेत होता. खंजिरी भजनांच्या अफलातून माध्यमातून माणूसपणाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवत होता. पण हा संत त्याचा विचार, त्याचं भजन, तो फॉर्म काही आपल्या सिनेमा, नाटक, कार्टूनवाल्यांना 'गावला' नाही. स्वर्गातले देवदूत दाखवणाऱ्या टीव्हीवाल्यांना तो कधी दाखवावासा वाटला नाही. असो. तर असं माणूसपण जागवणारे तुकडोजी महाराज आणि माणुसकी जपणारी माणसं आपल्या एका प्रदेशात विपुल आहेत. तो परिसर म्हणजे आपला विदर्भ. पण दुर्दैव. विदर्भ, तिथला विकास, तिथली माणसं, त्यांचं कर्तृत्व पुण्या-मुंबईसारखं प्रकाशझोतात काही येत नाही. 

आता परवाची गोष्ट घ्या. हिवाळी अधिवेशन सुरू होतं, उपराजधानी नागपुरात. तिथले आमदार बोंबलून गेले. अरे, बाबांनो आमच्या विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करा. ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अधिवेशनाचा काळ वाढवा... पण लक्षात कोण घेतो? मग त्यांनी नागपूर कराराचा दाखला दिला. 'अरे, विकासात समान वाटा देण्याच्या बोलीवर तर आम्ही मुंबईसह महाराष्ट्रात सामील झालो. नागपूर करार म्हणजे त्याचा पुरावाच.' पण पुणे-मुंबईकर अर्थात, पश्चिम महाराष्ट्रवाले हुश्शार. त्यांनी या करारात नागपुरात अधिवेशन किती दिवस होईल, याचा उल्लेखच केलेला नाही. त्यामुळं हे चाणाक्ष लोक दोन आठवड्यांतच हे अधिवेशन गुंडाळतात.

अशी कितीही उपेक्षा होऊद्यात, पण एक गोष्ट नक्की, तिथली माणुसकी जागी आहे. तिथलं माणूसपण जिवंत आहे. अगदी तोंडावरच सांगायचं म्हटलं तर या विदर्भानंच महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण केलीय.

विदर्भात स्थापत्य, साहित्य, कला, पर्यटन तर आहेच, पण जोडीला आहे ती समाजसेवा. खरं तर मराठवाडा आणि विदर्भ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असण्याचं एक मोठं कारण म्हणजे या दोन प्रदेशांवर अनेक राजवटींनी राज्यं केली. विदर्भ मुळातला सुखी, संपन्न प्रदेश. शांत, सहिष्णू, बहुभाषिक,  बहुसांस्कृतिक समन्वय घालणारा आतिथ्यशील लोकांचा प्रदेश. आपली भाषा, परंपरा, चालीरीती, नाती विदर्भातल्या माणसांनी नेहमी जपली. साधं उदाहरण आठवा. विदर्भातली माणसं आपला साग्रसंगीत पाहुणचार करतील. आग्रह करून करून जेवायला घालतील. याउलट पुण्या-मुंबईची माणसं. 'या एकदा घरी.' 'चहा घेणार का?' असं विचारतील. असो. 

वेदकाळापासून विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचे संदर्भ सापडतात. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात विदर्भातील वैदर्भी रीती हमखास दिसत होती. प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिरांचा निर्माता हेमाडपंत विदर्भातलाच. खगोलशास्त्रज्ञ भास्करभट्ट विदर्भातलाच. भवभूती विदर्भाचाच. कालिदासाचं प्रसिद्ध रामटेक विदर्भातच आहे. बौद्धभूमी, नागभूमी म्हणून तर विदर्भ प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. प्राचीन नाटय़शास्त्रानुरूप असलेलं आणि आता नामशेष झालेलं अचलपूरचं ऐतिहासिक बावनएक्का हे प्रेक्षागृह विदर्भातलंच. मुकुंदराजाची समाधी, महानुभाव वाङ्मयातले महत्त्वाचे सारे प्रसंग विदर्भातलेच. म्हणूनच बापूजी अणे विदर्भाला `आदिमहाराष्ट्र’ म्हणायचे. 

शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या विदर्भातल्या सिंदखेडच्या.

ज्यांना आज हजारो भक्त भजतात ते साईबाबा आणि गजानन महाराज, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज यांच्या परात्पर गुरू संत मायबाई विदर्भातल्याच. या महिला संताचं कर्तृत्व फारसं कधी लोकांसमोर आलं नाही.

