EasyBlog
This is some blog description about this site
ग्लोबल व्हिलेज
मराठी साहित्य आणि जागतिक दर्जा
- Font size: Larger Smaller
- Hits: 2565
- 4 Comments
मराठी साहित्य संमेलन आता सुरू झालंय. हजारांची गर्दी कोट्यवधींचा खर्च, वादविवाद आणि जेवणावळी या साऱ्याची धामधूम तीन दिवस चालणार आहे. पण यात मराठी साहित्याचा दर्जा नेमका काय आहे, तो खालावतोय का, याची चर्चा फारशी होत नाही. जागतिक स्तरावर जपानी, चिनी, हंगेरीयन, इतकंच काय, तुर्कस्थानी लेखकांनीही मजल मारली. पण मराठी साहित्य कधी जागतिक स्तरावर काय, देश पातळीवरही चर्चेचा विषय ठरत नाही. याचं कारण त्याच्या दर्जात आहे का?
मराठी साहित्यासंबंधी चर्चा करताना त्याचा दर्जा हा आपण कसा मोजणार. अर्थातच लोकप्रियता, वाचकप्रियता वगैरे निकष आहेतच. उदा. कोसला, बनगरवाडी, स्वामी, ययाती, मृत्युंजय इत्यादी पुस्तकांना सतत मागणी असते. वाचकांत ती लोकप्रिय आहेत. पण लोकप्रियता हा दर्जाचा निकष होत नाही. दुसरा मापदंड अर्थात समीक्षकांचा. कोसला, कळ, गोलपेठा, बनगरवाडी, युगांत, सोलेदाद, सावित्रीर आणि अर्थात, शामची आई ही पुस्तकं समीक्षेच्या निकषांवर उतरतात. पण समजा जागतिक साहित्याच्या संदर्भात यांचा विचार करायचा तर मुळात या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद उपलब्ध हवेत. तेही उत्तम दर्जाचे असायला हवेत. मागं सलमान रश्दी यानं भारतीय साहित्याचा स्वातंत्र्याच्या पन्नाशीनिमित्त जो संग्रह संपादित केला, त्यात त्यानं म्हटलं आहे, की भारतीय लेखकांचे चांगल्या इंग्रजीत अनुवादच उपलब्ध नाहीत.
डोस्टोवस्की, लिओ टॉलस्टॉय, ते अल्बेर कामू, सात्र्र, मिलन कुंदेरा, गॅब्रीयल गार्सिया, माक्र्वेज ते अगदी आत्ताचे ओरहान पामुक, हरिकु मुराकामी हे लेखक किंवा मो यानसारखा चिनी लेखक हे सारे आपल्यापर्यंत पोहोचले ते इंग्रजी अनुवादामुलं. मो यान जर इंग्रजीत अनुवादितच झाला नसता तर नोबेल कोठून मिळालं असतं?
या साऱ्या लेखकांचं साहित्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यात वैश्विक असं काही तत्त्व आहे जे भाषा, संस्कृती देश हे सारं ओलांडून तुमच्यापर्यंत भिडतं. असा आपल्याकडचा जागतिक पातळीवर गेलेला कलावंत म्हणजे सत्यजीत राय. ज्यांचा सिनेमा ही सारं कुंपणं ओलांडून मनाला भिडतो. दुसरा कवी म्हणजे अरुण कोलटकर आणि तिसरा सलमान रश्दी ज्याच्या साहित्यात वाचकांइतकंच समीक्षकांनाही सुखावण्याची ताकद आहे.
