EasyBlog

This is some blog description about this site

इतिस्त्री

महिला सुरक्षेचं भीषण वास्तव

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1606
  • 1 Comment

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निंदनीय घटनेनंतर या देशात महिलांच्या आयुष्याचे पदोपदी निघणारे धिंडवडे पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहेत. शिवाय महिलांच्या संदर्भात अत्यंत असंवेदनशील आणि निषेधार्ह मतं मांडणाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. बलात्काराच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांना योग्य पद्धतीनं प्रतिसाद न देण्याची चूक सरकारनं केली आणि विरोधी पक्षांनीसुद्धा या घटनेचा राजकारण करण्यासाठी वापर केला.

 

त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि पश्चिम बंगालमधून खासदार म्हणून निवडून गेलेले अभिजित मुखर्जी यांनी या आंदोलनात सामील झालेल्या महिला फॅशन करतात आणि मेकअप करून वावरतात, अशी अश्लाघ्य शेरेबाजी केली व आपली विशिष्ट मनोवृत्ती प्रकट केली. ही वैचारिक दिवाळखोरीच आहे. त्यांच्या बहिणीनंच त्यांच्या वतीनं माफी मागून एक प्रकारे त्यांना त्याबद्दल चपराक लगावल्यानंतर, आपले शब्द मागे घेत त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल संबंधितांची माफीही मागितली. एवढं पुरेसं झालं नाही म्हणून की काय, अनिस उर रहमान या बंगालमधल्याच सीपीएमच्या आमदारानं, ममता बॅनर्जींनी महिन्याभरापूर्वी बलात्कारास बळी पडलेल्या महिलेस 20 हजार रुपये देण्याच्या घोषणेचा संदर्भ घेऊन, ‘ममता या बलात्कार करून घेण्यासाठी किती शुल्क घेतील’, असा अत्यंत गर्हणीय आणि बेजबाबदार प्रश्न जाहीर सभेत विचारला. त्यांनाही त्याबद्दल माफी मागणं भाग पडलं. इतकी गंभीर आणि चिंताजनक घटना घडलेली असताना जबाबदार पदावर वावरणाऱ्यांनी अशा तऱ्हेचं वर्तन करावं हे खरोखरच अधिक गंभीर व चिंताजनक आहे.

देशात दिल्ली बसकांडानंतर निषेधाचा आगडोंब उसळला आणि लोक, ज्यात तरुण व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याविरोधात रस्त्यावर उतरले. बलात्काऱ्यांवर तातडीनं कारवाई झाली पाहिजे, या मागणीबरोबरच, बलात्कारासाठी फाशीची शिक्षा असावी, बलात्कारी पुरुषाचा लिंगविच्छेद करावा, तुरुंगवास दिल्यास ती आमरण जन्मठेप असावी, बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयांमध्ये चालवले जावेत, चौकशी व तपासणी महिलांमार्फत व्हावी, अशा अनेक सूचना व मागण्या पुढे आल्या. यापूर्वीही या संदर्भात वेळोवेळी अशा मागण्या होत आल्या आहेत, पण यावेळी अधिक उलटसुलट चर्चा होते आहे. एक तर ज्या प्रकारे या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला व त्यानंतर तिच्या शरीराचे जे हाल करण्यात आले, ते पाहता दोषींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी सार्वत्रिक भावना होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. खरं तर बलात्कार हा गुन्हाच असा क्रूर आहे, की त्याबद्दल कशीही आणि कितीही शिक्षा झाली तरी ती कमीच वाटावी. पण केवळ भावनेच्या भरात वाहून जाऊन कायद्याची भाषा करता येत नाही. खुनासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. त्यामुळं बलात्काऱ्याला सरसकट फाशी सुनावल्यास, पुरावा नष्ट करण्यासाठी बलात्कार करून खून करण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे, असं मत न्यायक्षेत्रातील जबाबदार व्यक्तींनीही बोलून दाखवलं आहे. खुनासाठी व बलात्कार तसंच बलात्कार करून खून करण्यासाठी एकाच तऱ्हेची शिक्षा देणं म्हणूनच योग्य ठरणार नाही. कारण बलात्कारी मनुष्य त्यानंतर खून करण्यास उद्युक्त होईलच होईल.

