EasyBlog
This is some blog description about this site
मीडियावारी
मराठी पत्रसृष्टीचे जनक
- Font size: Larger Smaller
- Hits: 3565
- 3 Comments
६ जानेवारी १८३२ हा दिवस मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी महत्त्वाचा दिवस होय. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षर लिहिलं.
भारतात वृत्तपत्राची सुरुवात १७८० मध्येच झाली. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 'बेंगाल गॅझेट' नामक वृत्तपत्र सुरू करून भारतीय वृत्तपत्रसृष्टीचं जनकत्व मिळवलं. तथापि महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्राची सुरुवात होण्यास १८३२ साल उजाडावं लागलं. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केलं आणि या दिवसापासून मराठी वृत्तपत्र सृष्टीत चढत्या क्रमानं वृत्तपत्रांची सुरुवात झाली.
मराठी वृत्तपत्राचा उगम
समाजात जसजशी प्रगती होत गेली तसतसं नवीन मूल्य अंगीकारणं सुरू झालं. शिक्षणाबरोबरच जिज्ञासा जागृत झाली. ही दृष्टी व्यापक होऊन आपल्या गावाबाहेर, देशाबाहेर जाऊ लागली. साहजिकच पाश्चात्त्य ज्ञान आणि समाज यांचा विद्या, परंपरा आणि समाजाबरोबर तौलनिक अभ्यास करणं सुरू झालं. यामधून आपल्या परंपरेत असणारे काही दोष स्पष्ट झाले. समाजातील वैगुण्य नजरेआड करता येणं शक्य नसल्यानं नवीन विचारांचा स्वीकार करणं स्वाभाविकच ठरलं. परिणामी नव्या विचारांचा स्वीकार करण्यासाठी साधनांचा शोध होऊ लागला आणि वृत्तपत्र हे साधन म्हणून वापरण्याचा विचार पुढे आला. भारतीय लोकांनी वृत्तपत्र व्यवसायाला हात घातला तो विचारप्रसाराचं साधन म्हणून आणि समाजातील दोषांची जाणीव होऊन ते दोष नष्ट करण्याच्या ऊर्मीतूनच मराठी पत्रसृष्टी उगम पावली.
'दर्पण'ची सुरुवात
पेशवाईनंतर महाराष्ट्रात ब्रिटिश राजवट सुरू झाली. ब्रिटिश राजवटीच्या पहिल्या दोन दशकांत प्रसिद्धी पावलेल्या लोकांमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या नवीन शिक्षणक्रमाप्रमाणं शिक्षण घेतलं होतं. पाश्चात्त्य विद्येचा परिणाम होऊन स्वकीयांना त्याचं ज्ञान करून देण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र काढलं, ते ‘दर्पण’ होय. 'दर्पण'चा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी निघाला. ‘स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि कल्याण याविषयी स्वतंत्रतेने, उघडरीतीने स्थळ व्हावे’ असा स्पष्ट उद्देश त्यांनी 'दर्पण'च्या पहिल्याच अंकात उदधृत केला होता. ‘दर्पण’ काढण्यापूर्वी त्यांनी ज्ञानभांडारातील मिळेल तेवढं ज्ञान संपादन केलं. जांभेकरांनी नऊ भाषांचा अभ्यास केला. भाषाशास्त्र, इतिहास, पदार्थ विज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र आणि गणित यापैकी बहुतेक विषयांवर त्यांनी लिखाण केलं.
भाषा प्रभुत्वाची छाप
‘दि बॉम्बे टाईम्स अॅण्ड जर्नल ऑफ कॉमर्स’ तसंच ‘ज्ञानोदय’ इत्यादी वृतपत्रांनी जांभेकरांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखांतून त्यांच्या विद्वत्तेची साक्ष पटते. डॉ. विल्सन यांनी आपल्या ‘हिंदू लोकांच्या जाती’ या पुस्तकात जांभेकरांविषयी ‘जांभेकर हे एक अतिविख्यात आणि नामांकित विद्वान होऊन गेले. ते एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापकांच्या जागेवर होते,’ असं लिहिलं आहे. निबंधमालाकारांनी विशाल बुद्धीचा सिद्ध विद्वान असं नामाभिधान केलं आहे. ‘एडिंवरो रिव्ह्यू’ या त्रैमासिकात आपले लेख लिहून जांभेकरांनी आपल्या प्रभुत्वाची छाप पाडली होती.