पिकाडोर या प्रकाशन संस्थेनंही स्वातंत्र्याच्या पन्नाशीनिमित्त पिकाडोर बुक ऑफ इंडियन रायटिंग हे अमित चौधरी यांनी संपादित केलेलं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात एकाही मराठी साहित्यिकाचं लेखन नाही. आश्चर्य म्हणजे मराठी साहित्य जगताला याची गंधवार्ताच नव्हती. मराठीला वगळण्याबद्दल निषेधाचा सूर काढला तो गिरीश कर्नाड यांनी. म्हणजे असं की, भारतीय भाषेतल्या साहित्याच्या पुस्तकातही आपला समावेश होत नाही. यात अमित चौधरींची चूक आहेच, पण मराठीतलं कितीतरी चांगलं लेखन इंग्रजीत उपलब्ध नाही. याला कारणं अर्थात अनेक आहेत. पण आर्थिक कारण त्यात सर्वात प्रबळ आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी स्त्रीविषयक लेखांचा संग्रह इंग्रजीत अनुवाद करायला त्या संस्थेनं शब्दाला सहा रुपये दरानं पैसे दिले. इंग्रजी ते मराठी अनुवाद करायला आज साधारणपणं शब्दाला एक रुपया असा दर आहे. पण मराठीतून इंग्रजीत अनुवाद करताना हा दर ५-६ रुपयांपलीकडं जातो. म्हणजेच पन्नास हजार शब्दांचं पुस्तक अनुवादित करायला ३ लाख रुपये खर्च येईल. साहजिकच सरकारनं किंवा अन्य कोणी ही रक्कम उभी केल्याशिवाय हे काम होणार नाही. एकीकडे कोट्यवधी रुपये जर आपण साहित्य संमेलनावर खर्च करत असू तर दरवर्षी तीन पुस्तकं असं करत आठ-दहा वर्षांत तीसेक पुस्तकं इंग्रजी भाषेत आणता येतील.
अर्थात, केवळ अनुवादानं प्रश्र संपत नाही. कारण सावित्री, कोसला, शामची आई, गंगाधर गाडगीळांच्या कथा, कुसुमाग्रज यांची कविता अशा अनेक पुस्तकं इंग्रजीत अनुवादित झाली आहेत. विलास सारंग, दिलीप चित्रे हे व्दिभाषिक लेखक असल्यानं त्यांनी स्वत:चं लेखन इंग्रजीत अनुवादित केलं आहे. पण इंग्रजी साहित्याच्या प्रातिनिधिक कविता किंवा कथासंग्रहात यांचं लेखन दिसत नाही. उदा. फेबर बुक ऑफ पोयट्री किंवा तत्सम संग्रहात. अलीकडं इंग्रजी कवी डॉम मोराईस यांच्या कविता क्वचित अशा संग्रहात दिसतात. त्यामुळंच प्रकाशक, प्रकाशनविषयक नियतकालिकं, न्यूयॉर्क, रिव्ह्यू ऑफ बुक्सपासून ते स्पेक्टॅटर, न्यूयॉर्कर अशा वाङ्मयाला थोडं प्राधान्य देणाऱ्या आणि अनेक इंग्रजी विद्यापीठांची नियतकालिकं इथपर्यंत ती पुस्तकं जाणं आणि त्यांची दखल घेतली जाणं यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पण या साऱ्यामध्ये मूळ मुद्दा आहे तो आपल्या साहित्याचा दर्जा काय. यामध्ये मराठी साहित्याच्या ज्या मर्यादा आहेत यांची कारणं अशी सांगता येतील. एक म्हणजे साधारणपणं मराठी साहित्यक हा कनिष्ठ किंवा मध्यम कनिष्ठ वर्गातून येतो. आणि त्यातही प्राध्यापक वर्गातील मंडळीच आपल्याकडं मोठ्या प्रमाणात लिहीत असतात. दलित आत्मकथनांच्या ७५ नंतरच्या प्रकाशनानंतर मराठीत