EasyBlog

This is some blog description about this site

ताड की फाड

साहित्य संमेलनाची मयसभा - भाग १

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1130
  • 0 Comment

चिपळूणला होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक कोटीच्या कोटी उड्डाणं प्रकारचा इव्हेंट झाला आहे. 'नाल आहे, तो वापरता यावा म्हणून घोडा आणला' या म्हणीप्रमाणं भव्य मांडव करोडो रुपये खर्चून घालण्याची अतिशय हौस होती म्हणून साहित्य संमेलन भरवलं जात आहे, असं म्हणायची वेळ आली आहे. कारण या तीन कोटींच्या तमाशासाठी जो मांडव घातला आहे त्याचा खर्चच सुमारे दोन कोटी असल्याची चर्चा सुरू आहे.

कलादिग्दर्शक नितीन देसाई हे कोकणचे सुपुत्र. त्यांना कोकणविषयी जे अत्यंत प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी मांडवाची जबाबदारी त्यांनी उचलली. आता हे दोन कोटीचं काम कोकणच्या प्रेमाखातर ते करताहेत म्हटल्यावर टेंडर न काढता, कोटेशन न मागवता मांडवाची जबाबदारी त्यांना दिली. देसाईंच्या कोकण प्रेमाची किंमत दोन कोटी रुपये आहे. अर्थात, ती कमीच म्हणायला हवी. आजूबाजूला साक्षात कोकणचा निसर्ग - ओरिजिनल हिरवंगार कोकण, झोपड्या, आंब्या-काजूची झाडं, नारळीच्या बागा, समुद्र, खाडी, मंदिरं, हातात मोबाईल आणि कमरेला आकडी कोयती आणि पंचा लावलेला कोकणी माणूस, इथल्या जंगलतोडीमुळं बोडके झालेले डोंगर असं सारं कोकण हंड्रेड परसेंट ओरिजिनल असताना, ते डोळे भरून पाहता येण्याइतकी दृष्टी रसिकांना असताना देखील नितीन देसाई यांनी कोकणचा कृत्रिम सेट उभा करण्याचा उद्देश काय ते कळत नाही. हाच सेट पुढच्या वर्षी ग्लोबल कोकणसाठी वापरता येईल, असा धूर्त हेतू त्यामागे असावा. जय कोकण!

कोकणच्या नावाखाली अशी मांडवशोभा हे या संमेलनाचं खास वैशिष्ट्य. संयोजकांनी चंद्रपूरला झालेल्या संमेलनात मोठा मांडव पाहिला. तीन-साडेतीन कोटीचा खजिना तिथं जमल्याचं त्यांना समजलं. मग त्यांनी ईरेला पेटून कोकणात देखील असाच थाट जमवण्याचा निर्धार केला. पण कोकणच्या खिशातून साडेतीन कोटी रुपये जमणं अशक्य. पण राष्ट्रवादीची मंडळी धावून आली. जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी स्वागताध्यक्षपद स्वीकारलं आणि अलीबाबाच्या गुहेचा मार्ग सापडला. पाहता पाहता साडेतीन कोटींचा गल्ला जमला. अर्थात, मग कृत्रिम कोकण उभं करण्याची कल्पना नितीन देसाईंनी सहज अमलात आणली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्ष्मीदर्शन घडवल्यानं या संमेलनात सारा माहोल राष्ट्रवादीचाच आहे. साक्षात शरदरावजी पवार यांच्यापासून गावपातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वत्र राष्ट्रवादीचीच भाऊगर्दी झाली आहे. आता शरदरावजी पवार येणार म्हटलं की, गावोगावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार. मांडवात आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसली की, शरदरावजी साहित्य संमेलन आहे हे विसरून मग एकदम राजकीय भाषण करणार. त्यात मध्येच दहा-बारा वाक्यं साहित्याविषयी असणार हे सारं आता समजूनच घ्यावं लागेल.

बारामतीच्या नाट्य संमेलनात सारं पवारमय होतं. शरदराव पवार बोलता बोलता एकदम थेट मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसला टोमणे मारू लागले. तोच प्रकार इथं होणार. त्यातच मूळचे चिपळूणचे असलेले आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भास्कर जाधव यांचा सुनील तटकरे यांच्याशी खडाष्टकाचा प्रयोग रंगला आहे. तटकरे संमेलनात आहेत म्हणून जाधव यांना दूर ठेवण्यात आलं. त्यामुळं एक तुफानी टीका. प्रतिटीकेचा सणसणीत राऊंड झालाच. जिथं राष्ट्रवादी तिथं नेत्यांच्या अंतर्गत मारामाऱ्यांची लक्तरं लोंबणार हे तर ठरलेलंच आहे. साहित्य संमेलनात असा एक कलगीतुरा आहे. राजकीय मंडळींनी आपले राजकारणाचे जोडे बाजूला काढून साहित्याच्या मांडवात यावं, असं सुनावणारे साहित्यिक एकेकाळी होते. आता तसं कोणी नाही.