शिक्षक ते पत्रकार
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जांभेकर यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून त्यांनी आपल्या अध्ययनाला अध्यापनाची जोड दिली. विविध भाषांतील ज्ञान त्यांनी भाषांतरित केलं. समाजरक्षण केलं. ते ज्या शिक्षण संस्थेत होते तिथं त्यांनी वक्तृत्व मंडळ सुरू केलं. शिवाय नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ज्ञानलालसेतून आणि अध्यापक वृत्तीतून त्यांचा वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश झाला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचा त्यांनी पाया घातला.
‘दर्पण’ हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोज शुक्रवारला सु्रू झालं, प्रथम ते पाक्षिक होतं. नंतर ४ मे १८३२ रोजी त्याचं साप्ताहिकात रूपांतर झालं. ‘दर्पण’च्या अंकाचा आकार १९ बाय ११ इंच एवढा होता. त्यात दोन कॉलम आणि आठ पानं असत. ‘मॅसेंजर प्रेस क्र. १’ काळबादेवी इथून ‘दर्पण’ निघत असे. ‘दर्पण’ची त्रैमासिक वर्गणी सहा रुपये होती. दर शुक्रवारी अंक प्रकाशित होत असे.
‘दर्पण’ मराठी आणि ब्रिटिश अशा दोन भाषेत निघत असे. ब्रिटिश आणि मराठी या दोन्ही भाषा जाणणाऱ्यांना उपयोग व्हावा, असा उद्देश्य त्यामागे होता. दर्पणची इंग्रजीची बाजू बाळशास्त्री सांभाळत. संपादक म्हणून कागदोपत्री त्यांचंच नाव आढळतं. ‘प्रभाकर’चे संपादक भाऊ महाजन यांचं जांभेकरांना सहाय्य होत असे. याच दरम्यान बंगालमध्ये 'समाचार दर्पण' हे गुजराती साप्ताहिक दर्पण सुरू झालं. परंतु नव्याचा हा योगायोग नसून अनुकरणाचा प्रकार असावा, असं मत आहे. ही दोन्ही वृत्तपत्रं १८१८ आणि १८३२ मध्ये सुरू झाली होती.
जस्टिस ऑफ द पीस
आधुनिक जगाची माहिती समाजाला करून देणं हे ‘दर्पण’चं उदिष्ट होतं. ‘दर्पण’मध्ये राजा राममोहन रॉय यांच्या कामगिरीवर लेख, मुत्सद्दी आणि न्याय खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रजा, नेमणुका यांची माहिती, परदेशातून येणाऱ्या इसमांची माहिती आणि परदेशी वृत्तपत्रांतील बातम्यांचा उल्लेख असे. वैज्ञानिक घडामोडी, स्त्री शिक्षण, विधवा विवाह इत्यादी सामाजिक विषयांचा प्रवेश त्यात होता. ‘दर्पण’ आठ वर्षं चाललं आणि १८४० मध्ये बंद पडलं. जांभेकरांच्या संपादन आणि दिग्दर्शनाखाली वाढलेल्या ‘दर्पण’ला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळाली होती. तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स कार्नाक यांनी जांभेकरांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही पदवी दिली ती केवळ ‘दर्पण’च्या यशामुळंच होय.