वेगळे अनुभव आणि जीवनदृष्टी असणारं लेखन येऊ लागलं. पण स्वातंत्र्यानंतर अगदी मुंबईसारखं एक शहर घेतलं तरीही त्यातील कामगार वर्ग, हॉटेलसारख्या ठिकाणी काम करणारी माणसं, रस्त्यावर जगणारी माणसं, गुन्हेगार, तुरुंग, पोलीस, विविध स्तरांवरचे अधिकारी, गँगस्टर, वेगवेगळया प्रकारचे कलावंत त्यांचं जगणं, हे सारं पाहिलं तर यातील फार थोडं साहित्यात प्रकटलं आहे. उदा. चित्रकाराच्या जीवनावर मराठीत एक तरी कादंबरी आहे का? किंवा अगदी पंचतारांकित शैलीत जगणाऱ्या माणसाचं जगणंही मराठीत आलं आहे का? इथं गौरी देशपांडेंच्या नाईकांचे नवरे बहुराष्ट्रीय बॅंकांत वगैरे काम करतात आणि सुती साडी नेसणाऱ्या नायिकेशी लग्र करतात, असा संदर्भ देता येईल. पण किर्लोस्करांसारखी धनाढ्य मंडळी किर्लोस्कर साप्ताहिक चालवत, पण त्या साप्ताहिकात मात्र कधी अशा मंडळींचं जगणं कधी प्रकटलं नाही. अगदी आपली हिंदी चित्रपटसृष्टी घेऊया. ज्या प्रकारे सादत हसन मंटोने हिंदी चित्रपटसृष्टी दाखवणाऱ्या कथा लिहिल्या त्या प्रकारचं लेखन मराठीत नाहीच. अगदी अलीकडे श्रीधर तीळवे यांनी आपल्या 'अॅडाहाकासुबाना' या हजार पानांच्या कादंबरीत हिंदी चित्रपटसृष्टीत वावरणारा नायक रंगवला आहे. रस्त्यावरचं जगणं, चंद्रकांत खोतांच्या कादंबरीत आलं आहे. गिरणगावातील जगणं भाऊ पाध्ये, जयंत पवार, जी. के. एैनापुरे, यांनी आणलेलं आहे. कलावंताचं जगणं नजरबंद- ज्ञानेश्वर नाडकर्णी, त्यावर्षी-शांता गोखले यासारख्या कादंबऱ्यांत आलेलं आहे. राजन खान, महादेव मोरे, पंजक कुरोलकर, सतीश तांबे, राजन गवस अशा गेल्या वीस वर्षांत पुढं आलेल्या लेखकांनी मळलेली सदाशिव पेठी वाट बऱ्यापैकी सोडून दिलेली आहे. भालचंद्र नेमाडे, शाम मनोहर, नामदेव ढसाळ, या जुन्या पिढीबरोबरच ही पिढी आणि अगदी आताचे सुजीत फाटक, ओमकार कुलकर्णी, मनस्वीनी लता रवींद्र, इरावती कर्णिक यांची तिसरी पिढी अशा तीन पिढ्या मराठीत एकाच वेळी लिहीत आहेत. या साऱ्यांचंच जगणं वेगळं आहे, पण तरीही एके काळी साडेतीन टक्केच मानलं जाणारं साहित्य आता पन्नास टक्केचं तरी झालं आहे काय?
लेखकाचं जगणं ही त्याच्या लेखनाची मोठी सामग्री असते हे मराठीत ठसलेलं आहे त्यामुळंच अनेकदा मराठी पुस्तकं ही बरेचदा आत्मचरित्रपर असतात. पण इंग्रजीत अमिताव घोष सारख्यांनी यावर एक सोल्यूशन काढलं, ते म्हणजे रिसर्च. पण किरण नगरकरसारख्यांना माहिती जमवून कादंबरी लिहणं हा मार्गच मान्य नाही. पण इंग्रजीत लिहणारे भारतीय लेखक मनील सुरी, राणा दासगुप्ता, विक्रम चंद्रा, किरण देसाई, विक्रम सेठ हे सारे संशोधनावर आधारित कादंबऱ्या लिहीत आहेत. वेगळं जगणं चितारायचं असेल तर जीवनानुभवाला संशोधन हा पर्याय आहे. पण मराठी लेखकाला ते मान्य होईल काय?