राष्ट्रवादीनं हे संमेलन हायजॅक केलं. एकाच मांडवात दोन लग्नं होतात तशा पद्धतीनं साहित्य संमेलन कम राष्ट्रवादीचा मेळावा, असा हा थाट असेल. पु. ल. देशपांडे नावाचं सोयीनुसार लेखकाचं स्वातंत्र्य वगैरेंच्या गप्पा मारणारे लेखक कराडच्या संमेलनात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही अपमान करण्याइतके लेखक मंडळींच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही झाले होते. वसंत बापट यांनी सरकारी अनुदानच नको, असा स्वाभिमानी बाणा दाखवला आणि तेव्हा युतीचं सरकार होतं म्हणून शिवसेनाप्रमुखांनी साहित्यिकांना त्यावरून झोडलं. त्यांनी साहित्य संमेलनासाठी महाकोष उभारण्याची कल्पना मांडली, पण ते स्वत:सुद्धा त्या कोषासाठी फारसा निधी जमवू शकले नाहीत. नंतर महाकोष पडद्याआड गेला. आता अशी तत्त्वनिष्ठा कोणी दाखवत नाही. गेल्या काही वर्षात अतिशय झपाट्यानं साहित्य संमेलनाचं भांडवलीकरण आणि व्यापारीकरण तसंच राजकीयकरण झालं आहे. गेल्या दहा वर्षांत साहित्य संमेलनाचा खर्च कोटींच्या घरात जाऊ लागला आहे. त्यामुळं आपोआप राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. क्रिकेटमध्ये आयपीएलमुळं जे बेलगाम व्यावसायिकीकरण झालं तसं आता साहित्य संमेलनाचं होऊ लागलं आहे. फक्त फरक एवढाच आहे की, साहित्यिकांना त्याचा आर्थिक लाभ होत नाही. पण साहित्याच्या नावावर मांडववाले करोडपती होऊ लागले आहेत. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या अत्यंत भपकेबाज मांडवात साहित्याच्या चर्चेवर दहा-बारा लाखही खर्च होत नाहीत, लक्ष्मी या मांडवात भरजरी पैठणी नेसून मिरवत असते आणि सरस्वती मात्र कोपऱ्यात बसते अशी अवस्था झाली आहे. यापुढं साहित्यिकांची जी निवडणूक अध्यक्षपदासाठी होते ती पक्षपातळीवर होणं किंवा एकेका पक्षानं साहित्यिक उमेदवार प्रायोजित करणं असेही प्रकार होऊ लागतील. क्रिकेटच्या व्यावसायिकीकरणामुळे ते सामने नफा मिळवण्याच्या उद्देशानं सुरू झाले. तसंच आता साहित्य संमेलनांचे इव्हेंट हे भव्य मांडवात कोटींचा खर्च, मेजवान्यांवर अर्ध्या कोटींचा खर्च करून नफ्याच्या हेतूनंच भरविले जात आहेत.
 
अलीकडे सर्वच क्षेत्रात मिडिऑकर माणसांचा भरणा झाला आहे. राजकारण हा जसा कमाईचा धंदा झाला आहे तसा खेळ, मनोरंजन हा केवळ गल्लाभरू वृत्तीतूनच केला जाणारा धंदा झाला आहे. साहित्य आता त्याच मार्गानं जाऊ लागलं आहे. अफाट खर्चाच्या हव्यासामुळं भल्याबुऱ्या मार्गानं पैसे जमवणाऱ्या राजकीय नेत्यांचं वर्चस्व त्यात निर्माण होतं. मग त्यांची दलाल मंडळी आणि आतल्या गोटातील मंडळी आपल्या नफ्यासाठी भव्य भपका निर्माण करतात आणि खिसे भरतात. अशा संमेलनांमध्ये किती भंपक चर्चा चालते यांचा अनुभव तर रोजच येत आहे. पहिल्या श्रेणीतील लेखक या उठवळपणापासून बाजूलाच राहतात आणि अशोक नायगावकरसारखे सुमार दर्जाचे लेखक व्यासपीठावर झुंबड करतात. हा सारा प्रकार पाहून आता साहित्य संमेलन आयपीएलच्या धर्तीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मयसभेसारखं होणार असं वाटू लागतं.

२० वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या १०-१२ लाखांमध्ये उत्तम आयोजित केलं गेलं. तेव्हा चिपळूण इथं झालेलं कोमसापचं पहिलं संमेलनसुद्धा साडेसहा लाखांच्या बजेटमध्ये उत्कृष्टपणं पार पडलं. आता २० वर्षांनंतर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली जात आहेत. पण भपकेबाजी, मांडवावरचा अवाढव्य खर्च आणि राजकीय नेत्यांचं उठवळपण यापलीकडं संमेलनांमधून साहित्याला उपकारक असं काही घडताना दिसत नाही. साहित्य संमेलनांचं हे भांडवलीकरण एकूणच उद्वेगजनक आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

गेली ३० वर्षं पत्रकारितेत. शेती, पर्यावरण, विज्ञान, राजकारण या विषयांचे अभ्यासक. 'दै. सागर'मध्ये वरिष्ठ सहसंपादक पदावर कार्यरत. 'एनरॉनची अंधारयात्रा' हे एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणारं पुस्तक प्रसिद्ध. मुलांसाठी वैज्ञानिक विषयावरची; तसंच इतर एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध.