EasyBlog

This is some blog description about this site

रंग हृदयाचे...

वेळ काढावा लागतो, तो मिळत नाही

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2947
  • 1 Comment

आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही करायचं असतं, परंतु दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत आणि पैसे कमवण्याच्या पाठीमागं अनेक गोष्टी आपण करायच्या सोडून देतो. विद्यार्थी दशेतसुध्दा अनेक गोष्टी आपण पुढे नोकरी लागल्यावर करूयात असा विचार करून आपण खूप काही गोष्टी करायच्या ठरवतो आणि नोकरी लागल्यावर ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्याच विसरून जातो आणि पुन्हा मग आपल्या भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमानसुध्दा घालवतो. हे प्रत्येकाचं होत असतं. परंतु आपला आज किती महत्त्वाचा आहे आणि आपण पाहिलेली स्वप्नं आपल्यासाठी, आपल्या खुशीसाठी किती आवश्यक आहेत हे आपल्याला कळतच नाही.

काही महिन्यांपूर्वी पाहिलेला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट आठवला. एक दर्जेदार आणि अनेक प्रश्नांची उकल करणारा हा चित्रपट होता. चित्रपट आपल्याला काय शिकवतील हे कोणीच सांगू शकत नाही. मला हा चित्रपट पाहायचा होता, परंतु नेहमी काही ना काही अडचण येत होती. अनेकांना विचारल्यानंतर शेवटी लॅपटॉपवर हा चित्रपट पाहण्याचा ठरवला आणि पुन्हा एकदा चित्रपटातून काही तरी शिकण्याची संधी मिळाली.
आपल्या दैनंदिन जीवनात वेळ मिळत नाही म्हणणारे अनेक लोक मिळतील, परंतु त्यांना हे माहीत नाही की, वेळ कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो. वेळेचं नियोजन आणि आपल्या आवडीनिवडी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण नुसतं काम काम आणि फक्त काम एवढंच करत असतो. मित्रमैत्रिणींचा फोन आल्यावर त्यांना वेळ नाही, खूप काम आहे, जमणार नाही, अशा अनेक सबबी त्यांच्यासमोर मांडत असतो. परंतु असं करत असताना मला 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील एका दृष्याचं इथं उदाहरण द्यावंसं वाटतं. हे संवाद अगदी अचूक आहेत असं नाही, परंतु तो मला तो सीन महत्त्वाचा वाटतो म्हणून मी तो सांगतो...

दृष्य काहीसं असं आहे, इथं त्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचं सबमिशन वेळेवर पूर्ण होत नाही आणि तो मुलगा त्यांच्या प्राचार्यांना व्ही. सहस्त्रबुध्दे (बोमन इराणी) यांना विनवणी करतो की, मला अजून थोडा वेळ पाहिजे. मी परीक्षेनंतर दोन महिने कॉन्सेंट्रेशन करू शकलो नाही. तेव्हा प्राचार्य म्हणतात की, तू दोन महिने जेवण सोडलं का, आंघोळ सोडली का... मग सबमिशनसाठी वेळ कशाला देऊ...
हा संवाद वरवर पाहिला तर अगदी साधा संवाद वाटेल. परंतु नीट विचार केला तर खरंच आपण एवढे बिझी असतो, वेळ नाही असं इतरांना सांगत असतो. पण ते खरंच बरोबर असतं का? खरंच आपण आपल्या कामासाठी आपल्या जेवणाचा वेळ, झोपण्याचा वेळ, दैनंदिन गरजांचा वेळ हा वापरतो का... नाही ना.. याचा अर्थ असा की, आपल्याकडं वेळ असतो. फक्त आपण तो काढत नाही.

नीट विचार केला तर आपण उगाच दाखवत असलेल्या व्यस्तपणामुळं आपल्या आयुष्यातील अनेक अनमोल क्षण गमावत असतो. हे क्षण कितीही पैसा मोजले अथवा वेळ गेल्यानंतर आपण कितीही वेळ या क्षणांकरता मोजले तरी ते क्षण पुन्हा येत नाहीत. त्यामुळं आपण वेळातून वेळ काढून आपल्याला जे काही करायचं आहे, जे करावंसं वाटतं त्या गोष्टी करायला हव्यात. कारण हे जीवन एकदाच मिळतं आणि वेळ कोणासाठीच थांबत नसते. त्यामुळं प्रत्येक क्षण जगण्यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे.

जिंदगी ना मिलेगी...मध्येसुध्दा अशा अनेक प्रश्नांची उकल होते. आपण जीवनात ज्या गोष्टींना घाबरतो आणि ज्या गोष्टी आपण कधीच केल्या नाहीत त्या करण्याचं धाडस करणं आणि जीवनातील प्रत्येक क्षण जगणं किती सुखदायी, आनंद देणारं आहे याची अनेक उदाहरणं या चित्रपटात आहेत. आज हा चित्रपट पाहिल्यानंतर जीवन जगण्याकडं पुन्हा एकदा एका वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची वेळ आली आहे, असं वाटतं.

जाता जाता पुन्हा एका चित्रपटातील संवाद मला इथं सांगावासा वाटतो... राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील हा संवाद खूप छोटा आहे, परंतु त्या संवादातून जे व्यक्त होतं त्यासाठी एक कादंबरीसुध्दा कमी आहे. तो संवाद काही असा आहे... ''जिन्दगी बडी होनी चाहीये लंबी नही''
जिन्दगी ना मिलेगी दोबारामधील कविता...
दिलो में तुम अपनी बेताबीयाँ लेके चल रहे हो..
तो जिन्दा हो तुम!
नजर में ख्वाबों की बिजलीयाँ लेके चल रहे हो
तो जिन्दा हो तुम!
हवा के झोंको के जैसे आझाद रहना सिखो
तुम एक दरिया के जैसे, लहरों में बहना सिखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हल एक पल एक नया समा देखीये

जो अपनी आखोंमे हैरानिया लेके चल रहे हो
तो जिन्दा हो तुम
दिलो में तुम अपनी बेताबीयाँ लेके चल रहे हो..
तो जीन्दा हो तुम!

People in this conversation

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.
`भारत4इंडिया`मध्ये असोसिएट एडिटर म्हणून कार्यरत. गेली वर्षे वेबपत्रकारितेत. कथा, कविता, फोटोग्राफी आदी विषयांवरील  ब्लॉगचं लिखाण, संपादन. सकाळ, एकमत या दैनिकांच्या वेब आवृत्यांमध्ये काम. ई-साहित्य प्रतिष्ठानतर्फे ग्रासरूट कॉमिक्स या चळवळीतील 'स्त्री-भ्रूणहत्या' या ज्वलंत विषयावर कॉमिक्स ई-पुस्तक प्रकाशित.