EasyBlog

This is some blog description about this site

अगदी मनापासून...

वंशज थिबा राजाचे

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 3909
  • 3 Comments

महाराजा, महाराणी, राजकुमार आणि राजकुमारीचा सिनेमात पाहिलेला थाट माझ्या डोक्यात होता. थिबा राजाच्या कुटुंबीयांचा थाटही मला बघायचा होता. त्यामुळं मनात उत्कंठा, उत्सुकता अशी परिस्थिती होती. शोधत-विचारत अर्ध्या तासानं या राजवंशीय लोकांचं घर मला सापडलं. पण जे जे माझ्या मनात होतं त्याविरुद्ध इथं पाहायला मिळालं. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये गाड्या धुण्याच्या एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हे राजाचे वंशज राबत होते. त्यांची अशी अवस्था बघून प्रचंड त्रास झाला मला. न राहून डोळे भरून येत होते. अंगावर शहारे येत होते. खरं तर माझा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता. पण तरीही दुःख, वेदना, आनंद या सगळ्याच भावना माझ्या मनात उचंबळून येत होत्या.

 

थोडंसं थिबा राजाबद्दल... ब्रह्मदेशाचा (म्यानमार) शेवटचा राजा थिबा... अत्यंत लोकप्रिय, कर्तृत्ववान, उच्चविद्याविभूषित आणि शत्रूशी थेट टक्कर घेण्याची धमक या राजात होती. थिबाचा धोका वेळीच ओळखून ब्रिटिश सरकारनं त्याला १८८५ मध्ये कैदी बनवलं... चलाख ब्रिटिशांनी उठावाची भीती वेळीच ओळखून या राजाला ब्रह्मदेशात न ठेवता रत्नागिरीत त्याच्यासाठी राजवाडा बांधून त्यात त्याला नजरकैद केलं. नजरकैदेत असूनही त्याच्या आवडीनिवडीचा आदर ब्रिटिशांनी राखला होता. अत्यंत निसर्गरम्य परिसरात जिथून समुद्राचं दर्शन होईल अशा टेकडीवर हा राजवाडा त्या काळी सव्वालाख रुपये खर्च करून बांधला होता. या राजवाड्यात थिबा राजा १९१० साली वास्तव्यास आला... संस्थानाच्या नव्हे तर एका देशाच्या राजाचा नजरकैदेत असतानाच डायबिटीसमुळे १९१६ साली मृत्यू झाला. ही घटना ऐतिहासिक नक्कीच आहे, त्याची तशी नोंदही झाली आहे. पण यात एका हरलेल्या राजाची आणि ब्रिटिशांनंतरच्या व्यवस्थेनं पिचलेल्या त्याच्या कुटुंबीयांची दुर्दैवी दारुण कहाणी लपलेली आहे.

 

राजाच्या याच घरात त्याच्या जाण्याआधी एका प्रेम कहाणीनंही जन्म घेतला होता. थिबा राजाची मुलगी म्हणजे फाया हिचं राजवाड्यात पहारा करणाऱ्या गोपाळ सावंतशी प्रेम जुळलं. खरं तर गोपाळ सावंतांचं आधीच लग्न झालं होतं. प्रेमात सर्व काही... जे आपण म्हणतो ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकुमारी फाया. थिबा राजा गेल्यानंतर ब्रिटिश सरकारनं त्याच्या कुटुंबीयांना ब्रह्मदेशात पाठवलं, त्यात फायाही होतीच. पण ती काही तिथं राहिली नाही. गोपाळ सावंतांच्या ओढीनं ती भारतात परत आली. तिनं खऱ्या अर्थानं तख्तो ताजला ठोकर मारून सावंतांशी आपला घरोबा केला.

 

फायाची एकमेव संतती म्हणे टुटू... टुटू ही थिबा राजाची नात. पण टुटूला इथल्या दुर्लक्षित करणाऱ्या वृत्तीला वेळोवेळी सामोरं जावं लागलं. क्षणोक्षणी तिचा अपमान होत होता. या राजघराण्याच्या वंशजांची काळजी घेण्यात भारतीय सरकार पूर्णतः अपयशी ठरलं, असं मला ठामपणं वाटतं. एखादा राजघराण्याचा वंशज किंवा थेट राजाची नात लोकांच्या घरात काम करते आहे. बदकं, कोंबड्या आणि गुरं पाळते. काय वेदना होत असतील तिला जरा विचार करा...