आपल्याकडं याआधी बलात्कारी व्यक्तींना फाशी सुनावण्याच्या घटना घडल्या आहेत, पण त्यांच्या फाशीला राष्ट्रपतींकडून दया दाखवून माफीही मिळाली आहे. पाचात केवळ एकालाच फाशी झाली आहे. तशा तर बलात्काराच्या सर्वच घटना तितक्याच निंदनीय आणि भयंकर असतात. मात्र अनेकदा बलात्कारानंतर संबंधित स्त्रीची अधिकच दारुण अवस्था केली जाते, जशी दिल्ली बसकांडात केली गेली. तिची आतडी जवळजवळ खलास करण्याचं अघोरी व हिंसक कृत्य करण्यात आलं. किंवा खूपदा या हिंसेनं जबरदस्त मानसिक धक्का बसून बलात्कारित स्त्री कोलमडून पडते आणि तिची अवस्था पालापाचोळ्यासारखी होते; जशी अरुणा शानभागची झाली.

अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला फाशी अथवा आमरण जन्मठेप देणंच योग्य ठरावं. सरसकट फाशीऐवजी, असे काही निकष लावण्याचा निर्णय घेता येईल. त्याचबरोबर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवणं, दोषींची जन्मठेपेची शिक्षा पॅरोलविना व सक्त मजुरीची असणं अशा तरतुदी करता येतील. तसंच अशी प्रकरणं हाताळताना हयगय किंवा दडपेगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास, डॉक्टरला वा वकिलाला दोषी मानलं जाऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी. बाधित स्त्री व तिच्या कुटुंबीयांना त्वरेनं भरपाई मिळावी. बलात्कार हा मानवतेविरोधातला गुन्हा मानला जावा, कारण स्त्रियाही माणूस असतात आणि त्यांच्यावरील अत्याचार ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे. स्त्रीदेहाचा व्यापार करून भारतातील सेक्स टुरिझमचं आमिष जगभरातील पर्यटकांना दाखवू पाहणाऱ्यांना वठणीवर आणावं. स्त्री-अत्याचाराला आळा घालण्यासाठी व स्त्री-सन्मानाच्या जपणुकीसाठी अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. मुख्य म्हणजे शिक्षेचं स्वरूप काहीही ठरो, पण गुन्हेगाराला निश्चितपणं शिक्षा ही व्हायलाच हवी. तो सुटता कामा नये. कठोरात कठोर शिक्षा (फाशी वा आमरण जन्मठेप) देण्याची भाषा केली की, शिक्षेमुळं गुन्हे पुन्हा घडायचे थांबत नाहीत, असा युक्तिवाद नेहमी केला जातो. पण शिक्षेमुळं इतरांना जरब बसेल न बसेल, मात्र केलेल्या कृत्याबद्दल त्या कृत्याच्या भीषणतेचा विचार करून, संबंधित व्यक्तीला त्या प्रमाणात कठोर व योग्य ते शासन हे झालंच पाहिजे, हे तत्त्व सर्वतोपरि राहायला हवं.

अलीकडं जो क्षोभ उसळला, त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांबाबत होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसेचा पुनर्विचार करून त्यासंदर्भातील हाताळणी परिणामकारक कशी करता येईल यावर विचारमंथन व कृती करण्याच्या दिशेनं पावलं पडण्याची आशा तर निर्माण झाली आहे. मुळात स्त्रियांबाबत होणारी हिंसा ही ज्या समाजाच्या धारणांमधून जन्म घेते तिचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. जेव्हा स्त्री थोडा जरी मोकळेपणा दाखवते किंवा स्वातंत्र्य घेऊ बघते, तेव्हा अनेकदा समाज तीव्र व काहीशी हिंस्र प्रतिक्रिया देतो, हे थांबलं पाहिजे. तसंच स्त्रियांच्या पेहरावावर, फॅशनवर बोट ठेवून, त्या असे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात, कारण त्यामुळे पुरुषांच्या वासना चाळवल्या जातात असं सुचवलं जातं, तेही थांबलं पाहिजे. कारण अंगभर कपडे घातलेल्या, साध्या कपड्यात वावरणाऱ्या तरुणींवर, मध्यमवयीन वा वृद्ध स्त्रियांवर, इतकंच नव्हे तर अपंग, असहाय तरुणींवर किंवा अगदी बाल्यावस्थेतील मुलींवरही बलात्कार होताना दिसतात. शिवाय अशा प्रकारे बोलणारे अत्याचार घडल्याचा दोष स्त्रियांच्याच माथी मारत असतात, ते वेगळंच.

स्त्रीला वस्तू बनवणारी, तिला उपभोगाचं साधन समजणारी आणि तिच्यावर पुरुषाचा हक्क असतो असं त्याच्यावर लहानपणापासून बिंबवणारी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. चित्रपटांमधूनही तरुणींची छेडछाड करणारा नायक नायिकेला पुढे जिंकून घेतो असं दाखवतात, त्यातून छेडछाड करणं मुलींना आवडतं हा संदेश दिला जातो. चुकीच्या रोमँटिक कल्पना समाजात रुजवल्या जातात आणि तसं न वागणं हे मर्दुमकीच्या विरोधात आहे, अशी भावना करून घेऊन काही तरुण वागतात. एकतर्फी प्रेमातून सुडानं मैत्रिणीवर अॅसिड हल्ला करणं, आपल्याला प्रतिसाद न देणाऱ्या तरुणीला संपवणं, कधी असे हल्ले करून स्वतःलाही मारून घेणं असे अनेक प्रकार सध्या वाढले आहेत. हे सारे गुन्हेगारीतच मोडतात. शिवाय त्यात एक तऱ्हेचं मानसिक दौर्बल्य व विकृतीही आहे. असे मनोरुग्ण समाजात असणं हे निरोगीपणाचं लक्षण नाही, याचाही विचार व्हायला हवा. एकीकडे कायदा असून त्याचा धाक नाही आणि दुसरीकडं समाजाची मानसिकता स्त्रीकडं निखळपणं, सन्मानानं बघण्याची नाही, अशी दुहेरी घातक परिस्थिती या देशात सध्या आहे.

इतकंच काय, या घटनेतल्या मुलीला रात्री दहा वाजता घराबाहेर राहण्याची गरज होती काय, असा सवाल मध्य प्रदेशातील अनिता शुक्ला या कृषिवैज्ञानिक महिलेनं स्त्रियांबाबतच्या संवेदनशीलतेवर बोलताना उपस्थित केला. शिवाय पुढे जाऊन या बाई असंही म्हणाल्या, "सहा बलात्कारी समोर ठाकले असताना या मुलीनं त्यांना शरण जायला हवं होतं. तिनं इतका विरोध केला नसता तर तिची आतडी खेचून काढण्यापर्यंत मजल गेलीच नसती.” आता स्त्रियाच जर अशी धारणा पसरवणाऱ्या असतील तर अधिक काय बोलावं? ‘बलात्कार होत असताना तुम्ही विरोध करू शकत नसाल, तर त्याचा आनंद लुटा,’ अशा तऱ्हेचे असंवेदनशील विनोद(?)ही प्रसृत झाले आहेत. अशा विकृतीला पायबंद बसणंही तेवढंच महत्त्वाचं ठरावं.


या घटनेनंतर ठिकठिकाणच्या तरुणींच्या व स्त्रियांच्या अनुभवांबद्दल अधिक बोललं जाऊ लागलं आहे. त्यातून समाजात कशा प्रकारचं वर्तन होत असतं हे समजून येतं. स्त्रियांबाबतच्या क्रौर्याला तर सीमाच नाही. भररस्त्यात, एकट्या वा इतरांच्या सोबतीत असलेल्या स्त्रीला, लहान मुलीला कशा प्रकारे सतावणुकीस, शारीरिक अंगविक्षेपास, शारीरिक हाताळणीस, विनयभंगास किंवा बलात्कारास सामोरं जावं लागतं याच्या कहाण्या घरोघरच्या पोरीबाळी अनुभवत असतात. मुंबईसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरातही स्त्रियांना सुरक्षित वाटत नाही, हे सत्य आहे.