आधुनिक काळात देशाला दिशा देणाऱ्या अनेक विभूती, त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, चळवळी विदर्भाच्या मातीनं देशाला दिल्या. विदर्भ महात्मा गांधी, विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. भाऊ दप्तरी, वा. वि. मिराशी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिवाजीराव पटवर्धन, कवी अनिल, डॉ. वि. भि. कोलते, पु. भा. भावे, मुक्तिबोध, पु. य. देशपांडे, नाना जोग, गीता साने, कुसुमावती देशपांडे, अशा कितीतरी व्यक्ती विदर्भानंच दिल्या. उद्धव शेळके, कवी ग्रेस, गझलसम्राट सुरेश भट, पुरुषोत्तम दारव्हेकर, मधुकर केचे, प्रा. राम शेवाळकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, नाटककार महेश एलकुंचवार, आशा बगे ही मंडळीही विदर्भातीलच. संगीतक्षेत्रातील डॉ. नानासाहेब मंगरूळकर, पंडित मनोहरराव कासलीकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित मनोहर कविश्वर, विद्याधर वझलवार, अरुंधती देशमुख, वसंत रानडे, नंदू असनारे, श्रीधर ढगे, डी. एम. बोधनकर, पंडित मनोहर, पद्माकर बर्वे, जे. एल. रानडे, विनायकराव अंभईकर ही सारी मंडळी विदर्भातीलच.

या व्यक्तींप्रमाणंच इथली स्थळंही प्रसिद्ध. श्री महाकाली मंदिर, श्रीक्षेत्र मार्कंडा, बीरशहाची समाधी असलेले हडवाडा, गोंडराजाचा राजवाडा, माणिकगड, बल्लारपूरचा किल्ला, चिमूरचं हुतात्मा स्मारक या ऐतिहासिक स्थळांप्रमाणंच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, ही काही शक्तिस्थळं.

अकराव्या ते सतराव्या शतकापर्यंत मराठी भाषा, साहित्य, वाङ्मय, नाटय़, खगोल, ज्योतिर्विद्या, शिल्प अशा क्षेत्रांचं नेतृत्व विदर्भानं केलंय. अठराव्या शतकानंतर ही केंद्रं मुंबई-पुण्याकडं सरकली. `जाऊन राह्यलो’, `करून राह्यलो’, `जेवून राह्यलो’ ही वैदर्भीय भाषा तर किती गोड. पुणे-मुंबईकर तिचं रूप बदलतात. तिला प्रमाणभाषेचा टाय-कोट घालतात. 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विदर्भाचं योगदान आहेच. विदर्भाच्याच ग. त्र्यं. माडखोलकरांनी  1946च्या  बेळगावच्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. समितीची स्थापनाही तिथंच केली. नंतर नागपूर कराराच्या रूपानं विदर्भाच्या तोंडाला पानं पुसली जातायत तो भाग वेगळा.

भौगेलिकदृष्ट्याही संपन्न असलेल्या या भागाचा उल्लेख पांढरपेशा लोकांनी नेहमी जंगली, आदिवासी, ग्रामीण, अनागरी, मागास, अविकसित, असांस्कृतिक असा केला. पण या विदर्भाची माणसं  आणि माणुसकीचा मोठेपणा नेहमीच छपवण्यात आला. 

अलीकडंच विदर्भ प्रकाशझोतात आलाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळं. नापिकी, कर्जबाजारीपण ही कारणं तर आहेतच. पण आणखी एक कारण काळजाला घरं पाडणारं आहे. विदर्भात बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. काहीही करून शेतकरी हा सण साजरा करतातच. या दिवशी लाडक्या बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. औत ओढून दुखावलेल्या त्यांच्या खांद्याला गरम हळद आणि लोणी लावतात. पण कर्जबाजारीपणामुळं बैल सांभाळणंही कठीण झालं. तर बैलपोळा कसा साजरा करणार? आपल्या लाडक्या बैलांसाठी तेवढंही करू शकत नाही. ही काय जिंदगी झाली? काय करायचं असं जगून?...म्हणून मग बैलपोळ्याच्या आधी काही दिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतं..!  

अशा विदर्भाचा उल्लेख पूर्ण होईल असं नाव म्हणजे आनंदवन. आणि त्या आनंदवनाचा देव म्हणजे बाबा आमटे. माणसांना आयुष्यात अनेक व्याधी होतात. त्यातही कुष्ठरोग म्हणजे रोगांचा रोग. म्हणून महारोग. अशा रोग्याला स्पर्श तर सोडाच, पण त्याचं दर्शनही नको. मग सडून सडून मरणं हेच त्याच्या नशिबात. त्यांच्यासाठी बाबा आमटे जणू देवदूतच बनले. एका कुष्ठरोग्याला पाहून बाबांना या लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छा झाली. ही इच्छा पुढं त्यांच्या जीवनाचं ध्येयच बनलं. कुष्ठरोग्यांसाठी माळरानाची सुपीक शेती केली. त्यांच्यासाठी वस्त्या उभारल्या. त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. आत्मसन्मान मिळवून दिला. हा माणूस अचाट होता. विरळा होता. कुष्ठरोग्यांसाठी या माणसानं स्वत:च्या शरीरात कुष्ठरोगाची प्रायोगिक, प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली!