 

टुटूच्या नंतरही परिस्थिती जैसे थे. काहीच बदल नाही. टुटूला पाच मुलगे आणि दोन मुली झाल्या. मी सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला ते चंद्रकांत पवार एमआयडीसीत राहतात. आम्ही प्रेमानं त्यांना चंदूमामा म्हणतो. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष रत्नागिरीत येणार म्हणून मी चंद्रकांत पवारांना भेटायला गेलो. त्यांची एकंदरीत परिस्थिती पाहून मला रडूच आलं. काय या राजघराण्याच्या वंशजांची ही व्यथा. त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. सर्व्हिसिंग सेंटर काय ते उदरनिर्वाहाचं साधन. पण एक मला जाणवलं. इस बंदे मे कुछ बात है. खानदान का असर जे आपण म्हणतो ना, त्याचा प्रत्यय मला यांना बघून आला. चेहऱ्यावर तेज, कायम हसतमुख, कोणासमोरही अत्यंत बुलंद आवाजात त्यांचं बोलणं. क्या बात है, मजा आ गया. मला क्षणोक्षणी असं जाणवत होतं की, मी राजासमोरच आहे. मनाचा राजा, वृत्तीनं राजा आणि थिबा राजालाही खऱ्या अर्थानं अभिमान वाटेल असाच त्यांचा अविर्भाव.

 

मला आज बरं वाटतंय की, पत्रकारितेत असल्यामुळं मला या लोकांशी बोलता आलं, त्यांच्या व्यथा जाणून घेता आल्या. राजाच्या कुटुंबीयांकडूनच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या गोष्टी ऐकल्यानंतर अधिकच त्रास होतो. मायबाप सरकारनं या घटनेकडं जरा गांभीर्यानं पाहावं, असंच मला वाटतं. फक्त एखादा राष्ट्राध्यक्ष येतो आहे, म्हणून त्याची दखल घेऊ नका, तर इतर वेळीही त्यांच्याकडं लक्ष द्यावं एवढंच मला वाटतं.

People in this conversation

Comments (3)

  • खूपच छान..

  • Very nice-Mushtaq, you are a genuine person, so story naturally reflect as pure as it is..keep it up..but I want to know just one question that why you just left the IBN Lokmat channel..? Any injustice happen to you at the place..as I guess, it should had..anyways-keep fighting till u won the battle..
    Jai Ali....

  • या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांनी रत्नागिरी येथे समुद्र किनारी मोठ्या डौलात उभ्या असलेल्या थिबा राजवाड्याला भेट दिल्यानं थिबा राजवाडा पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. या राजवाड्यात ब्रह्मदेशाच्या तत्कालीन शूर व कर्तृत्व थिबा राजाला ब्रिटीशानी बंदीवासात ठेवलं होतं. एखाद्या घरातील कर्ताधर्ता पुरुष इहलोकी गेल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियाची काय अवस्था होते,याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे थिबा राजाचे वंशज. राजाचे वंशज असूनही आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. त्याना मदतीची खूप गरज आहे. त्यांचा मान राखला जावा. रत्नागिरी येथेच शिवाजीनगर भागात असलेल्या थिबाचे थडगे गेल्या महिन्या पर्यन्त दुर्लक्षित होते. त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रत्नागिरित यायचे म्हणून त्या थडग्याची युद्धपातलीवर रंग रंगोटी करण्यात आली. एक सार्वभौम देशाच्या राजाच्या थडग्याची अशी हेटाळणी होत असेल तर, हे अनाकलनीय आहे. थिबाचे वंशज आज अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठित असून सरकारने न मागता त्यांचा यथोचित असा सन्मान राखला पाहिजे. रत्नागिरितच राहिलेल्या राजकुमारी फाया व तिची मुलगी टूटू या दोघीनी थिबा राजाच्या पश्चात जे काही भोगले, त्याची कल्पना करवत नाही. टूटूला दिगंबर,श्रीकांत,चंद्रकांत,सुरेश व नारायण ही पाच मुले आणि प्रमिला व सुनंदा अशा दोन मुली. पैकी प्रमिला,दिगंबर,सुरेश आज हयात नाहीत. नारायण अविवाहित आहे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

पत्रकार म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ मुंबईत काम. टीव्ही चॅनेलमध्ये अँकर, तसंच प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव. कविता सादरीकरणाचा छंद. सध्या `भारत 4इंडिया`चे रत्नागिरी ब्युरो चीफ म्हणून कार्यरत.