अलीकडंच अक्षरा या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून बाहेर आलेली आकडेवारी आणि अनुभव यावरच बोट ठेवणारे आहेत. मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला व मुलींना शेरेबाजी नित्यनेमानं ऐकावी लागते. फलाटावर महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या अंगचटीला जाण्याचे प्रयत्न नेहमी होत असतात. अनेकदा मुलांची वा पुरुषांची टोळी ठरवून हे प्रकार करते. रात्री किंवा निर्मनुष्य जागी दिवसाही महिलांना असुरक्षित वाटतं. भरगर्दीतही फार काही वेगळी स्थिती नसते, कारण उघड त्रास दिला तरी कोणी मदतीला धावून येत नाही किंवा गुन्ह्याच्या संदर्भात साक्ष द्यायलाही तयार होत नाही. मुंबईत अशी स्थिती असेल, तर लहान शहरांतून वा ग्रामीण भागांतून काय वास्तव असेल, याची कल्पना सहज येऊ शकते.

असा त्रास देणारे हे करू धजतात, कारण आपला हा हक्कच आहे असं त्यांना वाटत असतं. त्यांची मानसिकता बदलणं व त्यासाठी समाजाच्या हाडीमासी खिळलेल्या स्त्रीविषयक दृष्टिकोनात बदल घडणं आवश्यक आहे. स्त्रीचा विनाकारण ऊठसूट अपमान करण्यापासून तिला अकारण कमी लेखण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी ही स्त्रीबाबत होणारी हिंसाच आहे. बलात्कार हे अशा हिंसेचंच एक टोकाचं व अत्याचारी स्वरूप आहे. त्याचबरोबर, बलात्कारित स्त्री ही दयनीय बनते, तिचे सर्वस्वच संपतं, अशी मानसिकताही फेकून देणं आवश्यक आहे. बलात्कार हा गुन्हा आहे, पण त्याची आठवण वा जाग बळी स्त्रीच्या मनात का म्हणून जळत राहावी? ओझं कायम का वागवावं? ती काही गुन्हेगार नसते, उलट ती गुन्ह्याची बळी असते. बलात्काराभोवती समाजानं जो बाऊ उभा केला आहे तो दूर झाला पाहिजे. अशा घटनेला सामोरं जायला लागलेल्या स्त्रीला त्यानंतर मानसिक त्रास कसा होणार नाही हे पाहिलं पाहिजे. तिचा अपमान व अवहेलना होता कामा नये. तिनं गप्पही राहता कामा नये. अनेक घटना दाबून टाकल्या जातात, त्यांची नोंद करायला कुणी पाऊल उचलत नाही, यामागे संबंधित स्त्रीला होणारा त्रास कारणीभूत असतो. दुसऱ्या कोणत्याही स्त्रीइतकाच सन्मान तिलाही मिळणं हा तिचा हक्क आहे, हे समाजानं मान्य केलं पाहिजे. त्यासाठी अशा स्त्रीनं स्वतःला तसं मानलं पाहिजे. तिनं आत्मविश्वास गमावता कामा नये, यासाठी तिच्या पाठीशी इतरांनी उभं राहायला हवं. किंबहुना, आपला अपमान करू बघणाऱ्याला तिनं उलट जाब विचारला पाहिजे. तो तर तिचा हक्कच आहे.

People in this conversation

Comments (1)

  • नंदिनी ताई, तुम्ही लिहलेला हा लेख खरच विचार करायला लावतो. समाजात अगदी हाच पुरुषी अहंकार ठिकठिकाणी दिसून येतो. पण आता बास…. खुप सहन केल आपल्या पोरीबाळींनी आता यावर मार्ग निघालाच पहिजे. कोणत्याही किमतीत ….

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.