सध्या राजकारण्यांना भ्रष्टचाराची खाव खाव आणि जमिनी बळकावण्याचा भस्म्या रोग जडलाय. त्यांनी जरा विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या विनोबा भावेंचं आणि बाबा आमटेंचं स्मरण करावं. भूमिहिनांसाठी विनोबांनी देशभर भूदान यात्रा सुरू केली होती. भूमिहिनांना हजारो एकर जमीन मिळवून दिली होती. या संताच्या शब्दाखातर जमीनदारांनी आपली शेकडो एकर जमीन दान केली होती. बाबा आमटेंची प्रेरणा विनोबाच होते. विनोबांच्या सांगण्यानुसार बाबांनी जंगल साफ करून शेतीत रूपांतर केलेली तब्बल ६०० एकर जमीन पारध्यांना परत केली!

आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेला वाहिलेला हा महामानव आणि त्याचं कुटुंब हे माणसांना खरीखुरी वाट दाखवणारे प्रकाशदूत आहेत. म्हणून आजच्या दिवसाच्या, बाबांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण निश्चय करूयात. समाजासाठी काही तरी छोटं का होईना काम करूयात. आता छोटं म्हणजे काय तर उदाहरणार्थ कामवाल्या मावशीच्या मुलांची शाळेची फी देणं, शेजारच्या झोपडपट्टीत जाऊन तिथल्या मुलांना लिहायला शिकवणं, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्या मुलांना वह्या-पुस्तकं देणं, किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथ आश्रमातल्या मुलांना खाऊ देणं, असं काहीही...तुम्हाला सुचेल ते. तुम्हाला सांगतो, दुसऱ्यासाठी काही तरी करण्याचे जीन्स आपल्यात असतातच. उदाहरण सांगतो, समाज दिनाला शुभेच्छा घेण्यासाठी आमचा सीनियर कॅमेरामन नवनाथ कोंडेकर जे. जे. हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडं गेला होता. लहानेंचं शूट करताना त्याला आठवला आमचा ऑफिस बॉय आकाश. (एरवी आकाश आम्हाला फक्त काही तरी काम निघाल्यावरच आठवतो.) त्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. तो लहाने नीट करू शकतात, हे नवनाथच्या मनात आलं. मी म्हणतो, हेच तर आपल्या अंगात असलेलं दुसऱ्यासाठी काही तरी करण्याचं 'जीन्स' आहे.

'भारत4इंडिया'नं त्यासाठी 'समाज दिना'ची संकल्पना मांडलीय. त्यात प्रत्येकानं सहभागी व्हावं. बाबा आमटेंनी लिहिलेलं एक गीत आहे. 'माणूस माझं नाव...' 

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव

दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...

बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर

परी जिंकले सातहि सागर

उंच गाठला गौरीशंकर

अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव...

मीच इथे ओसाडावरती

नांगर धरूनी दुबळ्या हाती

कणकण ही जागवली माती

दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव...

विदर्भाच्या मातीत आणि माणसांत असलेलं हे माणूसपण आपल्यातही रुजवूयात. आपणही 'देणारे हात' होऊयात...

 

People in this conversation

Comments (3)

  • खरोखर या लेखातून संपूर्ण विदर्भच डोळ्यासमोर उभा राहिला आहे. विदर्भ म्हणजे महान नवरत्नांची खाणच आहे हे या लेखातून अतिशय सुंदरपणे मांडण्यात आले असून त्यामुले हा लेख अधिक वाचनीय बनला आहे. पुन्हा एकदा या लेखाबद्दल तुम्हाला धन्यवाद. छान लेख आहे. मनापासून शुभेच्छा!!!!!

  • अतिशय अभ्यासपुर्ण ब्लॉग आहे, हल्ली विदर्भाचं नाव घेतल, की केवळ शेतकरी आत्महत्या, अनूशेष, सुमार राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भाचा दबलेला जयघोष एवढचं ऐकु येत आणि आठवतं...मात्र विदर्भात गाडगेबाबा, तूकडोजी महाराज ते विनोबांसारखी अनेक आभाळाहून मोठी माणसे होवून गेली. विदर्भाचा माणूस तोडानं फटकळ मात्र हृदयानं किती प्रेमळ असतो..आजचा संपुर्ण काळ बघीतला तर विदर्भाचा माणूस आपलं मोठेपण विसरला आहे, गौरवशाली इतिहास विसरला आहे, नेहमीच दुसऱ्यांना भरभरुन देणारा विदर्भ...या लेखाच्या निमीत्तानं अनेक गोष्टींना उजाळा मिळाला....

  • अतिशय सुंदर लेख...!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

'भारत4इंडिया'चे आऊटपुट एडिटर. गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत. वारकरी परंपरा. लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती ही वृत्तपत्रे तर आयबीएन-लोकमत, मी मराठी या चॅनेल्समध्ये काम. त्यापूर्वी पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. मुंबईत पत्रकारितेचं अध्यापन. 'पत्रकार अत्रे' या विषयावर पीएच. डी. 'अवघा रंग' नावाने ब्लॉगलेखन.