शेतकऱ्यांविषयी आस्था
‘दर्पण’ पत्रामध्ये जातपातविरहित लिखाण झाल्याचं दिसतं. नाटय आणि कला या मनोरंजनात्मक विषयाला स्थान होतं. याशिवाय बाळशास्त्री जांभेकरांना शेतकऱ्यांविषयी आस्था वाटे. शेतकऱ्यांची स्थिती त्या काळीही जेमतेमच होती, म्हणूनच ‘शेतकरी लोकांस सरकारचे उत्तेजन?’ या लेखात त्यांनी शेतकरी लोक दारिद्र्यात निमग्न आहेत असं मत व्यक्त केलं. शासनास त्यांनी सुधारित बी-बियाणं आणि खर्चापुरता पैसा देण्याचं सूचित केलं. ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांनी कापूस, साखर, रेशीम, तंबाखू यासारख्या बागायती पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसं देण्याचं जाहीर केलं होतं. त्यावरून त्यांच्या या योजनेवर भाष्य करताना जांभेकरांनी आपलं मत मांडलं होतं. शेतकऱ्यांना अशा सोयी-सवलती दिल्यास देशाचा महसूल वाढेल आणि जनतेचंही कल्याण होईल, असं ते म्हणतात. अमेरिकेतून कापसाचं नवं बी-बियाणं आणून ते शेतकऱ्यात वाटण्याचा उपक्रम त्यावेळी ब्रिटिश सरकारनं केला होता याचीही माहिती ‘दर्पण’मध्ये आढळते.
कलोपासक
शास्त्रीजींचं नाट्यप्रेम अपार होतं. सर्व समाजाला आनंद मिळवण्यासाठी आधुनिक नाटक शाळांचा प्रसार झाला पाहिजे, असं त्यांनी एका लेखात म्हटलं आहे. मात्र, तमाशा या कलेविषयी हा गुलामगिरीचा एक प्रकार आहे, असा परखड लेख लिहिला. नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या कसबिणींची स्थिती सुधारावी तसंच अनिष्ठ, अनीतिमान गोष्टीला आळा बसावा, असं त्यांनी अत्यंत तळमळीनं नमूद केलं आहे. तमाशाला जाणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याचा त्यांनी एका लेखात खरपूस समाचार घेतला आहे. आज वृत्तपत्राचा एवढा विकास झाला तरीही त्यांचे हे विचार प्रासंगिक वाटतात.
विद्या हेच बळ
या देशातील विद्वान लोकांनी न्याय आणि वेदांत या शास्त्राकडे जेवढं लक्ष दिलं तेवढं उपयोगी कलाकौशल्याकडं दिलं नाही, अशी खंत ‘विद्या हेच बळ’ या लेखात जांभेकरांनी व्यक्त केली आहे. शिक्षणाचे व्यवहारात उपयोग कसे होतात, ते शिकावे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. मुंबई परिसरात असणाऱ्या शाळा आणि त्यामधून शिकणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्याकाळी साऱ्या बॉम्बे प्रेसिडेन्सीत मिळून अवघी तीन हजार मुलं शिकत होती. काळ बदलला तरी आदिवासी क्षेत्र आणि शिक्षणाचा अभाव असणारा फार मोठा वर्ग अद्यापही आहेच आहे. व्यवहारोपयोगी शिक्षणाचा अभाव हेच त्याचं कारण असावं असंच खेदानं म्हणावं लागतं.
ज्ञानप्रसारचं ध्येय
‘मनुष्याच्या मनातील अज्ञानरूपी अंध:कार जाऊन त्यावर ज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी वृत्तपत्र हवीत’ अशा शब्दात जांभेकरांनी वृत्तपत्राचं महत्त्व वर्णिलं आहे. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचं दान ज्ञान नसलेल्या लोकांना देण्यात ते धन्यता मानतात. ‘विद्या हे वाघिणीचं दूध आहे’ हे त्यांनी हेरलं म्हणून एका प्रबोधनयुक्त परंपरेचा पाया ‘दर्पण’नं घेतला. ज्ञान देणाऱ्या लेखाचा प्रचार जर देशात निर्विघ्नपणं झाला तर समाजांचं नैतिक आरोग्य पोषक बनेल, अशी त्यांची धारणा होती. काळाच्या ओघात जुनी अनेक वर्तमानपत्रं लोप पावली, पण त्यांची ध्येयनिष्ठा जोपासून विचारांना कल्पवृक्षात परावर्तित करणारी वृत्तपत्रं आज हयात आहेतच. केवळ मनोरंजनात्मक नव्हे, तर लोकशिक्षण आणि तेही निरपेक्षतेनं करण्याची मराठी वृत्तपत्रांची परंपरा ‘दर्पण’नं सुरू केली ही बाब मराठी वृत्तपत्रांना आणि पत्रकारांना अभिमानास्पद अशीच आहे.